आपल्या गुंतवणुकीवर जास्तीजास्त परतावा (रिटर्न) मिळण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकतो याचीही आजकाल बहुतेकांना जाणीव आहे. तथापि शेअर्समध्ये थेट (डायरेक्ट) गुंतवणूक करण्यास आजही बहुतांश लोक धजावत नाहीत. कारण या गुंतवणुकीबाबतचे अज्ञान व त्यामुळे असणारी आकारण भीती. मात्र यावरही सामान्य गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंड हा एक अत्यंत सहज व सुलभ पर्याय उपलब्ध आहे. पुढील काही लेखातून आपण म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबाबत माहिती घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यासाठी सर्व प्रथम म्युच्युअल फंड म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. म्युच्युअल फंड ही एकत्रित गुंतवणूक असून यामध्ये ज्यांना गुंतवणुकीत सारखीच/समान जोखीम घ्यावयाची आहे असे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाच्या एका विशिष्ट योजनेत आपली गुंतवणूक करीत असतात. अशी एकत्रितपणे गुंतविलेली रक्कम संबंधित म्युच्युअल फंडाद्वारे अशा गुंतवणूकदारांची जेवढी जोखीम घ्यायची तयारी असेल त्यानुसार गुंतवणुकीच्या पर्यायात गुंतविली जाते. यासाठी प्रामुख्याने डेट फंड, बॅलन्स फंड व इक्विटी फंड असे तीन पर्याय असतात.

हेही वाचा : Money Mantra : आधारपासून ते डीमॅटपर्यंत अन् बँक लॉकरपासून ते एफडीपर्यंत ही सर्व कामे डिसेंबरमध्ये पूर्ण कराच अन्यथा…

यातील डेट फंडातील गुंतवणूक सरकारी कर्ज रोखे, खाजगी कंपन्याचे कर्ज रोखे, कमर्शियल पेपर, कंपनीच्या मुदत ठेवी यासारख्या पर्यायात केली जाते आणि यामुळे या गुंतवणुकीतील जोखीम तुलनेने कमी असते मात्र पोस्ट किवा सरकारी बँकातील ठेवी यांच्यापेक्षा थोडी जास्त असते आणि यामुळे अशा गुंतवणुकीतून मिळणारा रिटर्न बँक किंवा पोस्टातील गुंतवणुकीच्या तुलनेने थोडा जास्त असतो. (सुमारे १ ते १.५%). डेट फंडाचे एमआयपी,एफएमपी, जी सेक, एमएमएफ असे विविध प्रकार आहेत याची माहिती आपण पुढील लेखात घेऊ.

बॅलन्स फंडातील गुंतवणूक फक्त डेटमध्ये न करता डेट आणि इक्विटी या दोन्हीही पर्यायात केली जाते. आपण बॅलन्स फंडात गुंतविलेल्या रकमेपैकी सुमारे ६० ते ६५% इतकी रक्कम इक्विटी मध्ये(शेअर्स मध्ये) तर ३५ ते ४०% डेट मध्ये गुंतविली जाते परिणामत: गुंतवणुकीत थोडे रिस्क घेतले जाते. या पर्यायातील दीर्घकालीन गुंतवणुकीतून सुमारे १२ ते १४% इतका रिटर्न मिळू शकतो मात्र मिळेलच याची खात्री देता येत नाही. ज्या गुंतवणूकदारांना साधारण धोका घ्यायची तयारी असेल त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

हेही वाचा : Money Mantra : स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप अन् मल्टी कॅप फंडांमध्ये फरक काय?

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा तिसरा पर्याय म्हणजे इक्विटी फंड. या प्रकारात गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणुकीपैकी सुमारे ९०% इतकी रक्कम इक्विटीमध्ये गुंतविली जाते आणि म्हणून या गुंतवणुकीतील रिस्क वरील दोन पर्यायांपेक्षा जास्त असते आणि त्यातून मिळणारा रिटर्नही तुलनेने जास्त असतो दीर्घकालीन गुंतवणुकीतून साधारणपणे १४ ते १६% इतका रिटर्न मिळू शकतो मात्र मिळेलच याची खात्री देता येत नाही. इक्विटी फंडाचे विविध प्रकार असून याची माहिती आपण पुढील लेखात घेऊ.

सामान्य गुंतवणूकदारास शेअर बाजाराची तसेच रोखे बाजाराची (डेट मार्केट्स) फारशी माहिती नसते तरी सुद्धा तो म्युच्युअल फंडामार्फत या दोन्हीही ठिकाणी आपली गुंतवणूक करू शकतो व आपल्या गुंतवणुकीतून पारंपारिक गुंतवणुकीपेक्षा जास्त रिटर्न मिळवू शकतो. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांस आपल्या कुवतीनुसार गुंतवणूक करण्याचे विविध सुलभ पर्याय असल्याने आजकाल मध्यमवर्गीय व उच्चमध्यमवर्गीय गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा कल दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. पुढील लेखात आपण म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची माहिती घेऊ.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why people afraid to invest in mutual funds mmdc css