मागील लेखामध्ये नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेच्या भूगोल घटकामधील मूलभूत संज्ञा, संकल्पना आणि प्राकृतिक भूगोलाची तयारी कशी करावी ते पाहिले. या लेखामध्ये सामाजिक व आर्थिक भूगोलाच्या तयारीबाबत पाहू.

सामाजिक भूगोल

यामध्ये राजकीय, मानवी आणि लोकसंख्या भूगोल हे उपघटक विचारात घेता येतील.

राजकीय भूगोल:

प्रशासकीय विभागातील जिल्हे, त्यांची मुख्यालये व त्यांची वैशिष्ट्ये, जिल्ह्यांची कालानुक्रमे निर्मिती, महत्त्वाची शहरे, आर्थिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे यांच्या टेबलमध्ये नोट्स काढाव्यात.

राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा, इतर राज्यांच्या सीमेवरील जिल्हे, जिल्ह्यांच्या सीमा म्हणून उपयुक्त ठरणारी नदी/ डोंगर/ नैसर्गिक भूरूप आणि राज्याचा राजकीय नकाशाही व्यवस्थित अभ्यासणे आवश्यक आहे.

हेही वाचा >>> नोकरीची संधी : इंडियन कोस्ट गार्डमधील संधी

लोकसंख्या भूगोल

भारताच्या व राज्याच्या लोकसंख्येचा साक्षरता, नागरीकरण, लिंगगुणोत्तर, रोजगार, लोकसंख्येची घनता या मुद्द्यांच्या आधारे आढावा घ्यावा. जन्मदर, मृत्यूदर, बाल लिंगगुणोत्तर, माता मृत्यूदर, अर्भक मृत्यूदर, बाल मृत्यूदर यांची माहिती असायला हवी.

यामध्ये सन २००१ व २०११च्या जनगणनेची तुलना, वरील मुद्द्यांबाबत सर्वाधिक व सर्वात कमी प्रमाण असलेली तीन राज्ये, तुलनेने सर्वात जास्त व सर्वात कमी वाढ झालेली राज्ये व सर्व बाबतीत महाराष्ट्राचे दोन्ही वर्षांमधील स्थान तसेच महाराष्ट्राच्या बाबतीत सर्वाधिक व सर्वात कमी प्रमाण व वाढीचे जिल्हे अशा टेबलमध्ये नोट्स काढणे फायदेशीर ठरेल.

मानवी भूगोल

वसाहतींचे प्रकार, आकार, स्वरूप, ठिकाण व आर्थिक महत्त्व पहायला हवेत. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची वसाहत आहे हे समजून घेता आले तर उत्तम. पण माहिती नसल्यास वसाहतींचे प्रकार नीट अभ्यासले असतील तर एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी वसाहत कोणत्या प्रकारे विकसित झालेली असू शकेल याचा अंदाज नक्की बांधता येऊ शकतो.

स्थलांतराची कारणे, स्वरूप, समस्या, परिणाम व उपाय इत्यादी दृष्टींने अभ्यास आवश्यक आहे. या बाबतीत ’आकडेवारी’ हा मुद्दा महत्त्वाचा आहे. विशेषत: महाराष्ट्राच्या संदर्भातील स्थलांतराची आकडेवारी (म्हणजे टक्केवारी) आर्थिक पाहणी अहवालामधून अद्यायावत करून घ्यायला हवी. यामध्ये स्थलांतरातील सामाजिक घटकांचे उतरत्या क्रमाने प्रमाण, कारणांची उतरत्या क्रमाने टक्केवारी, कोणत्या ठिकाणाहून स्थलांतर होत आहे त्यांच्या टक्केवारीचा उतरता क्रम ही आकडेवारी महत्त्वाची आहे.

हेही वाचा >>> ताणाची उलगड : वादाला महत्त्व किती?

आर्थिक भूगोल

आर्थिक भूगोल हा मुख्यत: तथ्यात्मक घटक आहे. तरीही याबाबत विश्लेषणात्मक मुद्दे विचारले जाऊ लागले आहेत. त्यामुळे एनसीईआरटीच्या पुस्तकांमधून आर्थिक भूगोलाच्य पायाभूत संकल्पना समजून घेतल्या तर फायदा होईल. भारताच्या आर्थिक भूगोलावर प्रश्नांची संख्या कमी असली तरी आर्थिक पाहणी अहवालामधून महत्त्वाची पिके, खनिजे, उद्याोग यांची देशातील सर्वाधिक उत्पादन, उत्पन्न व निर्यातीमधील वाटा असणारी राज्ये यांची माहिती अद्यायावत करून घ्यायला हवी. यामध्ये खनिजे व उर्जा स्त्रोत, महत्त्वाचे पायाभूत उद्याोग, महत्त्वाची धरणे/ प्रकल्प व महत्त्वाची पर्यटन स्थळे यांचा टेबल फॉरमॅटमध्ये अभ्यास करायचा आहे. टेबलमध्ये समाविष्ट करायचे मुद्दे पुढीलप्रमाणे: स्थान, वैशिष्ट्ये, आर्थिक महत्त्व, असल्यास वर्गीकरण, असल्यास पर्यावरणीय मुद्दे, संबंधित समस्या, कारण, उपाय, असल्यास संबंधित चालू घडामोडी.

महाराष्ट्रातील महत्त्वाची वने, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, जैवविविधता क्षेत्रे यांचा भौगोलिक व पर्यावरणीय वैशिष्ट्ये व महत्त्व या दृष्टीने अभ्यास करावा. वनांचे आर्थिक महत्त्व समजून घ्यावे. महाराष्ट्रातील खनिजांचे उत्पादन होणारी क्षेत्रे, त्यांची भूशास्त्रीय रचना, उत्पादनाचे प्रमाण व गुणवत्ता, खाणींचे प्रकार या बाबी समजून घ्याव्यात. भारतातील व महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार पुढील मुद्द्यांच्या अनुषंगाने अभ्यासावेत. खडकांचा प्रकार, निर्मिती, कोठे आढळतो, भौगोलिक व वैज्ञानिक वैशिष्ट्ये, रचना, आर्थिक महत्त्व. धार्मिक, वैद्याकीय, सांस्कृतिक पर्यटन, eco- tourism, राखीव उद्याने इत्यादी संकल्पना व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. महाराषतील सर्व राष्ट्रीय उद्याने, वने माहीत असायला हवीत. भारतातील प्रसिद्ध वने, उद्याने व सद्यास्थितीत चर्चेत असलेली स्थळे याची माहिती करून घ्यावी. संदर्भ साहित्यातील संबंधित सगळा टेबल पाठ करणे आवश्यक नाही.

भूगोलामधील बऱ्याच संज्ञा या बरेच वेळा मूळ इंग्रजी भाषेतील शब्द वाचून जास्त नीट कळतात. भूगोलाच्या प्रश्नांबाबत बरेच वेळा असे घडते की इंग्रजीमध्ये तयार करण्यात आलेल्या प्रश्नांचे मराठी भाषांतर करताना मूळ विधानातील अर्थ भाषांतरीत विधानामध्ये बदललेला असू शकतो. त्यामुळे प्रत्यक्ष तयारी करताना या विषयाच्या इंग्रजी भाषेतील संज्ञा पहायचीही सवय असायला हवी. आणि प्रत्यक्ष पेपर सोडवताना इंग्रजी व मराठी दोन्ही प्रश्न पाहावेत. विशेषत: पारिभाषिक संज्ञा असलेले किंवा जास्त बोजड शब्दांचा वापर असलेले प्रश्न सोडवण्यापूर्वी त्यांचे इंग्रजी प्रश्न व्यवस्थित पाहून घ्यावेत. या मुळे अर्थामध्ये बदल होऊन प्रश्न सोडवताना चुका होणार नाहीत.आपल्या प्रतिक्रियांसाठी आमचा ई-पत्ता : careerloksatta@gmail.com