जर्मनीतील आघाडीचा तंत्रज्ञान समूह असलेल्या सीमेन्स एजीच्या भारतातील सीमेन्स लिमिटेड या कंपनीच्या संचालक मंडळाने ऊर्जा व्यवसाय स्वतंत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सीमेन्स एनर्जी लिमिटेड ही भांडवली बाजारात नव्याने सूचिबद्ध करण्यात येणार आहे.

मूळ सीमेन्स लिमिटेडमधून वेगळी करण्यात येणारी सीमेन्स एनर्जी ही कंपनी मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात सूचिबद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता सीमेन्स लिमिटेडच्या भागधारकांना एक सीमेन्स लिमिटेडच्या प्रत्येक समभागामागे सीमेन्स एनर्जी इंडियाचा एक समभाग विनामूल्य देण्यात येणार आहे.

हेही वाचा – सरकारी बँकांचा एकूण नफा १.४० लाख कोटींपुढे

सीमेन्स ही अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि ऊर्जा अशा महत्त्वाच्या क्षेत्रात जगभरात आघाडीवर आहे. आता सीमेन्स एनर्जी इंडिया ही ऊर्जा तंत्रज्ञान कंपनी बनण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. विभाजनामुळे दोन सशक्त आणि स्वतंत्र संस्था निर्माण होतील, ज्याचा बाजारपेठांना, ग्राहकांना आणि भागधारकांना फायदा होणार आहे.

हेही वाचा – चाबहार बंदराच्या संचालनासाठी भारताचा इराणशी करार ; मध्य-आशियात व्यापारात वाढीला पूरक

मुंबई शेअर बाजार मंगळवारच्या सत्रात सीमेन्सचा समभाग ७०.८० रुपयांनी वधारून ६,६९८.६० रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे २,३८,५५० कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.