सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखात आपण भारताच्या उत्तर, पूर्व, पश्चिम आणि मध्य भागातील राज्याची निर्मिती कशी झाली, याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण भारताच्या ईशान्येकडील राज्यांच्या निर्मितीबाबत जाणून घेऊया. भारताच्या ईशान्येला सात महत्त्वाची राज्ये वसलेली आहेत, ज्यांना सात-बहिणी (seven-sisters) म्हणून संबोधले जाते. यात आठवे राज्य सिक्कीमचासुद्धा समावेश होतो. या राज्यांत ब्रह्मपुत्रा नदी आणि हिमालय पर्वत ही महत्वाची भौगोलिक स्वरूपे आहेत.

१) अरुणाचल प्रदेश :

अरुणाचल प्रदेशला २० फेब्रुवारी १९८७ रोजी राज्याचा दर्जा मिळाला. १९७२ पर्यंत ते नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर एजन्सी (NEFA) म्हणून ओळखले जात होते. त्याला २० जानेवारी १९७२ रोजी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला आणि त्याचे अरुणाचल प्रदेश असे नामकरण झाले. अरुणाचल प्रदेश राज्याच्या उत्तरेस तिबेट (चीन), पूर्वेस म्यानमार, दक्षिणेस आसाम आणि नागालँड आणि पश्चिमेस भूतान या राज्यांच्या सीमा लागल्या आहेत. अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी इटानगर आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : अंटार्क्टिका खंड; भौगोलिक वैशिष्ट्ये, नैसर्गिक संसाधने अन् जैवविविधता

अरुणाचल प्रदेशातील जिल्हे : चांगलांग, दिबांग, पूर्व कमंग, पूर्व सियांग, लोहित, पापम-परे, लोअर सुबनसिरी, तवांग, तिरप, अप्पर सियांग, अप्पर सुबनसिरी, पश्चिम कमंग, पश्चिम सियांग, कुरुंग कुमे, लोअर दिबांग व्हॅली, नमसाई, सियांग, लांगडिंग, अंजाव, कमले, लोअर सियांग, पक्के-केसांग, लापा राडा, शियोमी इत्यादी.

अरुणाचल प्रदेशातील शेती : राज्यातील बहुतांश लोक शेतीवर अवलंबून आहेत. डोंगराळ आणि डोंगराळ भागात झुमिंग ही मुख्य कृषी व्यवस्था आहे. या राज्यात सफरचंद, संत्री, अननस, बटाटा, भाजीपाला, सिल्व्हिकल्चर यांसारख्या नगदी पिकांच्या लागवडीस प्रोत्साहन दिले जाते.

खनिजे : अरुणाचल प्रदेशातील महत्त्वाच्या खनिजांमध्ये कोळसा, चुनखडी आणि बांधकाम साहित्य यांचा समावेश होतो.

पर्यटन केंद्रे : पर्यटनाची मुख्य ठिकाणांमध्ये अलोंग, बोमडिला, दापोरिजो-नामदाफा, दिरंड, इटानगर, खोन्सा, मालिनीथन, पासीघाट, परशुराम-कुंड, तापी, आणि त्वांग यांचा समावेश आहे.

२) आसाम राज्य :

आसाम राज्याच्या उत्तरेला भूतान आणि अरुणाचल प्रदेश, पूर्वेला पुन्हा अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मणिपूर, दक्षिणेस मिझोराम, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल, बांगलादेश आणि मेघालय यांनी वेढलेले आहे. या राज्याची राजधानी गुवाहाटी आहे.

जिल्हे : बक्सा, बारपेटा, बोंगाईगाव, कचर, चिरंग, दररंग, धेमाजी, धुबरी, दिब्रुगड, गोलपारा, गोलाघाट, हैलकांडी, जोरहाट, कामरूप- ग्रामीण, कार्बी-आंगलाँग, करीमगंज, कोकराझार, लाखपूर, मोरीगाव, नागाव, नलबारी, उत्तर काचर हिल्स, सिबसागर, सोनितपूर, तिनसुकिया, कामरूप महानगर, उदलगुरी, विश्वनाथ, होजाई, पश्चिम कार्बी आंगलाँग, कामरूप मेट्रो, दक्षिण सलमारा- मानकाचार, कोकराझार, दिमा हासाओ.

कृषी : आसाम हे मूलत: कृषीप्रधान राज्य आहे. राज्यात भात, ताग, चहा, कापूस, तेलबिया, ऊस, भाजीपाला आणि बटाटा ही प्रमुख पिके घेतली जातात. या व्यतिरिक्त संत्री, केळी, सफरचंद, अननस, सुपारी, नारळ, पेरू, आंबा, फणस आणि लिंबूवर्गीय फळे यांचे पीक घेतले जाते.

खनिजे : कच्चे तेल, नैसर्गिक वायू, कोळसा, चुनखडी, इ.

उद्योग : आसाम हे कृषी आधारित आणि वन-आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. जसे की, तेल शुद्धीकरण कारखाने, पेट्रोकेमिकल्स, खते (नामरूप), साखर, रेशीम, कागद, प्लायवूड, तांदूळ आणि तेल-मिलिंग, पॉलिस्टर (कामरूप). मुख्य उद्योगांमध्ये तेल शुद्धीकरण कारखाने, पेट्रोकेमिकल्स आणि कृषी यंत्रे यांचा समावेश होतो. कुटीर उद्योगांमध्ये हातमाग, रेशीम उद्योग, ऊस आणि बांबूचे सामान, सुतारकाम, पितळ आणि घंटा-धातूच्या कलाकृतींचा समावेश होतो. आसाममध्ये एन्डी, मुगा, टस्सर इ.च्या रेशीम जातींचे उत्पादन होते. मुगा रेशीम हे जगात फक्त आसाममध्येच तयार होते.

पर्यटन केंद्र : आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) आणि मानस व्याघ्र प्रकल्प (tiger reserve) अनुक्रमे एक शिंगी गेंडा (one-horn rhino) आणि रॉयल बंगाल टायगरसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत. हाफलांग (आरोग्य रिसॉर्ट), पोबी-तोरा आणि ओरंग, माजुली (जगातील सर्वात मोठे नदीचे बेट), चांदुबी तलाव, हाजो (बौद्ध, हिंदू आणि इस्लामचे संमेलन बिंदू) आणि सुआलकुची (रेशीम उद्योगासाठी प्रसिद्ध) ही राज्यातील इतर पर्यटन केंद्रे आहेत.

३) मणिपूर राज्य :

२१ जानेवारी १९७२ रोजी मणिपूरला राज्याचा दर्जा मिळाला. उत्तरेस नागालँड, पूर्वेस म्यानमार, दक्षिणेस मिझोराम आणि पश्चिमेस आसाम या राज्यांच्या सीमा मणिपूरला लागून आहेत. मणिपूर या राज्याची राजधानी इंफाळ आहे.

जिल्हे : बिश्र्नुपूर, चांदेल, चुराचंदपूर, इंफाळ (पूर्व), इंफाळ (पश्चिम), सेनापती, तामेंगलाँग, थौबल, उखरुल, कांगपोकनी, टेंगनौपाल, फेरझॉल, नोनी, कमजोंग, रीबल, ककचिंग इत्यादी आहेत.

शेती : मणिपूरच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ७० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. येथील मुख्य पिकांमध्ये तांदूळ आणि मका यांचा समावेश होतो. पीक उत्पादकतेत झपाट्याने वाढ होत असतानाही, लोकसंख्येच्या जलद वाढीमुळे राज्यातील शेतीसाठी मोठी समस्या निर्माण झालेली दिसते. त्यामुळे शेतीचा विकास करण्यासाठी राज्यात पुढील क्षेत्रांवर जोर देण्यात आला आहे.

दर्जेदार बियाणे उत्पादन, खात्रीशीर सिंचन, शेती यांत्रिकीकरण, मृदा आरोग्य व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, पिक काढणीनंतरचे व्यवस्थापन, बाजारांचे नियमन, जैवतंत्रज्ञानातील संशोधन आणि विकास, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, जसे की प्रत्येक जिल्ह्यात फार्म्स फील्ड स्कूलची स्थापना इत्यादी.

सिंचन : लोकटक हायड्रो-इलेक्ट्रिक हा मणिपूरमधील प्रमुख सिंचन आणि जलविद्युत प्रकल्पांपैकी एक आहे.

पर्यटन केंद्रे : लोकटक तलाव, कैबुल लामजाओ नॅशनल पार्क आणि सिरॉय हिल्स ही मुख्य पर्यटनस्थळे आहेत.

४) मेघालय :

मेघालय राज्याच्या उत्तरेला आणि पूर्वेला आसाम आणि दक्षिण आणि पश्चिमेला बांगलादेश यांच्या सीमांनी वेढले आहे. मेघालय या राज्याची राजधानी शिलाँग आहे.

जिल्हे : पूर्व गारो हिल्स, पूर्व खासी हिल्स, जैंतिया हिल्स, री-भोई (नॉन्गपोह), दक्षिण गारो हिल्स, पश्चिम गारो हिल्स, वेस्ट खासी हिल्स, दक्षिण पश्चिम गारो हिल्स, दक्षिण पश्चिम खासी हिल्स, उत्तर गारो हिल्स, पश्चिम जैंतिया हिल्स.

कृषी : मेघालय मूलत: एक कृषीप्रधान राज्य आहे, ज्यामध्ये एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ८० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. या राज्यात तांदूळ, मका, कडधान्ये, तेलबिया, बटाटा, आले, हळद, काळी मिरी, सुपारी, टॅपिओका, सूर्यफूल आणि ताग ही मुख्य पिके घेतली जातात. राज्यात फलोत्पादनाच्या (पाइन-ॲपल, जॅकफ्रूट, प्लम्स, नाशपाती, पीच, चहा, कॉफी आणि काजू इ.) विकासाची प्रचंड क्षमता आहे. राज्याच्या डोंगराळ भागात झुमिंग शेती आदिवासी शेतकरी करतात.

पर्यटन केंद्रे : एलिफंट फॉल्स, चेरापुंजी मावसीनराम, बडा-पाणी ही महत्त्वाची पर्यटनस्थळे आहेत. शिलाँगपासून ३५ किमी अंतरावर उमरोई हे राज्यातील एकमेव विमानतळ आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारतीय उपखंडाची निर्मिती कशी झाली? भारताची भौगोलिक रचना कशी?

५) मिझोराम :

मिझोराम राज्याची निर्मिती फेब्रुवारी, १९८७ मध्ये भारताचे २३ वे राज्य म्हणून करण्यात आली. मिझोरामच्या उत्तरेला आसाम आणि मणिपूर, पूर्वेला म्यानमार आणि पश्चिमेला बांगलादेश आणि त्रिपुरा ही राज्ये आहेत. संपूर्ण मिझोराम मागास अधिसूचित क्षेत्र आहे. या राज्याची राजधानी एज्वाल आहे.

जिल्हे : आयझॉल, चंपाई, छिमटुइपुई (साइहा), कोलासिब, लॉंगटलाई, लुंगलेई, ममित, सेरचीप, सैतुअल, हन्थियाल, खवझल इ.

शेती : मिझोराममधील सुमारे ८० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. इथे झुमिंग (शिफ्टिंग फार्मिंग) हे मुख्य कृषी प्रकार आहे. या राज्यात तांदूळ आणि मका ही मुख्य पिके घेतली जातात. याव्यतिरिक्त मिझोराम अननस, केळी, संत्री, द्राक्षे, पपई, आले, हळद, काळी मिरी, मिरची आणि भाज्यांसाठी ओळखले जाते.

सिंचन : मुख्य सिंचन आणि जलविद्युत प्रकल्पांमध्ये कोलोडाइन, तुइरिअल एचईपी, तुइपांगलुई आणि काउ-तलाबुंग या प्रकल्पांचा समावेश होतो.

पर्यटन केंद्रे : मुख्य पर्यटक आकर्षणे आइज्वाल, वांतावांग धबधबा आणि चंपाई (म्यानमार सीमेजवळ एक सुंदर रिसॉर्ट) यांचा समावेश आहे.

६) नागालँड :

नागालँड हे भारताचे १६ वे राज्य १ डिसेंबर, १९६३ रोजी स्थापन झाले. ते पश्चिम आणि उत्तरेस आसाम, पूर्वेस म्यानमार आणि दक्षिणेस मणिपूर यांनी वेढलेले आहे. या राज्याची राजधानी कोहोमा आहे.

जिल्हे : दिमापूर, मोकोकचुंग, फेक, वोखा, कोहिमा, सोम, तुएनसांग, झुन्हेबोटो, लाँगलेंग, पेरेन, किफायरे.

शेती : नागालँडची सुमारे ७० टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. मुख्य शेतजमिनीचा वापर स्लॅश आणि बर्न (झुमिंग) शेतीसाठी वापरला जातो.

उद्योग : नागालँडची औद्योगिकीकरणाची प्रक्रिया प्राथमिक अवस्थेत आहे. नागालँडचा दिमापूर येथे विटा बनवण्याचा कारखाना आहे. इथे हातमाग आणि हस्तकला हे महत्त्वाचे कुटीर उद्योग आहेत. दिमापूर जिल्ह्यातील गणेशनगर येथे औद्योगिक केंद्र सुरू झाले आहे.

पर्यटक केंद्रे : नागालॅंडमध्ये इंटाकी आणि पुलीबादझे, कोहिमा जिल्हा, तुएनसांग जिल्ह्यातील फकीम आणि दिमापूर जिल्ह्यातील रंगपहार ही महत्वाची पर्यटन स्थळे आहेत.

७) त्रिपुरा :

त्रिपुरा राज्य पूर्वेकडील बाजू वगळता, जिथे तिची सीमा आसाम आणि मिझोराम यांनी तयार केली आहे, बांगलादेशने वेढलेली आहे. या राज्याची राजधानी आगरतळा आहे.

जिल्हे : धलाई (अंबासा), उत्तर त्रिपुरा, दक्षिण त्रिपुरा, पश्चिम त्रिपुरा, गोमती, खोवाई, शिपाहिजाला, उनाकोटी इत्यादी.

सिंचन : गुमती, खोवाई आणि मनू हे त्रिपुरातील सर्वात महत्त्वाचे सिंचन प्रकल्प आहेत. त्रिपुराच्या नवीन ऊर्जा प्रकल्पांमध्ये पलताना (उदयपूर) आणि मोनाचक यांचा समावेश आहे.

पर्यटन केंद्रे : महत्त्वाची पर्यटन केंद्रे आगरतळा, उनाकोटी, कमलासागर, महामुनी इ.

८) सिक्कीम :

सिक्कीम हे एक छोटे राज्य आहे, ज्याच्या उत्तरेला तिबेटचे पठार, तिबेटचे चुंबी खोरे आणि पूर्वेला भूतानचे राज्य, पश्चिमेला नेपाळ आणि दक्षिणेला पश्चिम बंगाल आहे. जगातील तिसरा सर्वात उंच पर्वत कांगचेंडझोंग (८५८६ मीटर) सिक्कीममध्ये आहे. गंगटोक ही या राज्याची राजधानी आहे.

जिल्हे : पूर्व गंगटोक, दक्षिण नामची, उत्तर मंगन, पश्चिम ग्यालशिंग.

कृषी : सिक्कीम हा मूलत: कृषीप्रधान देश आहे. एकूण लोकसंख्येपैकी ६४ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. सिक्कीममध्ये मका, तांदूळ, गहू, बटाटा, मोठी वेलची, आले आणि संत्री ही मुख्य पिके घेतली जातात.

पर्यटन केंद्रे : सिक्कीम हे हिरव्यागार वनस्पती, जंगल, पर्वत, निसर्गरम्य दऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. समृद्ध आणि भव्य सांस्कृतिक वारशाची श्रेणी आणि पर्यटकांना सुरक्षित आश्रय देणारे शांतताप्रेमी लोक या राज्यात आहेत.

उद्योग : सिक्कीमच्या मुख्य उद्योगांमध्ये बांबू-शिल्प, लाकूडकाम, सूतकाम, गालिचे बनवणे, विणकाम, दागिने, धातूचे काम, चांदीची भांडी आणि लाकूडकाम यांचा समावेश होतो.

ऊर्जा प्रकल्प : या राज्यातील तिस्ता आणि रंगीत जलविद्युत प्रकल्प महत्त्वाचे आहेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc indian geography northeast state formation agriculture and tourism mpup spb
First published on: 30-11-2023 at 18:43 IST