लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने गुरुवारी आर्थिक वर्षातील चौथ्या अर्थात मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा २१,३८४.१५ कोटी रुपयांवर नेला आहे. गत वर्षी याच तिमाहीतील १८,०९३.८४ कोटी रुपयांच्या तुलनेत बँकेच्या निव्वळ नफ्यात यंदा १८.१८ टक्क्यांची वाढ दिसली आहे. उल्लेखनीय म्हणजे बँकेने प्रति समभाग १३.७० रुपयांचा भरीव लाभांश जाहीर केला आहे.

संपूर्ण आर्थिक वर्ष २०२३-२४ ची कामगिरी लक्षात घेतल्यास, बँकेचा एकत्रित निव्वळ नफा २०.५५ टक्क्यांनी वाढून तो ६७,०८४.६७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील आर्थिक वर्षाअखेर ५५,६४८.१७ कोटी रुपये होता.चौथ्या तिमाहीमध्ये, बँकेचे एकूण उत्पन्न वर्षापूर्वीच्या १.०६ लाख कोटींवरून, १.२८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, तर परिचालन खर्च तुलनेने कमी दराने वाढून ३०,२७६ कोटी रुपये नोंदला गेला आहे. एकंदर तरतुदी देखील वर्षापूर्वीच्या ३,३१५ कोटी रुपयांच्या तुलनेत जवळपास निम्म्याने कमी होऊन १,६०९ कोटी रुपयांवर घसरल्या आहेत.

हेही वाचा >>>बीएसएनएलच्या ४ जी सेवेला अखेर ऑगस्टचा मुहूर्त; पंजाबमधील पथदर्शी प्रकल्पाच्या यशानंतर देशभरात अनावरण

स्टेट बँकेने ३१ मार्च २०२४ अखेर सकल अनुत्पादित मालमत्तेत (ग्रॉस एनपीए) २.२४ टक्क्यांपर्यंत सुधारणा केली आहे, मागील वर्षी याच कालावधीत हे प्रमाण २.७८ टक्के होते आणि डिसेंबर तिमाहीअखेरीस ते २.४२ टक्के होते. याच धर्ती नेट एनपीएचे प्रमाण देखील मार्च २०२४ अखेरीस वर्षभरापूर्वीच्या ०.६७ टक्क्यांच्या तुलनेत, ०.५७ टक्के असे सुधारले आहे.अपेक्षेप्रमाणे कामगिरी आल्याने भांडवली बाजारात मोठी पडझड सुरू असतानाही, स्टेट बँकेचा समभाग बीएसईवर १.१४ टक्क्यांनी वाढून ८१९.६५ रुपयांवर गुरुवारी व्यवहारअंती स्थिरावला.