यशस्वी उद्योजकांच्या प्रगतीचे रहस्य हे त्यांच्या कार्यपद्धतींमध्ये असते. जगप्रसिद्ध उद्योगांच्या अशा काही कार्यपद्धतींचा परिचय जयप्रकाश झेंडे यांच्या जगप्रसिद्ध उद्योजकांच्या कार्यपद्धती या पुस्तकातून होतो. सोप्या भाषेत आणि छोटय़ा उदाहरणांसहित कार्यपद्धतींत मोलाची सुधारणा घडवून आणणाऱ्या संकल्पनांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. प्रत्येक स्तरावर उपयुक्त ठरणाऱ्या या कार्यपद्धतींना समजून घेत त्या अमलात कशा आणल्या गेल्या, याची रंजक उदाहरणेही यात नमूद करण्यात आली आहेत. यात कायझेन, फाइव्ह एस, क्वालिटी सर्कल, टोटल क्वालिटी मॅनेजमेन्ट, टोटल प्रॉडक्टिव्ह मेन्टेनन्स, जस्ट इन टाइम, सिंगल मिनिट डायएक्स्चेंज, बेन्चमार्किंग, लीन क्वालिटी सर्कल, कल्पनांचे व्यवस्थापन, व्हॅल्यू इंजिनीअरिंग, सिक्स सिग्मा कार्यप्रणाली, आयडिया बँक, जोहॅरी विन्डो, पॅरेटो नियम,ताकसंधो पृथ:करण, कॅच देम यंग अशा विविध संकल्पना विशद केल्या आहेत. त्याचबरोबर उत्कृटता, सामना बदलांचा, गुणवत्ता, उत्तम कार्यगट करताना, उत्तम कल्पना निर्माण करताना.., भावनांचे व्यवस्थापन, समस्या आणि मार्ग, व्यवस्थापनांची कामे यासारखे उपयुक्त लेखही या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत.

जगप्रसिद्ध उद्योजकांच्या कार्यपद्धती – जयप्रकाश झेंडे, साकेत प्रकाशन, पृष्ठे – २७९, मूल्य – २४५ रु.

Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Who will give the manifesto of health guarantee for the elderly
वृद्धांच्या आरोग्याच्या हमीचा ‘जाहीरनामा’ कोण देणार?

 

सक्षम नेतृत्वगुणांचा विकास

स्मार्ट लीडरशिप – ‘सीईओंसाठी नवी दृष्टी’ या पुस्तकात १२ यशस्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. कार्यक्षमता वृद्धिंगत करण्यासाठी शोधाव्या लागणाऱ्या नवनव्या मार्गाचा प्रवास या दिग्गजांनी कथन केला आहे. देशाच्या प्रगतीत आपला स्वतंत्र ठसा उमटवलेले कुमारमंगलम बिर्ला, एन. आर. नारायणमूर्ती, राहुल बजाज, के. व्ही. कामत यांनी व्यक्त केलेली मनोगते या पुस्तकात समाविष्ट केली आहेत. नेतृत्व, निर्णयक्षमता, संघटनकौशल्य, गुणवत्तेला प्रोत्साहन, विकासावर लक्ष केंद्रित करणे याबाबत मार्गदर्शन केले आहे. तसेच जागतिकीकरण – अश्विन दाणी, परिवर्तन या विषयावर रघुनाथ माशेलकर, सुयोग्य सुरुवात – शिखा शर्मा, निर्णय घेणे – सुभाष चंद्रा, उद्योग महान बनवताना.. – एस. रामादुराई, विलीनीकरण, कंपनी ताब्यात घेणे – अजय पिरामल, सहकारी संस्था चालवताना.. – ज्योती नाईक यांनी मार्गदर्शन केले आहे.

स्मार्ट लीडरशिप – गीता पिरामल, जेनिफर नेतरवाला, मेहता पब्लिशिंग हाऊस, पृष्ठे – १७६, मूल्य – १५० रु.

 

प्रभावी संवाद साधण्यासाठी..

व्यावसायिक वातावरणात काम करताना संभाषण कौशल्याची नितांत आवश्यकता असते. संवादाच्या मूलभूत संकल्पना जाणून घेतल्या तर त्यात कौशल्य संपादन करणे सहजशक्य बनते. या पुस्तकात लिखित आणि मौखिक संभाषणासंबंधीची सविस्तर माहिती दिली आहे. त्यासोबत अहवाल, कार्यक्रमपत्रिका, इतिवृत्तान्त, बहिर्गत पत्रव्यवहार यांचा समावेश आहे. तसेच भाषण, समूहमन यांचा समावेश आहे. दृक्श्राव्य साधने आणि मल्टिमीडिया सादरीकरण यावरही स्वतंत्र प्रकरण बेतलेले आहे.

या पुस्तकात व्यावसायिक संभाषणातील आधुनिक तंत्राविषयीची माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकाचे वैशिष्टय़ असे की, यात देण्यात आलेली विविध माहिती ही उदाहरणांसहित देण्यात आली आहे तसेच व्यवस्थापकीय आणि व्यावसायिक अहवाल तयार करण्याबाबतचे प्रत्येक स्तर या पुस्तकात विशद करण्यात आले आहेत. या पुस्तकातील पुरवण्यांमध्ये वारंवार चुकीचे स्पेलिंग केले जाणारे शब्द, गोंधळात टाकणाऱ्या शब्दांचे अचूक उपयोग, वाक्य दुरुस्त्या यांचा समावेश वाचकांना उपयुक्त ठरेल.

अधिक प्रभावी संवाद – व्यावसायिकांसाठी नेमके मार्गदर्शन : जे. व्ही. विलानिलम, अनुवाद – शैला सोमण,

पृष्ठे – २३९, किंमत – २२५ रु.

 

संभाषणचातुर्याविषयी..

संजीव परळीकर लिखित ‘चार शब्द द्यावे – घ्यावे’ या पुस्तकात संभाषणकौशल्य विकसित करण्यासाठीच्या युक्तीच्या गोष्टी सांगितल्या आहेत. संभाषणात टीका, सल्ला यांचा अंतर्भाव कितपत आणि कसा असावा, यावर हे पुस्तक बेतलेले आहे. कुणाबाबत टीकात्मक बोलताना कुठली पथ्ये पाळावीत आणि कुणी आपल्यावर टीका केली तर ती कशी पेलावी तसेच सल्ला कसा द्यावा व घ्यावा याबाबत वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून लिहिण्यात आले आहे. घरच्या व्यक्ती, ग्राहकवर्ग यांच्याशी संवाद कसा साधावा, याविषयीही या पुस्तकात मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्याचबरोबर भावनिक संतुलन कसे राखावे यावरही लेखकाने भाष्य केले आहे.

चार शब्द द्यावे – घ्यावे- संजीव परळीकर, मेहता पब्लिशिंग हाऊस, पृष्ठे – ६०, किंमत – ७० रु.

 

झटपट व्यक्तिमत्त्वविकासासाठी..

संजीव परळीकर लिखित ‘झटपट व्यक्तिमत्त्वविकास’ या पुस्तकात आत्मपरिवर्तनाचे नवे तंत्र सांगितले आहेत. तंत्रज्ञानावर आधारित स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी जी नवनवी कौशल्ये आत्मसात करणे अत्यावश्यक बनली आहेत, त्याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. स्वत:त घडवावे लागणारे बदल, व्यक्तिमत्त्वातील लवचीकता यावर सविस्तर लिहिण्यात आले आहे. या पुस्तकात यशाचे नवे शास्त्र, मनोधारणेतील परिवर्तन, झटपट व्यक्तिमत्त्वविकास म्हणजे काय? चला, प्रेरित होऊ या, झटपट बदल – फक्त तीन दिवसांत अशी स्वतंत्र प्रकरणे आहेत. कमीत कमी दिवसांत व्यक्तिमत्त्वात बदल करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरू शकेल.

झटपट व्यक्तिमत्त्वविकास – संजीव परळीकर, मेहता पब्लिशिंग हाऊस, पृष्ठे – ६२, किंमत – ५० रु.