पंकज व्हट्टे

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन विषयांच्या एकूण चार पेपरपैकी सामान्य अध्ययन पेपर -१ मध्ये इतिहास या विषयाचा समावेश केला आहे. या लेखामध्ये आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील इतिहास विषयाचा अभ्यासक्रम आणि गेल्या दहा वर्षांमध्ये या घटकावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे बदलते स्वरूप यावर चर्चा करणार आहोत. परीक्षेचे स्वरूप समजून घेण्यासाठी तसेच निश्चित दिशेने अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास अशा प्रकारच्या विश्लेषणाचा फायदा होतो.

अभ्यासक्रम

सामान्य अध्ययन पेपर १ च्या अभ्यासक्रमातील पहिल्या पाच ओळींमध्ये इतिहास विषयाचा अभ्यासक्रम नमूद केला आहे. इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमाच्या शीर्षकामध्ये ‘भारतीय वारसा, संस्कृती आणि इतिहास’ असे लिहिले आहे. अभ्यासक्रम थोडक्यात नमूद केला असल्याने त्याला निश्चित मर्यादा नाही, हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हवे. इतिहासाच्या सर्व घटकांचा यामध्ये समावेश होतो हे समजून घेणे आवश्यक आहे.

भारतीय संस्कृती या घटकांमध्ये प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंतचे कलेचे प्रकार, साहित्य, वास्तुकला यांचा समावेश होतो. कलेच्या प्रकारांमध्ये संगीत, चित्रकला, शिल्पकला, धातुकाम आणि इतर कलाप्रकारांचा समावेश होतो. भारतीय संगीत या घटकाचा अभ्यास करताना हिंदुस्तानी संगीत आणि कर्नाटकी संगीत यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. भारतीय नृत्य प्रकाराचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी शास्त्रीय नृत्य, लोक नृत्य आणि आधुनिक नृत्य प्रकारांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. चित्रकला शैलीचे प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंतचे प्रकार अभ्यासणे महत्त्वाचे आहे. यामध्ये महापाषणकालीन चित्रकला शैली, चोल चित्रकला शैली, राजपूत चित्रकला शैली, कांग्रा चित्रकला शैली, मुघल चित्रकला शैली तसेच आधुनिक चित्रकला शैली अशा चित्रकला शैलींचा समावेश होतो. उत्तरांमध्ये या कला प्रकारांच्या कलावंतांचा उल्लेख केल्यास अधिक गुण मिळण्याची शक्यता आहे.

Maharashtra 12th HSC Results 2024 Declared: राज्यात एकमेव विद्यार्थिनीला १०० टक्के गुण…

शिल्पकला हा सर्वात जुना कलाप्रकार मानला जातो. त्याची उत्क्रांती, या कलाप्रकाराची वेगवेगळ्या काळातील महत्त्वाची वैशिष्ट्ये, शिल्पकलेसाठी वापरल्या जाणाऱ्या दगडाचा प्रकार, तसेच शिल्प घडवण्यामधील तंत्र आणि या तंत्रातील बदल यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या संशोधनात ताम्रपाषाण युगातील तांबे आणि कांस्य यापासून बनवलेल्या मूर्ती आढळून आल्या आहेत. टेराकोटा, मृदभांडी, आभूषणे यांवरील कलाकुसर याचादेखील कलाप्रकारामध्ये समावेश होतो. विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारांच्या प्रमुख वैशिष्ट्यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. भारतीय कलेचा वारसा आणि आणि संस्कृती यांचे जतन करणाऱ्या संस्थांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे.

प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंतचे साहित्य आणि वास्तुकला यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. या साहित्यामध्ये धार्मिक आणि निधर्मी अशा दोन्ही प्रकारच्या साहित्याचा समावेश होतो. धार्मिक साहित्यामधून हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिास्ती, इस्लाम आणि शीख धर्माच्या धार्मिक संकल्पना, श्रद्धा, तत्वज्ञान, कर्मकांड यांची ओळख होते. नाटक, कविता, काव्यशास्त्र, नाट्यशास्त्र, इतिहासलेखन, तसेच व्याकरण, राज्यशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र, गणित, खगोलशास्त्र, वैद्याकशास्त्र यावरील भाष्य आणि ग्रंथ यांचा निधर्मी साहित्यामध्ये समावेश होतो. वास्तुकलेचा अभ्यास करताना गुहा वास्तुकला, कोरीव वास्तुकला, इमारतबांधणी, आधुनिक वास्तुकला या उत्क्रांतीचा आढावा घेणे आवश्यक आहे. विविध वास्तुकला शैलींची वैशिष्ट्ये तसेच वास्तुकलेचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आयाम यांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.

अभ्यासक्रमातील दुसरा घटक आधुनिक भारताचा इतिहास असून प्राचीन आणि मध्ययुगीन घटकांचा उल्लेख आढळत नाही. याचा अर्थ असा होतो की प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील संस्कृती या आयामावर भर द्यायला हवा आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक आयाम यांचा किमान आवश्यक अभ्यास करणे अपेक्षित आहे. आधुनिक इतिहासाचा अभ्यास करताना मात्र सर्व आयामांना समान महत्त्व द्यावे. अठराव्या शतकाच्या मध्यापासून आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासणे आवशयक आहे, असे अभ्यासक्रमामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे. हा अभ्यास करताना महत्त्वाच्या घटना, व्यक्ती आणि समस्या या राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक या सर्व क्षेत्रांशी संबंधित असू शकतात. उदा. ब्रिटिश सत्तेचा विस्तार, ब्राह्मो समजाची चळवळ, आर्थिक विकेंद्रीकरण या अनुक्रमे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घटना आहेत. लॉर्ड हेस्टिंग, राजा राममोहन रॉय आणि लॉर्ड मेयो या व्यक्ती उपरोक्त घटनांशी जोडल्या गेल्या आहेत. भारतीय संस्थानांद्वारे दत्तक पुत्र घेणे, सतिप्रथा आणि दारिद्र्य या अनुक्रमे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक समस्या आहेत. दत्तक पुत्र घेणे आणि त्याप्रती ब्रिटिशांचा खालसा धोरणाद्वारा दिला जाणारा प्रतिसाद यामागे सांस्कृतिक आयाम देखील आहे.

अभ्यासक्रमातील तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे स्वातंत्र्यलढा. अभ्यासक्रमामध्ये हा घटक वेगळा नमूद केले जाणे या घटकाचे परीक्षेच्या दृष्टीने असणारे महत्त्व अधोरेखित करते. या घटकावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील विविध टप्प्यांचा- मवाळ कालखंड, जहाल कालखंड, गांधीयुग- अभ्यास करणे अपेक्षित आहे. देशाच्या विविध भागातील नेत्यांनी स्वातंत्र्यलढ्याला दिलेल्या योगदानाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. यासोबतच या काळातील क्रांतीकारी, स्वराज्य पक्षाचे नेते, धार्मिक जमातवादी संघटना, साम्यवादी संघटना, शेतकरी आणि कामगार चळवळी, समाजसुधारक यांचादेखील अभ्यास करणे आवश्यक आहे.

इतिहासाच्या अभ्यासक्रमातील चौथा घटक म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारतातील राज्यांचे एकत्रीकरण आणि पुनर्रचना. स्वतंत्र भारतासमोरील सुरुवातीच्या काळातील धोरणे, आव्हाने आणि राज्यांची पुनर्रचना यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

इतिहासाच्या अभ्यासक्रमातील पाचवा घटक म्हणजे जगाचा इतिहास. जगाच्या इतिहासामध्ये अठराव्या शतकापासून महत्वाच्या घटना जसे की, औद्याोगिक क्रांती, जागतिक महायुद्धे, राष्ट्रीय सीमांची पुनर्रचना, वसाहतीकरण आणि निर्वसाहतीकरण इ. या घटकांचा समावेश होतो. या घटकांचा अभ्यास करताना साम्यवाद, भांडवलवाद आणि समाजवाद या राजकीय विचारधारांचा अभ्यास करणेसुद्धा अपेक्षित आहे. यांचा जगाच्या इतिहासावर कशाप्रकारे प्रभाव पडला (उदा. फॅसिझमचा महायुद्धादरम्यानच्या काळावरील आणि दुसऱ्या महायुद्धावरील प्रभाव) याचा अभ्यास करणे अपेक्षित आहे.

बदलते स्वरूप

आता आपण प्रश्नांचे बदलते स्वरूप थोडक्यात समजून घेऊ. इतिहासाचा वेगवेगळ्या घटकांवरील पुढील काही लेखांमध्ये आपण अधिक सखोल चर्चा करू. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१३ आणि २०१४ सालच्या मुख्य परीक्षेमध्ये प्रत्येकी १० गुणांचे २५ प्रश्न सामान्य अध्ययन पेपर १ मध्ये विचारले गेले. २०१३ सालच्या मुख्य परीक्षेमध्ये ५ गुणांचे उपप्रश्नदेखील विचारले गेले होते. तसेच एकूण २५ पैकी १४ प्रश्न हे इतिहास विषयावरील होते. २०१४ सालच्या मुख्य परीक्षेमध्ये २५ पैकी १० प्रश्न इतिहास विषयावरील होते.

२०१५ आणि २०१६ सालच्या मुख्य परीक्षेमध्ये प्रश्नाचे स्वरूप बदलले आणि १२.५ गुणांचे २० प्रश्न विचारले गेले होते. यावेळी एकूण २० प्रश्नांपैकी ०७ प्रश्न इतिहास विषयावर आधारलेले होते.

२०१७ साली प्रश्नांच्या स्वरुपात पुन्हा बदल करण्यात आला. २०१७ सालच्या मुख्य परीक्षेत प्रत्येकी १० गुणांचे १० आणि १५ गुणांचे १० प्रश्न विचारले गेले होते. २०१७ सालच्या मुख्य परीक्षेपासून प्रश्नांचा हाच पॅटर्न कायम आहे. २०१७ साली इतिहासाचे ०७ प्रश्न (१० गुणांचे ०४ आणि १५ गुणांचे ०३) विचारले गेले होते. २०१८ ते २०२३ या काळातील मुख्य परीक्षेमध्ये इतिहासावर दरवर्षी ०६ प्रश्न (१० गुणांचे ०३ आणि १५ गुणांचे ०३) विचारले गेले आहेत.

याचा अर्थ मुख्य परीक्षेतील इतिहास विषयाचे मूल्य कमी झाले आहे असा होत नाही. २०१६ सालापर्यंत इतिहास विषयावर जास्त प्रश्न विचारले गेले होते. त्यानंतरच्या काळात इतिहासावरील अतिरिक्त भर (२०१६ पर्यंत जो दिसतो) कमी करून सामान्य अध्ययन पेपर १ मध्ये तिन्ही विषयांना समतल पातळीवर आणण्याकडे कल दिसतो. २०१८ पासूनच्या मुख्य परीक्षेतील प्रश्नांचे विश्लेषण केले असता लक्षात येते की, सामान्य अध्ययन पेपर १ च्या एकूण २५० गुणांपैकी ७५ गुणांचे प्रश्न इतिहास विषयावर आधारले होते. मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील भूगोल या घटकाचे मूल्य वाढले आहे. अर्थातच प्रश्न विचारण्याचे स्वरूप कायम राहणार नाही ते बदलत राहील, म्हणूनच त्या अनुषंगाने सर्व घटकांचा योग्य अभ्यास करणे आवश्यक आहे.