सायन्स , कॉमर्सआर्ट्स यापैकी कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट शिक्षणाच्या बीएमएस/ बीएमएस/ बीबीए पदवीसाठी तसेच कॉम्प्युटर क्षेत्रातील बीसीए पदवीसाठी प्रवेश घ्यायचा असेल त्यांना एक राज्यस्तरीय सीईटी परीक्षा देणे यंदापासून अनिवार्य आहे. गेल्या वर्षीपर्यंत संस्था स्तरावर परीक्षा घेऊन हे प्रवेश होत होते. ही परीक्षा २७ ते २९ मे दरम्यान राज्यातील विविध शहरांमध्ये घेतली जाईल. परीक्षेचे माध्यम इंग्रजी असेल आणि ती ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. परीक्षा दीड तासाची शंभर मार्कांची असेल व त्यामध्ये विद्यार्थ्यांना शंभर प्रश्न सोडवावे लागतील. यामध्ये चाळीस प्रश्न इंग्रजी भाषेचे व्याकरण, शब्द सामर्थ्य, उताऱ्यावरील प्रश्न यावर आधारीत असतील. तीस प्रश्न शाब्दिक व संख्यात्मक रीझनिंग अॅबिलिटी वर असतील ज्यामध्ये विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्याची क्षमता तपासली जाईल. पंधरा प्रश्न सामान्यज्ञानावर आधारीत असतील ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत घडामोडी , वाणिज्य / शास्त्र / क्रीडा / संस्कृती या विषयांवर प्रश्न असतील. पंधरा प्रश्न संगणकासंबंधीच्या मूलभूत ज्ञानावर आधारित असतील. परीक्षा पूर्णपणे ऑब्जेक्टीव्ह बहुपर्यायी स्वरूपाची असून निगेटिव्ह मार्किंग नसेल. परीक्षेसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने www. mahacet. org या संकेतस्थळावर ११ एप्रिल पर्यंत दाखल करता येतील.

ज्या विद्यार्थ्यांना पुढे एमबीए करण्याची इच्छा आहे त्यांना बारावीनंतरच बीएमएस/ बीएमएस/ बीबीए या कोर्सेस मधून मॅनेजमेंट शिक्षणाचा पाया घालता येईल. मात्र मॅनेजमेंटमध्ये पदवी कोर्स पूर्ण केला म्हणून एमबीएला थेट प्रवेश मिळत नाही, त्यासाठी एमबीए प्रवेश परीक्षेच्या माध्यमातूनच पुढे जावे लागते. ज्या विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग न करता संगणक क्षेत्रात करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी बीसीए कोर्स हा उत्तम कोर्स आहे. त्यानंतर विद्यार्थी एमसीए हा कोर्स पूर्ण करून आयटी इंडस्ट्रीमधे प्रवेश करू शकतात. आयटी इंडस्ट्रीमधे बीई आणि एमसीए यांना समान दर्जा दिला जातो. बीएमए/ बीएमएस/ बीबीए/ बीसीए यापैकी कोणत्याही पदवीनंतर विद्यार्थ्यांना एमबीए, लॉ , मास कम्युनिकेशन या क्षेत्रांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेता येते. अर्थातच त्यासाठी तेंव्हा त्या त्या क्षेत्रातील प्रवेश परीक्षा द्याव्या लागतील.

More Stories onकरिअरCareer
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Entrance preparation state level cet for management education amy
First published on: 09-04-2024 at 08:19 IST