-श्रीकांत विनायक कुलकर्णी

कुठलंही, कसलंही डिझाईन हे काही उद्देशानंच असलं पाहिजे आणि हे उद्देश मुख्यत्वे अपेक्षित वापर, वापराचं कारण, वापरातील सहजता व सुरक्षितता ध्यानी घेऊनच ठरवले गेले पाहिजेत. केवळ कुणाचं अनुकरण आणि तेही मुळातल्या डिझाईनचे संदर्भ लक्षात न घेता करत गेलो तर उपाय कमी व अपाय जास्त होतो याची खालीलप्रमाणे अनेक उदाहरणं पदोपदी दिसतात.

-गेल्या एक-दोन वर्षांत, जलद धावणाऱ्या नविन प्रकारच्या रेल्वे गाड्यांना गायी- म्हशी धडकल्याच्या आणि गाडीचं नुकसान झाल्याच्या काही बातम्या लागोपाठ वाचनात आल्या. गायी-म्हशींचं काय झालं हा भाग वेगळाच. पूर्वी गाड्यांना इंजिनापुढे खालच्या अंगाला अगदी मजबूत लोखंडी जाळ्या असत. त्या रुळावर असलेले अडथळे बाजूला सारत इंजिन सुरक्षित ठेवत. भारतात सर्वदूर पसरलेले रेल्वे मार्ग खुले असतात. गाईगुरंच काय माणसं अन वाहनंही सर्रास रेल्वे मार्ग ओलांडतात. गाड्यांचं डिझाईन करताना हा मुद्दा नजरेआड करून कसे चालेल? भले या नविन गाड्यांची इंजिनं एरोडायनॅमिक आकारामुळे बंदुकीच्या गोळीगत रुबाबदार दिसत अन सुसाट धावत असली तरी.

-परदेशातल्या मोटारगाड्यांप्रमाणे आमच्याकडेही गाड्यांना सन-रुफ्स, कमीतकमी ग्राउंड क्लिअरन्स, दिवसाही पेटते रहाणारे एलईडी दिवे असणं गरजेचं तर नाहीच, उलट पर्यावरणाचीही हानी करणारं आहे.

हेही वाचा…आपल्या आमदारांनी या अधिवेशनात काय काम केलं?

-बरीचशी नविन बांधकामं, नविन इमारतींचे आराखडे हे बहुतांशी मुळ चारपाच आराखड्यांच्या भ्रष्ट नकला असतात. त्यात वर अजून, काही ठोस कारण नसताना केवळ स्वस्त अन झटपट उरकणारा पर्याय म्हणून काचाच काचा वापरल्या जातात. ॲल्युमिनीयमची तकलादू क्लॅडींग्ज लावण्यात येतात. खिडक्यांच्यावर ऊन-पाऊस लागू नये म्हणून पूर्वी असे तशी काँक्रीटची पाळी वा सज्जा ठेवलाच जात नाही. गॅलरी जाऊन त्याऐवजी सन-डेक वा फ्लॉवर डेक असा काहीतरी प्रकार माथी मारला जाऊ लागला आहे.

-पूर्वापार चालत आलेली, आम्ही अगदी लहानपणापासून ते अगदी अलीकडील १२-१५ वर्षांपूर्वीपर्यंत पाहत आलेली, आपल्या मातीतली पर्यावरणानुकूल झाडी सोडून कुठलीतरी देशविदेशातली शोभेची झाडी लावण्याचं खूळ तर बिल्डर्सपासून ते नगरपालिकांपर्यंत सर्वत्र पसरलं आहे. या झाडांचा ना सावलीकरता उपयोग ना फळांकरता ना लाकडाकरता. पक्षी त्यांच्या वाऱ्यालाही उभे रहात नाहीत. त्यांच्या फांद्यांवर घरटी बांधत नाहीत.

-बाजारपेठांमध्ये, दुकानांमध्ये, मॉल्समध्ये ढणाढणा इतके दिवे जळत असतात, खरंच का आवश्यक असतात ते? किती तरी वीज खर्ची पडून केवळ उष्मा वाढतो. पूर्वी साध्या पणत्या, निरांजनं, कंदिलांनी साजरे होणारे आमचे सण, आज घराघरात, रस्त्यारस्त्यात, झाडाझाडांवर होणाऱ्या चिनी बनावटीच्या रोषणाई शिवाय पार पडेनासे झाले आहेत. उष्णता अन प्रदूषण वाढलं म्हणून एसी वापरावे लागताहेत अन एसीमुळे अधिक प्रदूषण होऊन उष्णता अधिकच वाढू लागली आहे. १२-१५ वर्षांपूर्वी गाड्यांमध्ये एसी फारसे आढळत नसत, आज एसीशिवाय गाडीचा विचारही करू शकत नाही.

हेही वाचा…मुस्लिमांना संधी हव्यात आणि प्रतिनिधित्वही…

अगदी काल परवाची गोष्ट, एक मित्र घणसोली येथील रिलायन्सच्या ट्वीन टॉवर्सचे कौतुक सांगत होता. छानच आहेत त्या इमारती, आतून आधुनिक सोयीसुविधाही असतील. बाहेरून मात्र पाहावयास मिळतो तो, वर उल्लेख केल्याप्रमाणे काचा व ॲल्युमिनियमचा मुक्त वापर. गेल्या दीड-दोन दशकांपासून अनेक इमारती याच धर्तीवर उभारल्या गेल्या आहेत, अन आजही अधिकच जोमानं उभारल्या जाताहेत. मुंबईसारखी महानगरंच नव्हे तर खेडोपाडीसुद्धा हे लोण पोहोचलं आहे. जगभरातील मोठ्या महानगरांची, गगनचुंबी अन झगमगत्या दिमाखदार इमारतींनी उजळून गेलेली अनेक दृष्यं वा छायाचित्र आपण सिनेमा, मासिकांतून पहात आलो आहोत. एकीकडे हे चित्र तर दुसरीकडे, आम्हा सामान्यजनांस फारशा ज्ञात नसलेल्या, अशाही काही इमारती जगात आहेत, की ज्यांच्या प्रत्येक मजल्यावर, प्रत्येक फ्लॅटला जोडून खास हिरवीगार झाडी असलेल्या गच्च्या वा सज्जे आहेत. सारी इमारत गर्द झाडांनी नखशिखांत मढलेली. अर्थातच अशा इमारती बांधण्याचा अन त्यांच्या देखभालीचा खर्च हा पारंपारिक इमारतींपेक्षा जास्त असणार. बरं, एक निसर्गाभिमुख, पर्यावरणपूरक हिरवेपण सोडलं, तर या इमारती केवळ इमारत म्हणून काही अधिक डौलदार वा देखण्या असतातच असं नाही. मग तरीही, जास्त खर्च करून हे असं काही उभारण्याचा अट्टहास करणारी, अन अशा घरांत रहाणारी वा कार्यालयं थाटणारी ही मंडळी कोण असावीत? तर, ज्यांना पर्यावरणाची चाड आहे आणि आहे ती परिस्थिती भयावह आहे याची जाणीव आहे, अशी मंडळी!

विश्वातल्या मोजक्या अतिश्रीमंत अब्जाधीशांच्या अव्वल यादीतली, मुलाबाळांच्या लग्नसोहळ्यांवर हजारो कोटी खर्च करणारी अनेक मंडळी भारतातच काय, तर अगदी मुंबईतही आहेत. परंतु, वेळ पडली तर, पर्यावरण अधिकच धोक्यात आणणाऱ्या काचा अन ॲल्युमिनियमच्या इमारती बांधण्याऐवजी पर्यावरणाशी नाळ जपणारी, आपल्या शहराचा, राज्याचा व देशाचाही मानबिंदू ठरू शकेल अशी हिरवाईनं नखशिखांत मढलेली नवलप्राय इमारत बांधायचा का विचार केला जात नसेल? असा खिन्न विचार मनी आल्याशिवाय रहात नाही.

हेही वाचा…मी कधी हज यात्रेला गेलो नाही, पण तो अनुभव वारीत घेतला…

इथे विषय डिझाईन्स, इमारत बांधणी वा श्रीमंतांकडून अपेक्षा हा अर्थातच नाही. तर निसर्गाची अन पर्यायानं पृथ्वीची आजतागायत झालेली अन् होतच चाललेली अपरिमित हानी हा आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आपल्या स्थळकाळाचा अन हवामानाचा, ऋतूमानाचा विचार केला तर अस्थानी अन अनाठायी ठरतात. साधा दगड वापरायचा म्हटला तरी कुठेतरी जमीन खणूनच काढावा लागतोय. सिमेंटही बनतं त्यात केवळ दगडच नव्हे तर अनेक खनिजं अन रसायनं मिसळावी लागतात. आज ज्या प्रचंड प्रमाणात सिमेंट, काचा, ॲल्यूमिनियम, लोखंडी सळया-गर्डर्स वापरले जाताहेत त्यांच्या निर्मितीची किंमत केवळ पैसाच नाहिये, तर पर्यावरणाची परत कधीही भरून न येणारी हानी सुद्धा आहे. खनिजं उकरून काढतोय, परत कशी निर्माण होणार? प्रक्रियेकरता उर्जा वापरतोय, ती किती पुरणार? जिथे शक्य आहे तिथे लोखंडाऐवजी लाकडी खांब वा बांबू वापरले तर त्यांची परत लागवड होऊ शकते, निसर्गचक्र चालू राहू शकतं. पर्यावरणाची हानी तर सर्वांत आहेच, पण त्यातल्या त्यात कमी हानीकारक पर्याय वापरणं तरी आपल्याकडून व्हावं. खेडोपाडी दारा-अंगणात बांबू उपलब्ध असतात, तर अशा ठिकाणी लहानसहान शेड वगैरे बांधायला लोखंडी अँगल्स किंवा पाईप्स न वापरता बांबू वापरावेत. कारण, बांबू छाटले तरी परत नविन वाढ होतच असते, झाडं तोडावी लागली तरी जाणीवपूर्वक ध्यानात ठेवून चार नविन झाडं लावावी. लोखंड वापरलं तर कापायला व वेल्डिंग करायला परत वीज वापरावी लागते अन वीज तयार करण्यासाठी परत निसर्ग ओरबाडणं आलंच. लोखंड, ॲल्युमिनियम, काचा, सिमेंट यांच्या वापरामुळे तापमान वाढतं, रात्र झाली तरी उष्णता निवत नाही. पूर्वी पहाटे तरी थोडा गारवा वाटायचा, पण आता पहाटेही घाम येतो. साहजिकच आहे, जमिन माती अशी फारशी राहिलीच नाही, सर्वत्र फरसबंदी, पेव्हर ब्लॉक, सिमेंट किंवा डांबर असल्याने दिवसभर ते तापतच जातं अन तापमान कमी होण्याआधीच सकाळ होऊन सूर्य पुन्हा उगवलेला असतो. त्यात भर म्हणजे झाडंही नाहीत. पावसाचं पाणी जमिनीत झिरपत, जिरतच नाही, सारं वाहून वाया जातं. शेतीची माती उकरून त्याच्या विटा भाजून विकून, उरल्या त्या जमिनी नापीक केल्या जाताहेत. आज बंगलोरसारखं प्रागतिक शहर हे पाण्याच्या दुर्भिक्षामुळे बातम्यांत येतं. विविध भागांतल्या उष्माघाताच्या बातम्या नित्यनेमानं प्रसारित होताहेत.

उंदीर-घुशी जशा फरसबंदीखालील जमीन पोखरून बिळांच जाळं तयार करून ठेवतात तसं आज आपण विविध खनिजांकरता खाणी खणून पृथ्वी कित्येक ठिकाणी पोखरून बकाल अन भकास केली आहे. जे घडायला, साठायला अब्जावधी वर्षं गेली ते उधळून टाकून आपण कफल्लक होण्याच्या मार्गावर आहोत. जे सारं काही मिळून ही पृथ्वी बहरलेली होती तेच जर संपुष्टात येत चाललंय तर पृथ्वीचा बहर ओसरणारच. पृथ्वी ज्या २३-२४ अंशानं कललेल्या अक्षाभोवती फिरतेय, ज्या विशिष्ट स्थितीमुळे आपण हवामान, ऋतुमान अनुभवतोय तो अक्ष आता डळमळीत होत की काय अशी धास्ती निर्माण झाली आहे. कारण भूगर्भातल्या गोष्टींचा नैसर्गिक समतोल ढासळला आहे. गाभा अन बाह्य थर यातील अंगचा असणारा समतोल ढासळला आहे. एकीकडून अतिरेकी प्रमाणात काही काढलं जातंय, तर दुसरीकडे विवेकशून्यपणे एकवटलं, रचलं जातंय. हा अक्ष आता थोडा जरी अधिक इकडेतिकडे झाला तर पृथ्वीवर केवळ विविध नैसर्गिक उत्पातांचीच शक्यता उरते.

हेही वाचा…भाजपच्या अहंकाराला पायबंद घालण्याचे सरसंघचालकांचे काम खुद्द प्रभू रामचंद्रांनी केले…!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुठं निघालो आहोत आपण? काय करतोय? मानव सारा निसर्ग वेठीस धरून जमिनी टेकड्या डोंगर ओरबाडत आहे. पृथ्वीची प्रकृती ढासळली आहे. यासाठी आपण फारसं काही करू शकणार नाही म्हणून सरकारी तसंच जागतिक पातळीवर दूरदृष्टी, वैचारीक प्रगल्भता अन राजकीय इच्छाशक्ती असणं आवश्यक आहे. असो, सर्वसामान्यांनी जरी योग्यायोग्यतेचं हे भान पदोपदी बाळगलं तरी पुष्कळ. नाहीतर हे केवळ अरण्यरुदनच!

sk3shrikant@gmail.com