लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई: भारताचा विकास दर मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत मंदावून ६.७ टक्क्यांवर येईल, असा अंदाज ‘इक्रा’ या पतमानांकन संस्थेने मंगळवारी वर्तविला. सरलेल्या आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी विकास दर ७.८ टक्के राहील, असे तिचे अनुमान आहे.भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ सरलेल्या आर्थिक वर्षात जूनअखेर संपलेल्या तिमाहीत ८.२ टक्के, सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ८.१ टक्के आणि डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ८.४ टक्के होती. ‘इक्रा’च्या मुख्य अर्थतज्ज्ञ आदिती नायर म्हणाल्या की, कमोडिटीच्या किमतीतून मिळणारा नफा आणि काही औद्योगिक क्षेत्रांतील नफा कमी झाल्याने भारताच्या एकूण मूल्यवर्धनाला (जीव्हीए) चौथ्या तिमाहीत फटका बसण्याचा अंदाज आहे. भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) आर्थिक २०२२-२३ मधील चौथ्या तिमाहीत ६.१ टक्के होते. याचवेळी त्या आर्थिक वर्षात विकास दर ७ टक्के होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताच्या विकास दराची चौथ्या तिमाहीची आकडेवारी ३१ मे रोजी जाहीर होणार आहे. त्यावेळी २०२३-२४ या पूर्ण आर्थिक वर्षाची आकडेवारीही जाहीर होईल. सरलेल्या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) आणि एकूण मूल्यवर्धन (जीव्हीए) यांच्यातील फरक १ टक्क्याच्या आसपास असेल. त्याआधीच्या तिमाहीत हा फरक १.८५ टक्के होता. सरलेल्या आर्थिक वर्षासाठी सकल देशांतर्गत उत्पादन ७.८ टक्के आणि एकूण मूल्यवर्धन ७ टक्के राहील, असे ‘इक्रा’ने नमूद केले आहे.

हेही वाचा >>>हाँगकाँगच्या आरोपानंतर आता एव्हरेस्ट आणि एमडीएच मसाल्यांच्या प्रोसेसिंग युनिटची तपासणी करण्याचे आदेश

गेल्या वर्षी मोसमी पाऊस कमी पडल्याने शेतीचे उत्पादन कमी झाले होते. आता ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी मिळू लागली असून, मागणी वाढण्याची चिन्हे आहेत. देशांतर्गत ट्रॅक्टर विक्री चौथ्या तिमाहीत वाढली आहे.- आदिती नायर, मुख्य अर्थतज्ज्ञ, इक्रा

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icra estimates 6 7 percent growth for the fourth quarter print eco news amy