-प्रमोद पुराणिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एखादी व्यक्ती एकट्याने प्रवास करीत असली, तरी तिचा जीवन प्रवास, आयुष्यातील एक एक क्षण त्रयस्थपणे, दूरून पाहता येणे हे सुद्धा रंजक आणि आनंददायी असू शकते. निलेश शहा कोटक सिक्युरिटीमध्ये असताना भेटीचा प्रसंग कधी आला नाही. परंतु त्यांचा टेम्पलटन ते कोटक हा प्रवास बघायला मिळाला आहे आणि तो अनेक मौल्यवान गोष्टींची शिकवण देणारा आहे.

एखाद्या शिक्षकाला, गुरूला समाजात आदरांचे स्थान असते. ते स्थान म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापकाला मिळावे इतक्या साध्या इच्छेने निलेश यांना या व्यवसायात काम करावेसे वाटते. आणि आज या व्यवसायात २५, ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते स्थान आपण मिळवू शकलो याचा रास्त अभिमानही त्यांना आहे. परंतु मूळात ही इच्छा त्यांच्या मनात का निर्माण झाली? याचे कारणही मजेशीर आहे.

निलेश यांनी ज्या स्त्रीला आपल्या आयुष्यात अर्धांगिनी हे स्थान दिले, ती स्त्री कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करत असल्याने लग्नाअगोदरच्या भेटीगाठीत दोघेजण सहज सिनेमा पाहण्यासाठी गेले होते. चित्रपटगृहातील खिडकीपुढे तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे असताना, निलेश यांच्या होणाऱ्या पत्नीचा कोणीतरी विद्यार्थी पुढे येतो आणि पुढच्याच क्षणी रांगेत उभे राहून तिकिटे खरेदी करण्याऐवजी हातात थेट सिनेमाची तिकिटे येतात. अन्य एका प्रसंगी बस स्टॉपवर उभे असताना कोणीतरी गाडी थांबवतो आणि लिफ्ट देतो. असा सन्मान पैशाने विकत घेता येत नाही. तो आपल्या कामातून, कर्तबगारीतून मिळवावा लागतो.

आणखी वाचा-बाजारातली माणसं : पराग पारिख…अनोखा शेअर दलाल

सीएच्या परीक्षेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या निलेश यांना उत्पादन करणाऱ्या कंपनीत नोकरी करायची होती. वित्तीय सेवा देणाऱ्या संस्थेत काम करणे हे त्यांच्या कधीच डोक्यात नव्हते. प्रथम आयसीआयसीआय सिक्युरिटीजमध्ये नोकरी लागली. त्यानंतर उत्पादन क्षेत्राच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त महत्त्व पुढील काळात वित्तीय सेवा पुरवणाऱ्या व्यवसायाला किंवा नोकरीला मिळणार आहे, असे वरिष्ठ मंडळींनी सांगितले. आणि पुढे मग निलेश यांना मागे वळून कधीच बघावे लागले नाही. म्युच्युअल फंडाची शिखर संस्था ‘ॲम्फी’चे अध्यक्ष होण्याचा सन्मान मिळणे. पंतप्रधानांनी निर्माण केलेल्या सल्लागार मंडळात काम करण्याची संधी मिळणे, असे या क्षेत्रात अनेक मान-सन्मान त्यांना मिळाले.

टेम्पलटन म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूक विभागाचा प्रमुख म्हणून १९९७ ला त्यांनी जबाबदारी घेतली. त्यानंतर आयसीआयसीआय म्युच्युअल फंडाचा डेप्युटी मॅनेजर डायरेक्टर होण्याची संधी आणि त्यानंतर आता कोटक महिंद्र ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करणे. अशाप्रकारे आयुष्यात जबाबदाऱ्या घेऊन काम करण्याची संधी मिळाल्यानंतर उगाचच अफवा पसरवणारी मंडळी अफवा पसरवण्याचा उद्योग करतात, त्याकडे दुर्लक्ष केलेले बरे.

म्युच्युअल फंडाची शिखर संस्था ‘ॲम्फी’ला फंडाच्या विक्रीचे काम करणारा वितरकांचा विचार करण्याचे काहीच कारण नाही. कारण ही संस्था म्युच्युअल फंड घराण्यांनी अर्थात ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आहे. इतर उद्योगांच्या ज्याप्रमाणे संस्था आहेत. जसे फिक्की, सीआयआय, वेगवेगळे चेंबर ऑफ कॉमर्स वगैरे संस्थामध्ये व्यक्ती निर्धारीत निकषांत बसत असेल तर त्या संस्थेची सभासद होऊ शकते. ‘ॲम्फी’ या संस्थेत मात्र असे नाही हे कटू सत्य म्युच्युअल फंड वितरकाने मान्य करायलाच हवे. असे असले तरी आजसुद्धा आपला व्यवसाय म्युच्युअल फंड वितरकाशिवाय वाढू शकणार नाही, याची या संस्थेच्या अध्यक्षांना पुरेपूर जाणीव असते. अशावेळेस या संस्थांचे होऊन गेलेले वेगवेगळे अध्यक्ष कसे वागले? बोलणे एक, करणे एक… याचेही अनुभव वितरकांनी घेतले आहेत.

आणखी वाचा-बाजारातली माणसं : कंपन्यांवर हल्ले करणारा लुटारू?

निलेश शहा याबाबतीत इतरांपेक्षा त्यांचे वेगळेपण आणि श्रेष्ठत्व हे एका वेगळ्या विचारामुळे सिद्ध करतात. म्हणून काश्मीर ते कन्याकुमारी आणि मुंबई ते कोलकाता कोणत्याही छोटया मोठ्या शहरात गुंतवणूक या विषयावर बोलण्यासाठी निलेश शहा यांची जाण्याची तयारी असते. गुंतवणुकीच्याबाबत मोकळेपणाने आपले मत मांडणे, व्यवसाय प्रचंड वाढणार आहे, कारण देशाची आर्थिक प्रगती होणार आहे, याचे फक्त गुलाबी चित्र रंगवण्याचे काम ते करत नाही. तर वितरकांना सुद्धा वेळप्रसंगी खडे बोल सुनावतात हे त्यांचे वैशिष्ट्ये आहे.

ज्या ज्या म्युच्युअल फंडाच्या जबाबदाऱ्या आतापर्यत त्यांनी सांभाळल्या. त्या त्या म्युच्युअल फंडाना त्यांनी मोठे केले. मोठे करत असताना अडचणींना देखील त्यांना तोंड द्यावे लागले. इतर वित्तीय सेवा पुरवणारे आणि म्युच्युअल फंडात काम करणारे वितरक यांच्यासाठी नियम वेगळे यावर ते कडाडून टीका करतात- ‘आमच्यावरची बंधने आणखी वाढवा. ती बंधने पाळून या क्षेत्रात चांगली कामगिरी करून दाखवण्याची आमच्या अंगात धमक आहे. पण पैसे बुडवणाऱ्या संस्था, चुकीच्या पद्धतीने आपली प्रोडक्ट्स विकणाऱ्या संस्था यांना सुद्धा म्युच्युअल फंड उद्योगासारख्याच कडक नियमांनी पहिल्यांदा बांधा आणि त्यानंतर मग कोणाच्या अंगात किती दम आहे ते मी दाखवितो.’ असे आव्हान ते बाजार नियंत्रक ‘सेबी’ला देतात. यामुळे वितरकांना निलेश शहा हवेहवेसे वाटतात. आमच्याकडून ज्या चुका होतात त्या चुका तुम्ही करू नये. एवढी माफक अपेक्षा आमची म्युच्युअल फंडाकडून आहे, असे जेव्हा एखादा गुंतवणूकदार त्यांना सांगतो त्यावेळेस मोकळेपणाने म्युच्युअल फंडाच्या झालेल्या चुका मान्य करण्याची ते तयारी दाखवतात.

आणखी वाचा-बाजारातली माणसं: ना हर्ष, ना खेद !

म्युच्युअल फंडस् जेवढे मोठे होतील तेवढे बाजाराला स्थैर्य लाभेल. परदेशी गुंतवणूकदार संस्थावर अवलंबून राहावे लागणार नाही. म्युच्युअल फंडस् आणखी मोठे व्हावेत, त्यात आणखी जास्त गुंतवणूकदार यायला हवेत. यासाठी निलेश शहा यांनी ‘सेबी’कडे एक अत्यावश्यक पाठपुरावा करावा, तो असा की mutual funds are subject to market risk या अस्वीकरण (डिस्क्लेमर) म्हणून प्रचलित वाक्यात शेवटचा ‘रिस्क’ हा शब्द काढून टाकावा. त्याऐवजी UP’s and down किंवा चढ उतार एवढा जरी बदल केला तरी त्यांचा फार उपयोग होईल. जी व्यक्ती गुंतवणूकदार झालेली आहे. त्या व्यक्तीला चढ-उतार हा शब्द समजतो. परंतु जी व्यक्ती गुंतवणूकदार नाही. ती व्यक्ती risk या शब्दाचा अर्थ ‘मुद्दल बुडते’ असाच करून घेते. आजपर्यंत कोणत्याही म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेने १० रुपये दर्शनी किंमतीचे शून्य रुपये केलेले नाहीत. काही योजना २ रुपये किंवा ४ रुपये इतक्या खाली येऊन सुद्धा पुन्हा दर्शनी किंमतीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. यामुळे risk हा शब्द बदलण्याची अत्यंत गरज आहे.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilesh shah templeton to kotak mutual fund advanced travel print eco news mrj
Show comments