Premium

परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा विचार करत आहात? तर या पाच टिप्स जरूर वाचा ! 

अनेक विद्यार्थी परदेशात शिकायला जाण्यासाठी मनात स्वप्नं बाळगून असतात. परदेशात शिक्षण घेणं, हा एक संपन्न करणारा अनुभव असतो. कारण यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाची सीमा वाढविण्याची आणि स्वतंत्र आयुष्य जगण्याची एकप्रकारे संधीच उपलब्ध होत असते.

abroad-studies
परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा विचार करत आहात ? तर या पाच टिप्स जरूर वाचा ! (प्रातिनिधिक फोटो – सौजन्य – पिक्सेल)

बऱ्याच विद्यार्थ्यांचा परदेशी शिक्षणासाठी जाण्याचा कल वाढताना दिसून येत आहे. अनेक विद्यार्थी परदेशात शिकायला जाण्यासाठी मनात स्वप्नं बाळगून असतात. परदेशात शिक्षण घेणं, हा एक संपन्न करणारा अनुभव असतो. कारण यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाची सीमा वाढविण्याची आणि स्वतंत्र आयुष्य जगण्याची एकप्रकारे संधीच उपलब्ध होत असते. जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठांमधून आपल्या पसंतीचा कोर्स करून तिकडेच मोठ्या पगाराची नोकरी करायची आणि जमलंच तर ग्रीन कार्ड मिळवून तिथेच स्थायिक होणेही यातून शक्य होत असते. अशाचप्रकारे तुम्हीही जर परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा विचार करत असाल, तर या टिप्स नक्की जाणून घ्या… 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेथील संस्कृतीमध्ये स्वतःला सामावून घ्या (कल्चरल इमर्जन) :


तुम्ही ज्या देशात राहत आहात, त्या देशाची संस्कृती आणि मूल्यांबद्दल जाणून घेणे नेहमीच महत्त्वाचे ठरत असते. कारण असे केल्याने तुमच्या जीवनशैलीत एक सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येऊ शकतो. यामुळे स्थानिक लोकांसोबत संपर्क साधणेदेखील सोपे जात असते. तेथील सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्थानिक सणांना उपस्थित राहिल्याने तेथील संस्कृतीशी तुमची नाळ जुळत असते. तेथील समवयस्कांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणेही महत्त्वाचे आहे. तेथील स्थानिक खाद्यपदार्थ, तेथील संस्कृती आणि ऐतिहासिक ठिकाणे यांना भेटी देऊन तिथल्या सांस्कृतिक आणि सामाजिक परिस्थितीशी एकरूप होणे फायदेशीर ठरते. 


तेथील भाषा शिकून घ्या :

तुम्ही ज्या देशाला भेट देणार आहात त्या देशाची भाषा शिकून घ्या. नेहमीच अशी नवीन भाषा शिकणे फार उपयोगी ठरत असते. ती भाषा आणि त्याच्या उच्चारणाचा सराव एक मजेशीर प्रवास असतो. ती भाषा शिकल्यामुळे स्थानिकांशी सहजतेने तुमची नाळ जुळत असते. सहतेने संवाद साधला जात असतो. जरी ती भाषा अस्खलित येत नसली तरी त्यातील सामान्य बाबी तरी किमान तुम्हाला माहित असणे महत्त्वाचे असते. याचा तुम्हालाच तिथे राहताना आणि संवाद साधताना फायदा होत असतो. 

हेही वाचा – विश्लेषण : परदेशात शिक्षण घेण्याची ओढ वाढतेय; कोणत्या देशाला भारतीय विद्यार्थी प्राधान्य देतात?


नेटवर्किंग वाढवा :


केवळ अभ्यास आणि कॉलेज केल्याने तुम्हाला कंटाळा येऊ शकतो. त्यामुळे तेथील तुमच्या समवयस्कांशी संपर्क साधा. तुमच्या विद्यापीठातील विद्यार्थी आणि त्याच्यापलिकडे जाऊन तेथील आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांशी संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करा. कॉलेज इव्हेंटमध्ये भाग घेऊन, इतर विद्यापीठांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून, विविध क्लबमध्ये सामील होऊन आणि सामुदायिक कार्यक्रमांना उपस्थित राहून हे सारं करणं शक्य आहे. मागे वळून पाहताना या साऱ्यामुळे एक सुंदर अनुभव आणि असंख्य परदेशातील माणसांचा खजिना निर्माण होईल. कोणास ठाऊक हे मित्र नंतरच्या तुमच्या पुढील आयुष्यात महत्त्वाचे ठरतील. हेच लोक जे तुमचे भविष्य घडवण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतात आणि मार्गदर्शकाची भूमिका बजावू शकतील.

हेही वाचा : आरोग्य विभागातील भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज


स्वतःला एक्सप्लोर करा…फिरा  : 


फिरणे अनेकांना आवडत असते. प्रवासाचा अनुभव हा नेहमीच अनेकांसाठी सुखकारक ठरत असतो. हा दैनंदिन जीवनाच्या कंटाळवाण्या आयुष्यापासून दूर जाण्याचा एक उत्तम मार्ग आहे. विशेषतः जेव्हा तुम्ही विद्यार्थी असाल आणि घरापासून दूर राहत असता तेव्हा केवळ अभ्यास करणे कंटाळवाणे होऊ शकते. तर तुमच्या शेजारच्या प्रदेशात लहान सहलीचे नियोजन करा. त्यामुळे तुम्हाला वेगळी नवीन ठिकाणे शोधता येतील. नवीन लोकांना भेटता येईल आणि विविध परंपरा – संस्कृती शिकता येतील. यात महत्त्वाची बाब म्हणजे तुमचा प्रवास अधिक परवडणारा बनवण्यासाठी तुम्ही तुमचा विद्यार्थी सवलत देणारा पर्यायही अवलंबू शकता. महाविद्यालयीन जीवनाचे दिवस कधीच परत येत नसतात. त्यामुळे हे अनुभव तुमच्या जगाकडे पाहण्याच्या नजरा व्यापक करतील. सुंदर आठवणींनी तुम्हाला समृद्ध करतील.


निरोगी जीवनशैली आणि मानसिक संतुलन राखणे महत्त्वाचे :


घरापासून दूर असलेल्या दुसऱ्या देशात राहताना जिथे घरगुती अन्न मिळणे कठीण आहे, तिथे मुख्यत्त्वे घरचे अन्न स्वतः तयार करून खाण्याला प्राधान्य द्या. कारण आपले आरोग्यच ही आपली धन संपदा! तुमच्या जीवनशैलीत बदल करून नवीन परिस्थितीशी जुळवून घ्या. तुमच्या शरीराला तेथील परिस्थितीशी अनुकूल असा निरोगी आहार शोधा. तसंच आराम करणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे वेळच्या वेळी विश्रांती घ्या. या सगळ्यात प्रथम स्वत:ची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. दररोज रात्री पुरेशी झोप घेणे, सकाळी चालायला जाणे, जिम किंवा फिटनेस क्लबमध्ये सामील होणे हे केवळ शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यास मदत करत नाही तर त्यामुळे तुमचे मानसिक स्वास्थ्यही निरोगी राहील. या गोष्टी आचरणात आणल्याने तुम्ही निरोगी आयुष्य जगाल आणि तुमचा परदेशातील अभ्यासाचा अनुभव अधिक परिपूर्ण होऊ शकेल. परदेशात अभ्यास करणे हा आयुष्यभराचा सुखद अनुभव असतो. त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या. असे केल्याने तुमची शैक्षणिक कौशल्ये तर वाढतीलंच शिवाय सामाजिक भवतालंही तुमचा समृद्ध होईल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Going abroad for studies 5 tips to succeed and enjoy study abroad psh

First published on: 28-09-2023 at 15:57 IST
Next Story
TIFR मुंबई येथे नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, पदानुसार महिना २२ हजारांपर्यंत पगार मिळणार