वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालेले (जन्म २५ एप्रिल १९३८ आणि मृत्यू १० मे २०२४) जिम सायमन्स अमेरिकी हेज फंड व्यवस्थापक होते. ते सुविख्यात गणितज्ज्ञ होते आणि जगातील ४९ व्या क्रमांकाचे (‘फोर्ब्स’ यादीनुसार) श्रीमंत व्यक्ती होते. पैसा भरपूर कमावण्याबरोबरच परतफेडीची भावना जपणारे ते एक दानशूर व्यक्तीही होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सायमन्स यांचा एकंदर प्रवास थक्क करून टाकणारा आहे. ‘क्वान्टचा राजा’ या नावानेसुद्धा त्यांना ओळखले जात होते. त्यांची नक्त संपत्ती मृत्यूसमयी ३,१०० कोटी अमेरिकी डॉलर होती. आयुष्याची सुरुवात त्यांनी गणितावरच्या प्रेमाने केली, विद्यापीठात गणित विषय शिकवला, यूएस इन्फ्लीजन्स सर्व्हिसेस या ठिकाणी नोकरी केली आणि नंतर ती नोकरी सोडून त्यांनी ‘रेनेसाँ टेक्नॉलॉजीज’ ही संस्था स्थापन केली.

हेही वाचा…‘कोटक’वरील सावट निष्प्रभ !

‘धूमकेतूचा प्रवास कसा होईल हे अगोदर सांगता येईल, परंतु सिटी ग्रुपचा शेअर कोणत्या दिशेने वाटचाल करेल हे सांगता येणार नाही,’ असे सांगणाऱ्या सायमन्स यांनी आपल्या आयुष्यात सर्वात जास्त गुंतवणूक उबर, एनव्हिडिया, मेटा, ॲमेझोन, टेस्ला आणि नोव्हा नॉरडिस्क अशा कंपन्यांमध्ये केली आणि त्यात भरपूर पैसा कमावलेला असला तरीसुद्धा या व्यवसायात नशीब आणि मेंदू याची गल्लत करणे अवघड आहे. म्हणून ती कधीही करायची नसते शेअरची निवड करण्याचा निर्णय घेताना ते नेहमी तीन प्रमुख मुद्दे विचारात घ्यायचे – १) शेअर्सची बाजारात उपलब्धता भरपूर असावी. २) त्यात उलाढाल चांगली असावी. ३) उलाढालीचे एक मॉडेल तयार करता यावे.

पैसे कमवताना कोणत्या व्यक्तीला आपली एक टीम तयार करावी लागते. साहजिकच सायमन्स यांनी टीम तयार केली, पण माणसे कशी निवडली? या संबंधात ते काय सांगतात हे तरी पाहा. ते म्हणतात, ‘माझ्याकडे अशी व्यक्ती हवी जिला गणित विषय समजतो. त्या व्यक्तीला व्यवहार करण्यासाठी जे जे ठोकताळे, नियम, सूत्रे आम्ही तयार केलेली आहेत त्याचा वापर करण्याचे कौशल्य हवे. तिला बाजारासंबधी कुतूहल वाटले पाहिजे. तिची कल्पना शक्ती चांगली असली पाहिजे. बाजारात काय काय घडते आहे याचे आकलन त्याला करता यायला हवे. वेळप्रसंगी काही मुद्दे सोडून देण्याचा व्यावहारिकपणा सुद्धा तिच्याकडे असावा.’
मग यासाठी त्यांनी वित्तीय क्षेत्रात डॉक्टररेटची पदवी असलेले नोकरीसाठी घेतले नाहीत. बिझनेस स्कूलमधून एमबीए वा तत्सम पदवी मिळवणारे घेतले नाहीत. वॉल स्ट्रीटवर बाजारात कामाचा अनुभव आहे म्हणून त्यांनी कुणाला नोकरी दिली नाही. तर ज्यांना गणितशास्त्र हा विषय समजतो त्यांनाच त्यांनी नोकऱ्या दिल्या.

हेही वाचा…विदेशी गुंतवणूकदार माघारी, मे महिन्यात २२,००० कोटी मूल्याच्या समभागांची विक्री

वाचकांना जिम सायमन्स यांच्या शिक्षणाबद्दल उत्सुकता निर्माण झाली असेल. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाबद्दल काही माहिती द्यायला हवी. त्यांचा जन्म न्यूटन (मॅसेच्युसेट्स) येथे झाला. शिक्षण न्यूटन नॉर्थ हायस्कूल येथे झाले. १९५८ ला एमआयटी, १९६१ ला युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया – बर्कले, त्यानंतर १९७८ मध्ये सर्वात यशस्वी हेज फंड व्यवस्थापक म्हणून त्यांची कीर्ती पसरली. या हेज फंडाने ३० वर्षात दरवर्षी चक्रवाढीने वार्षिक सरासरी ६६ टक्के परतावा दिला.
‘शिक्षण क्षेत्राचा कंटाळा आला म्हणून गुंतवणूक क्षेत्राकडे आलो,’ असे ते सहजपणे सांगायचे. लोक मला हुशार समजतात तो फक्त नशिबाचा भाग आहे असेही ते म्हणतात .

गुंतवणूक क्षेत्रात प्रचंड पैसा कमावून त्याने अनेक संस्थांना देणग्या दिल्या. मॅथ्स फॉर अमेरिका ही संस्था स्थापन केली. ग्रेगरी झुकरमनने त्यांच्यावर पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे – ‘दि मॅन हू सॉल्व्हड द मार्केट.’

हेही वाचा…सीमेन्समधून सीमेन्स एनर्जी लिमिटेड वेगळी होणार

‘बाजारातली माणसं’ या लेखमालेत जिम सायमन्स यांच्यावरील या ओळख-वजा लेखाच्या समावेशाचे अनेकांना आश्चर्य वाटले असेल. चालू महिन्यांत १० मे २०२४ ला ८६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. बाजारात कंपन्यांचे ताळेबंद वाचायचे की, शेअर्सच्या किमतीचे आलेख काढून त्यावर खरेदी-विक्रीचे निर्णय घ्यायचे आणि त्यासाठी गणिती सूत्रे वापरायची, हा वादाचा विषय आहे. शेअर बाजाराची गुंतवणूक दोन अधिक दोन बरोबर चार इतकी सोपी नसते. अल्गोरिदम हे नवे शास्त्र उदयास येऊ घातले आहे. गणकयंत्राचा वापर करून त्यात सेंकदा सेंकदाला माहितीचा प्रचंड साठा करून माणसाच्या बुद्धिमत्तेपेक्षा यंत्राचे तंत्र वापरून गुंतवणूक करणे, शेअर्सची खरेदी-विक्री करणे, त्यात प्रचंड पैसा मिळविणे हे काम जिम सायमन्स यांनी करून दाखविले. परंतु या विचारसरणीचा वापर करणाऱ्यांनी काही प्रसंगी प्रचंड पैसा कमावला आणि काहींनी प्रचंड फटके खाल्ले. त्यामुळे मूल्य विरूद्ध वृद्धी हा बाजारातला सनातन संघर्ष आहे. मूलभूत विश्लेषण विरुद्ध तांत्रिक विश्लेषण हासुद्धा वादंगाचा विषय आहे. हेज फंडांकडे आकर्षित होणारा पैसा हा वेगळ्या मार्गाने कमावलेला पैसा आहे का, अशीसुद्धा भीती अमेरिकी शेअर बाजाराचे नियंत्रण करणाऱ्या संस्थेला वाटते. त्यामुळे काय चांगले तर काय बरोबर याचा निर्णय प्रत्येकाने स्वतः घ्यायचा.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jim simons quant king his life journey print eco news psg