मुंबई : जगभरातील अस्थिर भांडवली बाजार आणि जागतिक अनिश्चिततेची स्थिती असूनही शेअर बाजारात नशीब आजमावणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे. अलीकडच्या भांडवली बाजारातील तेजीने लक्षणीय प्रमाणात किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. परिणामी सरलेल्या मार्च महिन्याच्या अखेरीस देशातील डिमॅट खात्यांच्या एकत्रित संख्येने प्रथमच १५.१ कोटींचा विक्रमी टप्पा गाठला आहे, असे गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या अहवालाने स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> इन्फोसिसचा तिमाही नफा ७,९६९ कोटींवर; मार्चअखेर तिमाहीत ३० टक्क्यांची दमदार वाढ

सरलेल्या मार्च महिन्यात ३१ लाख नवीन डिमॅट खात्यांची भर पडली आहे. संपूर्ण वर्षभर हा कल कायम असल्याचे दिसते, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये मासिक आधारावर सरासरी ३१ लाख नवीन खाती उघडली गेली आहेत.

अर्थव्यवस्थेविषयक सकारात्मक आकडेवारी, दर कपातीची आशा, परकीय गुंतवणूकदारांच्या निधीचा ओघ यामुळे भारतीय भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी मार्चमध्ये १.५ टक्क्यांनी वधारला. शिवाय, आगामी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा निवडून येण्याच्या अपेक्षेने देखील गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

हेही वाचा >>> लवकरच जग्वार लँड रोव्हरचे भारतात उत्पादन; टाटा मोटर्सचे नियोजन; तमिळनाडूमध्ये उभारणार १ अब्ज डॉलरचा प्रकल्प

भारतात सध्या कार्यरत असलेल्या एनएसडीएल आणि सीडीएसएल या दोन डिपॉझिटरी संस्था आहेत, ज्यांच्याकडे गुंतवणूकदारांना डिमॅट खाते उघडता येते. सीडीएसएलने अधिक सक्रिय डिमॅट खात्यांसह देशातील सर्वात मोठी डिपॉझिटरी असून तिने ७० टक्क्यांहून अधिक बाजारहिस्सा व्यापला आहे. तर उर्वरित डिमॅट खाती एनएसडीएलकडे आहेत. राष्ट्रीय शेअर बाजारामधील सक्रिय डिमॅट खात्यांची संख्या दर महिन्याला १.८ टक्क्यांनी वाढून मार्च २०२४ मध्ये ४.०८ कोटी झाली आहेत.

डिस्काऊंट ब्रोकरची कामगिरी कशी?

‘झिरोधा’ या आघाडीच्या दलाली पेढीने (डिस्काऊंट ब्रोकर) पहिले स्थान कायम राखले आहे. मात्र तिच्या बाजार हिश्श्यामध्ये २० आधारबिदूंची घसरण झाली आहे. ‘ग्रो’ या दलाली पेढीच्या ग्राहक संख्येत ३.८ टक्के वाढ झाली असून बाजार हिश्श्यामध्ये ५० आधारबिदूंची वाढ झाली आहे. संख्या ६५ लाख आहे. ‘अपस्टॉक्स’ने देखील ग्राहकांच्या संख्येत मासिक आधारावर ०.६ टक्क्याची किरकोळ वाढ नोंदवली.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demat accounts touch 15 crore in march 2024 print eco news zws