वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

जगभरात महाकाय तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये उठत असलेल्या नोकरकपातीच्या लाटेत आता ‘ॲपल’ही सहभागी झाली आहे. कंपनीने कॅलिफोर्नियातील ६०० कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. करोना संकटानंतरची ही कंपनीने केलेली सर्वांत मोठी कपात असून, तंत्रज्ञान उद्योगातील काटकसर आणि पुनर्रचनेच्या प्रवाहाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

ॲपलने विविध कार्यालयातील ६१४ कर्मचाऱ्यांना कपातीची नोटीस २८ मार्चला पाठविली असून, ही कपात २७ मेपासून लागू होणार आहे. कॅलिफोर्नियामधील सँटा क्लारातील आठ कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कामगार तडजोड व पुन:कौशल्य अधिसूचना कायद्यानुसार कपात करण्यात येत आहे. मात्र, नेमक्या कोणते विभाग आणि प्रकल्पांतील कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ॲपलच्या प्रवक्त्याने याबाबत वृत्तसंस्थेने विचारलेल्या प्रश्नांना अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.

हेही वाचा >>>१९ वर्षीय तरुणी ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश, किती आहे संपत्ती? भारतात हा मान कुणाला मिळाला, हे ही पाहा

अलिकडच्या प्रवाहाच्या विपरित, तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी कपात न करणारी ॲपल ही एकमेव कंपनी होती. गेल्या दोन वर्षांत तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ कपात केली आहे. करोना संकटाच्या काळात कंपन्यांकडून मोठी नोकर भरती झाली होती. त्यावेळी लोक अधिकाधिक वेळ आणि पैसाही ऑनलाइन व्यवहारांवर खर्च करीत होते. त्यानंतर वाढीचा वेग कमी झाल्यानंतर कंपन्यांनी खर्चात बचत करण्यावर भर दिला. त्यामुळे मनुष्यबळ कपातीचे पाऊल कंपन्यांनी उचलले.

तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरकपातीचे वारे

– ॲमेझॉनकडून एडब्ल्यूएस या क्लाऊड कॉम्प्युटिंग व्यवसायात मनुष्यबळ कपात होणार
– व्हिडीओ गेम क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक आर्ट्स कंपनी ५ टक्के कर्मचारी कमी करणार
– सोनीकडून प्ले स्टेशन विभागातील ९०० कर्मचाऱ्यांची कपात होणार
– सिस्को सिस्टीम्सचे ४ हजारहून अधिक मनुष्यबळ कपातीचे नियोजन
– स्नॅपकडून जागतिक मनुष्यबळातील १० टक्के कर्मचाऱ्यांची कपात होणार