माझ्या पहिल्यावहिल्या परदेशवारीमध्ये मला आलेला अनुभव स्तिमित करणारा होता. अमेरिकन विद्यापीठातल्या डोम्रेटरी रूममध्ये माझी व्यवस्था केली होती. मला आंघोळ करायची होती. आंघोळीसाठी तिथे सगळ्यांसाठी सामायिक स्नानगृहं होती. ही स्नानगृहं बघून मला धक्काच बसला, कारण या स्नानगृहांना दरवाजे नव्हते. दरवाजांच्या ऐवजी स्नानगृहांना अर्धपारदर्शक प्लास्टिकचे पडदे होते. कुणीही तिथे येऊ शकत होते आणि स्नानगृहात डोकावू शकत होतं. आता माझ्यासमोर दोनच पर्याय होते. एक तर प्रचंड मानसिक दडपणाखाली आंघोळ करायची किंवा चक्क आंघोळ करायचीच नाही. त्या परिस्थितीत मी काय केलं हे महत्त्वाचं नाही. पण शाळेबाहेर आलेले अनुभव आणि शाळेत दिले जाणारे ज्ञान यांची सांगड जेव्हा आपले विद्यार्थी घालू शकत नाहीत तेव्हा त्यांची मन:स्थिती ही माझ्या त्यावेळच्या मन:स्थितीसारखी होते, असं मला वाटतं.   
ज्ञानाचा प्रवास हा शिक्षकाकडून विद्यार्थ्यांकडे होतो आणि मग ते ज्ञान एखाद्या स्पंजप्रमाणे विद्यार्थी शोषून घेतात, ही संकल्पना आता ज्ञानरचनावादामध्ये मोडीत निघाली आहे. ‘शिकणं’ ही एक सामाजिक प्रक्रिया आहे आणि ती जशी शाळेत घडते, तशी शाळेबाहेरसुद्धा घडत असते. एखादी नवीन घटना पाहिली की त्याचा अर्थ कसा लावायचा किंवा संपूर्णपणे नवीन परिस्थितीमध्ये कसं ज्ञान मिळवयाचं हे पूर्णपणे शिकणाऱ्याच्या पूर्वानुभवावर आणि पूर्वज्ञानावर अवलंबून असतं.         
खरं म्हणजे विज्ञान हे धर्म, जात, पंथ, िलग, भाषा असे कुठलेच भेद मानत नाही. विज्ञान आणि वैज्ञानिक ज्ञान हे त्या अर्थाने वैश्विक आहे, सर्वासाठी समान आहे. हा दृष्टिकोन संशोधक आणि बहुतेक विज्ञान शिक्षक मान्य करतात. पण असं असलं तरी विद्यार्थ्यांची सांस्कृतिक पाश्र्वभूमी, धार्मिक समजुती आणि त्याचं ‘मुलगा’ किंवा ‘मुलगी’ असणं यावर विद्यार्थ्यांचं विज्ञान शाखेकडे वळणं अवलंबून असतं. होमी भाभा विज्ञान केंद्रात प्रा. सुग्रा चुनावाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनातून असं आढळून आलं आहे की, एखाद्या विद्यार्थ्यांचं विज्ञानातलं आकलन किती असेल, हे त्या विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीवर अवलंबून असतं.
विद्यार्थ्यांच्या विज्ञानाविषयीच्या दृष्टिकोनावर जे घटक परिणाम करतात, त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक समजुतींचा समावेश असतो. काही वेळा या समजुती धार्मिक मूल्यांच्या विरुद्धही असतात.
शाळेमध्ये विज्ञान शिकत असताना लक्षात घ्यावा लागणारा दृष्टिकोन आणि विद्यार्थ्यांच्या घरातलं वातावरण, तिथे वापरावं लागणारं ज्ञान यांच्यात तफावत आढळते. याचा परिणाम असा होतो की, एकतर विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समस्या निर्माण होतात किंवा तो विज्ञान शिकण्यापासून फारकत घेतो. मग ज्ञान संपादन न करता केवळ परीक्षेत जास्तीतजास्त मार्क मिळवण्याच्या मागे विद्यार्थी लागतो. म्हणजेच विद्यार्थ्यांनी खरोखरच विज्ञान शिकावं असं वाटत असेल तर त्यांना शिकवलं जाणारं ज्ञान आणि त्यांना बाह्य़ जगात येणारे अनुभव यांची जास्तीतजास्त सांगड घालण्याची गरज आहे.   
काही देशांमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती लक्षात घेऊन विज्ञान अभ्यासक्रमात योग्य ते बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ, अरब लीग एज्युकेशनल, कल्चरल अँड सायंटिफिक ऑर्गनायझेशन (ALECSO) या संस्थेने अरब समाजाच्या सामाजिकतेचा विचार करून विज्ञानाचा अभ्यासक्रम तयार केला. पण त्यांच्या असं लक्षात आलं की, हा अभ्यासक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आणि वर्गातलं वातावरण समाजातल्या सांस्कृतिक वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी शिक्षण देण्याच्या पद्धतीमध्येच आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. अर्थात असा बदल घडवून आणण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागेल, हेही त्यांच्या लक्षात आलं.        
विज्ञान शिक्षण घेण्यावर विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणाचा परिणाम होतो का आणि जर होत असेल तर प्रभावी विज्ञान शिक्षणासाठी कोणते बदल करायला हवेत यासंबंधी युरोपमध्येसुद्धा संशोधन केलं गेलं आहे. विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणाशी जुळवून घेणारा अभ्यासक्रम आणि शिकवणं असेल तर विज्ञान शिक्षण प्रभावी होतं, हेच या संशोधनातूनसुद्धा अधोरेखित झालं. जगातल्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी यासाठी विविध उपक्रम, अभ्यासक्रम, सृजनशील साहित्य निर्माण केलं आहे.       
विज्ञान हे वस्तुनिष्ठ आहे, विज्ञानात मानवी मूल्यांना स्थान नाही असा विज्ञानविषयीचा एकांगी दृष्टिकोन अनेक विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे वळण्यापासून परावृत्त करतो. त्याऐवजी विज्ञानाची सांगड जर सामाजिक आणि व्यावहारिक जीवनाशी घातली गेली तर अनेक जण विज्ञानाकडे वळतील. त्याचप्रमाणे हेसुद्धा सांगावंसं वाटतं की, जर विज्ञान शिक्षण मातृभाषेतून दिलं तर ते अधिक चांगल्या प्रकारे समजतं.
आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल विद्यार्थाच्या मनात काही कल्पना असतात. या कल्पना वैज्ञानिक निकषांवर चुकीच्यासुद्धा असू शकतात. पण या कल्पनांमागे विद्यार्थ्यांचं स्वत:चं असं एक तर्कशास्त्र असतं. वर्गामध्ये विज्ञान शिकवत असताना जर या कल्पना आपण खोडून काढायला लागलो तर विद्यार्थी विज्ञानापासून दूर जाण्याचा धोका असतो. त्याऐवजी जर आपण विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या या कल्पना समजून घेऊन त्यांना विज्ञानाची जोड दिली तर पुस्तकातून शिकवलं जाणारं विज्ञान आणि विद्यार्थ्यांचं भावविश्व यांची सांगड आपण घालू शकू. यासंदर्भात कॅनडामध्ये एक नावीन्यपूर्ण प्रयोग केला गेला. विद्यार्थ्यांना वहीच्या पानाचे दोन भाग करायला सांगितले. एका भागात त्यांनी विज्ञानात शिकलेल्या संकल्पना लिहायच्या होत्या आणि त्या वैज्ञानिक संकल्पनांविषयी त्यांच्या मनात काय कल्पना आहेत, हे त्याच पानावर दुसऱ्या भागात लिहायला सांगितले होते. या वह्य़ा म्हणजे जणू वैज्ञानिक दस्तऐवज झाले. या वह्य़ांवरून विद्यार्थ्यांच्या मनात काय कल्पना आहेत, ते या कल्पना कशा प्रकारे मांडतात, त्यांचं भाषाप्रभुत्व कसं आहे, अशा अनेक गोष्टी समजू शकल्या. यावरून आपल्या शिकवण्यामध्ये कसे बदल करावेत, हे शिक्षकाला समजू शकतं. जोआन सोलोमन हिने वर्गात शिकवलं जाणारं विज्ञान आणि विद्यार्थ्यांचं शाळेबाहेरचं विश्व यांची सांगड कशी घालायची यासंदर्भात अशा १५ उपाययोजना सुचवल्या आहेत.
भारताच्या बाबतीत बोलायचं तर आपल्याकडे अनेक गोष्टींमध्ये विविधता आढळते. वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीमधून आलेले, वेगवेगळ्या जाती-धर्माचे, पंथाचे विद्यार्थी एकत्रपणे शिक्षण घेतात. पण तरीसुद्धा विज्ञान शाखेतून शिक्षण घेणाऱ्यांमध्ये आपण मुलींचे प्रमाण ३९%, अभियांत्रिकीमध्ये २२% आणि शेतकी अभ्यासक्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण १९% आहे. ‘युरोपिअन कमिशनोढ7’च्या आíथक साहाय्यातून राबविण्यात येणाऱ्या ‘विज्ञान शिक्षण आणि विविधता’ या प्रकल्पासाठी होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातर्फे संशोधन करण्यात आलं. या संशोधनाचा एक भाग म्हणून करण्यात आलेल्या शिक्षकांच्या सर्वेक्षणात असं आढळून आलं की, विज्ञान शिक्षणात संस्कृती, परंपरा, सामाजिक मूल्य यांनाही स्थान असतं, हे शिक्षकांना माहीत नाही आणि ज्यांना याची जाणीव आहे, त्यांना विज्ञान शिक्षणात त्याचा कसा वापर करावा, हे माहीत नाही. त्याचप्रमाणे विज्ञान म्हणजे काय, विज्ञानाचं स्वरूप कसं असतं याविषयीच्या त्यांच्या कल्पनासुद्धा स्पष्ट नसल्याचं जाणवलं. वर्गामध्ये विज्ञान शिकवताना आवश्यक असणाऱ्या विश्लेषणात्मक आणि निर्णायक विचारपद्धतीचाही अभाव आढळला.
विज्ञान शिकवत असताना विद्यार्थ्यांना त्या विज्ञान संकल्पनांविषयी काय वाटतं, त्यांचे यासंदर्भातले अनुभव काय आहेत हे व्यक्त करण्याची संधी देणं गरजेचं आहे. आपले अनेक शिक्षक पारंपरिक ‘खडू-फळा’ पद्धतीने प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थीसंख्या असलेल्या वर्गात मोठय़ा कार्यक्षमतेने शिकवतात. पण, विद्यार्थ्यांना विश्लेषणात्मक विचार करायला प्रवृत्त करण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीच साधनं नसतात. त्यासाठी शिक्षकांनी आणि शाळेनेच पुढाकार घेऊन साहित्य निर्मिती करण्याची गरज आहे.
वेगवेगळी सामाजिक, सांस्कृतिक पाश्र्वभूमी असलेल्या, वेगवेगळी कुवत असलेल्या आणि वेगवेगळे अनुभव विश्व असणाऱ्या आपल्या वर्गात बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना समान संधी देणारा अभ्यासक्रम आणि विज्ञान शिक्षण देण्याची पद्धती विकसित करणं गरजेचं आहे.
आज आंतरराष्ट्रीय परीक्षांमधून भारतीय विद्यार्थ्यांची कामगिरी फारशी समाधानकारक नाही. त्याचप्रमाणे शिक्षणात एकात्मीकरण आणून त्याचे सार्वत्रीकरण करण्याच्या ध्येयापासून आपण खूप लांब आहोत. त्यामुळे आज गरज आहे ती आपल्या देशातल्या विविधतेला समजून त्याचा अंतर्भाव प्रत्यक्ष विज्ञान शिक्षणात करण्याची आणि जर तसं झालं तरच वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक पाश्र्वभूमी असलेल्या सगळ्या मुलांना विज्ञान शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेता येईल.          

chitranata@gmail.com
(समन्वयक आणि अनुवाद : हेमंत लागवणकर)  

america student protest
अमेरिकेतील विद्यापीठं आंदोलनाचं केंद्र म्हणून का ओळखली जातात? या आंदोलनांचा इतिहास काय?
telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!