आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते. या चार महिन्याच्या कालावधीत अनेक व्रत-वैकल्ये केली जातात. एकूणच हा कालखंड पावसाचा असल्याने या चार महिन्यात सूर्याचे दर्शन ओझरते होते. त्यामुळेच सूर्य उपासनेशी संबंधित अनेक व्रतवैकल्ये केली जातात. श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणावर ‘श्रावण रविवार व्रत’ असे म्हटले जाते; हे व्रत महाराष्ट्र तसेच गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात येते. हे व्रत श्रावणात करावयाचे असले तरी, संपूर्ण चातुर्मासाच्या कालावधीत अशाच स्वरूपाची सूर्यउपासनेशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारची व्रते केली जातात. मूलतः चातुर्मासाची सुरुवात आषाढी एकादशी पासून होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या एकादशीला हरीशयनी एकादशी म्हणूनदेखील ओळखले जाते. पौराणिक संदर्भानुसार हरी हा शब्द श्रीविष्णूंना तसेच सूर्यालादेखील वापरला जातो. काही अभ्यासक विष्णू आणि सूर्य एकच असल्याचे मानतात; वैदिक साहित्यात विष्णूलाच सूर्य असे संबोधले आहे, त्यामुळेच ‘सूर्यनारायण’ ही संज्ञा दृढ झाल्याचे लक्षात येते. वेदांनी विष्णूचे वर्णन करताना त्यांच्याकडे सूर्याचे अमर्याद तेज असल्याचे नमूद केले आहे. श्रीमद् भगवत गीतेत विष्णूच्या तेजाने सूर्याला ऊर्जा मिळते, असे वर्णन करण्यात आले आहे. काही ग्रंथांमध्ये सूर्याला विष्णूचा अवतार मानण्यात आले आहे. किंबहुना मूर्तीविज्ञानशास्त्रात सूर्य व विष्णू यांच्या रूपात साम्य असल्याचे आढळून येते. चातुर्मासाच्या कालखंडात श्री हरी विष्णू क्षीरसागराच्या तळाशी चिरनिद्रेत जातात. त्यामुळेच हरिशयनी एकादशी ‘विष्णू शयनी एकादशी’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. हा कालखंड अतिवृष्टीचा असल्याने या दिवसांत पृथ्वीवर सूर्यप्रकाश ओझरता असतो म्हणूनच या काळात सूर्य उपासनेला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्याच निमित्ताने भारतीय संस्कृतीतील सूर्यपूजनाच्या परंपरेचा इतिहास जाणून घेणे समयोचित ठरणारे आहे.

आणखी वाचा : विश्लेषण: ‘राणी दुर्गावतीवर चित्रपट’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, मुघलांशी सौदामिनीप्रमाणे लढणारी कोण होती ही राणी?

नवाश्मयुगीन सूर्य उपासनेचे प्राचीन संदर्भ

भारतामध्ये सूर्य उपासनेचे प्राचीन पुरावे हे नवाश्मयुगीन आहेत. ओडिशामध्ये सुंदरगढ जिल्ह्यात नवाश्मयुगीन एका शैलगृहाच्या आत सूर्याची प्राचीन प्रतिमा कोरण्यात आली आहे. ही गुहा जवळच्या जंगलापासून २०० फूट उंचावर आहे. या गुहेत आढळणारी सूर्याची प्रतिमा गुहेच्या मध्यभागी असून या सूर्यप्रतिमेचा व्यास २० ते २५ सें.मी. आहे. गेरूच्या म्हणजेच लाल रंगाच्या वापरातून सूर्याची प्रतिमा साकारलेली आहे. दोन वर्तुळांच्या तसेच सरळ रेषांच्या (सूर्याची किरणे) सहाय्याने सूर्यप्रतिमा दर्शविण्यात आलेली आहे. या शैलगृहाचा नेमका काळ काय असावा, हे सांगणे आज कठीण आहे. याशिवाय, कर्नाटकातील पिकलीहाळ येथे सापडलेल्या नवाश्मयुगीन मातीच्या भांड्यांवर सूर्याचे चित्रण आढळले आहे. त्यामुळेच उत्क्रांतीच्या प्रारंभिक टप्प्यातच भारतात सूर्यपूजा स्वीकारण्यात आल्याचे अभ्यासक नमूद करतात.

सूर्यपूजनाचे ऐतिहासिक पुरावे

महाराष्ट्रातील भाजे लेणीत इसवी सनपूर्व पहिल्या शतकातील सूर्यप्रतिमा आहे, या प्रतिमेत सूर्य सात घोड्यांच्या रथावर स्वार असल्याचे दर्शविण्यात आले आहे. ओडिशाच्या खंडगिरी लेणीत पहिल्या शतकातील सूर्यप्रतिमा आहेत. इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकातील भारहूत स्तुपावर सूर्याचे चित्रण असणारी मानवी प्रतिमा आहे. तर पश्चिम बंगालमधील चंद्रकेतूगढ येथील शुंग कालखंडातील टेराकोटा किंवा मातीच्या आकृत्यांवरून सूर्य उपासकांचा पंथ इ.स.पूर्व पहिल्या शतकापासून भारतीय संस्कृतीत अस्तित्वात असल्याचे लक्षात येते. रथावर स्वार असणाऱ्या सूर्यदेवाचे जुने चित्रण बिहारमधील बोधगया येथील महाबोधी मंदिराच्या रेलिंगवर आपण पाहू शकतो, उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ सापडलेल्या दुसऱ्या शतकातील एका स्तंभावर सूर्यदेव चार घोड्यांच्या रथात स्वार असल्याचे दाखविले आहे. यावरूनच पुरातन देवस्थानांमध्ये सूर्यदेवाला समर्पित सूर्यध्वज किंवा स्तंभाची परंपरा असावी, असे अभ्यासक मानतात.

सूर्यपूजेला राजाश्रय

एखादा धार्मिक संप्रदाय प्रसिद्ध होण्याकरिता त्या संप्रदायाला राजाश्रय किंवा प्रतिष्ठित वा व्यापाऱ्यांकडून आश्रय मिळणे गरजेचे आहे. ऐतिहासिक संदर्भानुसार सूर्यउपासनेला राजाश्रय मिळाला होता. शुंग घराण्यातील पुष्यमित्र शुंग हा सूर्य उपासक होता. किंबहुना हरियाणातील थानेश्‍वरचे वर्धन घराणे हे सूर्याचे भक्त होते. सोनीपत ताम्रपटातील शिलालेखात हर्षवर्धनाच्या तीन पूर्वजांच्या ‘परमादित्यभक्त’ या विशेषणावरून हे स्पष्ट होते, हर्ष सुरुवातीस स्वतः शैव होता, नंतर तो बौद्ध धर्माकडे वळला, तरी त्याने आपल्या पूर्वजांची परंपरा सोडली नाही; एका धार्मिक कार्यक्रमात बुद्ध आणि शिव यांच्यासोबत हर्षाने सूर्यदेवाची प्रतिमा स्थापित केली होती, याचे संदर्भ ह्युएन त्सांग देतो.

प्रतिहार राजे रामभद्र आणि विनायकपाल हे देखील सूर्यउपासक होते. गुप्तशासक स्कंदगुप्ताच्या इंदूर ताम्रपटातील शिलालेखावरून त्याने सौर पंथासाठी प्राधान्य दिले होते, हे कळते. कुमारगुप्त पाहिल्याच्या मंदसोर शिलालेखामुळे मध्य भारतातील दासपूर येथे विणकरांच्या संघाने सूर्यमंदिराचे बांधकाम केल्याचे संदर्भ सापडतात. हूण शासक मिहिरकुलाचा ग्वाल्हेर शिलालेख सूर्याला अंधार दूर करणारा म्हणून आवाहन करतो. १० व्या शतकातील महेंद्रपाल दूसरा याच्या प्रतापगढ शिलालेखानुसार, त्याचा सरंजामदार इंद्रराजा चाहमनाने एक सूर्यमंदिर बांधले होते व या मंदिराचे नाव ‘इंद्रदित्यदेव’ ठेवले होते.

आणखी वाचा : विश्लेषण: अलेक्झांडर दी ग्रेट ते अलेक्झांडर फ्रेटर; भारतातील अतिवृष्टीचा परकीयांचा अनुभव !

काठियावाडच्या परमार, गहाडवाल, गुर्जर आणि वल्लभींनी सूर्यमंदिरांना अनुदान दिले होते.अवंतिवर्मन दूसराच्या ताम्रपटात नवव्या शतकात चालुक्य शासकांनी तरुणादित्य नावाच्या सूर्य मंदिराला दिलेल्या भेटीचा संदर्भ दिला आहे. गुजरातचा चालुक्यशासक सिद्धराज याने सूर्यमंदिर बांधल्याचे सांगितले जाते. बंगालमध्ये सेना घराण्याच्या (१२वे शतक) केशवसेनाच्या ताम्रपटांमध्ये सूर्य पंथाला दिलेल्या आश्रयाचा संदर्भ आहे. कोकणात भोज राजा दुसरा याने कशेळीच्या कनकादित्य सूर्यमंदिरासाठी जमीन दान दिली होती त्याचे संदर्भ सापडतात. सूर्यउपासनेची ही परंपरा मध्ययुगीन काळात देखील सुरू होती. राजपूत शासकांनी स्वतःला सूर्यवंशीय म्हटले आहे. यावरूनच वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या राजांनी सूर्य उपासनेला राजाश्रय दिल्याची माहिती मिळते.

सूर्यप्रतिमा

सूर्य उपासनेचे पुरावे प्राचीन असले तरी प्रत्यक्ष मूर्तिपूजेचे पुरावे इसवी सनाच्या पाचव्या शतकातील आहेत. बृहत संहितेनुसार सूर्य द्विभुज असावा व त्याला सुंदर मुकुट परिधान करण्यात यावा, असे नमूद करण्यात आले आहे. गुप्त काळात लिहिलेल्या विष्णुधर्मोत्तर पुराणात सूर्यमूर्ती चतुर्भूज असावी असे म्हटले आहे; बृहत संहितेत सूर्याचे पाय झाकलेले असावेत असा नियम दिला आहे. प्रारंभीच्या प्रतिमा पर्शियामध्ये आढळलेल्या प्रतिमांसारख्याच आहेत. मत्स्य पुराणात विश्वकर्मा यांची कन्या व सूर्याचा विवाह याची कथा सापडते. या कथेनुसार पत्नीला विवाहानंतर सूर्याचे तेज सहन होत नव्हते, त्यामुळेच ती आपल्या पित्याकडे गेली; आपल्या मुलीच्या समस्येवर तोडगा म्हणून विश्वकर्म्याने सूर्याला डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शस्त्रांच्या साहाय्याने कातरण्यास सुरुवात केली, जेणेकरून त्याचे तेज कमी होऊन आपल्या मुलीस त्याचे रूप सुसह्य होईल. विश्वकर्म्याने सूर्यास संपूर्ण कोरले परंतु त्याच्या पायाकडचा भाग सोडून दिला. म्हणूनच सूर्यमूर्तीत आपल्याला सूर्याच्या पायात बूट घातल्यासारखे दिसतात. ही पौराणिक कथा प्रचलित असली तरी अभ्यासकांच्या मते सूर्याच्या मूर्ती स्वरूपातील रूपावर पर्शियन/इराणी प्रभाव असल्याने सूर्य मूर्तीच्या पायात अशा स्वरूपाचे बूट दिसतात.

एकूणच सूर्य उपासना भारतीय संस्कृतीत प्राचीन असली तरी, भारतात वेळोवेळी वेगवेगळ्या संस्कृती आल्या, येथे वसल्या आणि रुजल्याही. त्यांनी आपला प्रभाव इथल्या मातीत उमटवला. त्यामुळे त्या भारतीय संस्कृतीचा कायमस्वरूपी भाग झाल्या, असेच काहीसे सूर्य प्रतिमांच्या बाबतीतही दिसून येते.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaturmas history sun worship in indian subcontinent svs