नवी दिल्ली : सरलेल्या एप्रिलमध्ये वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी संकलन वार्षिक तुलनेत १२.४ टक्क्यांनी वाढून २.१० लाख कोटी रुपये नोंदवले गेले. हे आजवरचे सर्वोच्च मासिक संकलन असून, या आधी गेल्या वर्षी, एप्रिल २०२३ मध्ये आतापर्यंतचे सर्वोच्च १.८७ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन नोंदवले गेले होते. १ जुलै २०१७ रोजी ही अप्रत्यक्ष करप्रणाली लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच जीएसटी संकलनाने मासिक २ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

हेही वाचा >>> संयुक्त म्युच्युअल फंड खात्यांसाठी नामनिर्देशन आता पर्यायी

मार्च २०२४ मध्ये जीएसटीच्या माध्यमातून १.७८ लाख कोटींची भर तिजोरीत पडली होती. तर कर परतावा दिल्यानंतर एप्रिल २०२४ मधील नक्त जीएसटी संकलन १.९२ लाख कोटी आहे. एप्रिल २०२३च्या तुलनेत ते १७.१ टक्के अधिक आहे, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले.

सरलेल्या एप्रिलमध्ये एकूण २,१०,२६७ कोटी रुपयांचा जीएसटी महसूल जमा झाल्याची माहिती अर्थमंत्रालयाने दिली. या महसुलात, केंद्रीय वस्तू व सेवा करापोटी (सीजीएसटी) ४३,८४६ कोटी रुपये, राज्य वस्तू व सेवा करापोटी (एसजीएसटी) ५३,५३८ कोटी रुपये, तर एकात्मिक वस्तू व सेवा करापोटी ९९,६२३ कोटी रुपये (आयात वस्तूंवर जमा केलेल्या ३७,८२६ कोटी रुपयांसह) आणि १३,२६० कोटी रुपये उपकरातून (माल आयातीवर जमा झालेल्या १,००८ कोटी रुपये उपकरासह) जमा झाले आहेत, अशी माहिती अर्थमंत्रालयाने दिली.

हेही वाचा >>> सार्वजनिक गुंतवणूक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची चालक: आयएमएफ

राज्यात ३७,६७१ कोटी

मुंबई : राज्यात एप्रिलमध्ये ३७,६७१ हजार कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत त्यात १३ टक्क्यांची वाढ झाली आहे. एप्रिल २०२३ मध्ये ३३,१९६ कोटी रुपयांचे संकलन झाले होते. दुसऱ्या क्रमांकावरील कर्नाटकात १५,९७८ कोटी रुपयांचे संकलन यंदाच्या एप्रिलमध्ये झाले. गुजरातमध्ये १३,३०१ कोटी रुपये, तर उत्तरप्रदेश १२,२९० कोटी रुपये संकलनासह चौथ्या स्थानावर आहे.