वृत्तसंस्था, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील सर्वाधिक खपाची मोटार उत्पादक कंपनी मारूती सुझुकीने येत्या जानेवारीपासून मोटारींच्या किंमती वाढवत असल्याचे सोमवारी जाहीर केले. उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि वाढलेली महागाई यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.

मारूती सुझुकीने या संबंधाने सोमवारी भांडवली बाजाराला माहिती दिली. कंपनीने किंमतीतील वाढ नेमकी किती असेल हे जाहीर केले नसले तरी, मॉडेलनुसार किमतीतील वाढ वेगवेगळी असेल, असे स्पष्ट केले आहे. कंपनीने म्हटले आहे की, जानेवारी २०२४ पासून आमच्या मोटारींच्या किमतीत वाढ करण्याची योजना आखण्यात आली आहे. एकूणच वाढलेली महागाई आणि कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. त्यातूनच किंमत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. किमती फार वाढू नयेत, यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे.

हेही वाचा… विकास दराबाबत ६.४ टक्क्यांचा अंदाज , ‘एस अँड पी’चे ०.४ टक्क्यांच्या अधिक वाढीचे सुधारीत अनुमान

मारूती सुझुकीने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यात १.९९ लाख मोटारींची विक्री केली. आतापर्यंतची ही उच्चांकी मासिक विक्री ठरली आहे. याचवेळी कंपनीचा नफा सप्टेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत ८०.३ टक्क्यांनी वाढून ३,७१६ कोटी रुपयांवर पोहोचला. विक्रीत झालेली वाढ, कच्चा मालाच्या वस्तूंच्या कमी झालेल्या किमती यामुळे उत्पादन खर्चात कपात होऊन नफ्यात वाढ झाली होती.

हेही वाचा… ‘मुलाने क्रिप्टो-लालसेत सारे काही गमावले !’, युरोपीय मध्यवर्ती बँकेच्या प्रमुख लगार्ड यांची जाहीर कबुली

छोट्या मोटारींकडे पुन्हा ग्राहकांचे वळण

नागरिकांचे उत्पन्न वाढत असून, अर्थव्यवस्थेची वाढही वेगाने होत आहे. त्यामुळे आगामी दोन-तीन वर्षांत छोट्या मोटारी परवडणाऱ्या दरात पुन्हा मिळू शकतील. मागील काही काळात छोट्या मोटारींची विक्री कमी झाली असून, स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल अर्थात एसयूव्हींना ग्राहकांची सर्वाधिक पसंती दिसून येत आहे. तथापि पुढील काळातवाढत्या अर्थव्यवस्थेसह, वाढत्या आकांक्षांसह पुढे येणाऱ्या नव-मध्यमवर्गानुरूप छोट्या मोटारींना पुन्हा मागणी वाढेल, असा कंपनीचा अंदाज आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki to increase car prices from jan 2024 due to increase in production cost print eco news asj
First published on: 28-11-2023 at 08:38 IST