75 Years of NATO : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) भारतातील गहू उत्पादन

संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) यंदा भारतासह जगभरात गहू उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील अर्थव्यवस्था या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

भारतासह जगभरात यंदा गहू उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज एफएओने व्यक्त केला आहे. २०२४ या वर्षात जगातील एकूण गहू उत्पादनात गेल्या वर्षाच्या तुलनेत एक टक्क्याने वाढ होऊन जागतिक गहू उत्पादन ७९.७ कोटी टनांवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यापैकी चीनमध्ये १३.७, युरोपियन युनियनमध्ये १३.४, भारतात ११.३, रशियात ८.५, अमेरिका ४.९, कॅनडा ३.१, पाकिस्तानात २.८, ऑस्ट्रेलियात २.४, युक्रेनमध्ये २.२, तुर्कीत १.९, अर्जेंटिनात १.६, ब्रिटनमध्ये १.४ आणि इराणमध्ये १.४ कोटी टन गहू उत्पादनाचा अंदाज आहे.

भारतातील उत्पादन वाढीचे कारण काय? – गेली दोन वर्षे फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासूनच गहू उत्पादक पट्ट्याला उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागला. त्यामुळे केंद्र सरकारच्या अंदाजापेक्षा प्रत्यक्ष गहू उत्पादनात घट होत होती. यंदा अद्यापपर्यंत हिमालयीन रांगामध्ये पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे झंझावात सक्रिय आहेत. त्यामुळे उत्तर भारताला उष्णतेच्या झळांचा फटका बसला नाही. अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यांमुळेही फारसे नुकसान झाले नाही. गव्हाचे पीक पक्व होण्याच्या काळात थंडी राहिल्यामुळे फायदा झाला आहे. उत्पादनही चांगले मिळत आहे. काढणीच्या काळात तापमानवाढ झाल्यामुळे काढणीही सुरळीत होत आहे. त्यामुळे गहू उत्पादन आजवरचे उच्चांकी म्हणजे ११२० लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

२) नाटोची ७५ वर्ष पूर्ण

४ एप्रिल २०२४ रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटोच्या स्थापनेला ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने वॉशिंगटनमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना आणि मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, एजन्सी आणि मंच, त्यांची रचना, आदेश या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

नाटो ही युरोपियन आणि उत्तर अमेरिकन देशांची लष्करी आणि राजकीय युती आहे. ४ एप्रिल १९४९ रोजी नाटोची स्थापना करण्यात आली होती. त्याचे मुख्यालय ब्रुसेल्स, बेल्जियम येथे आहे. नाटोची स्थापना झाली तेव्हा अमेरिकेसह १२ देश या संघटनेचे सदस्य होते. सद्यस्थितीत या संघटनेत २८ युरोपियन आणि दोन उत्तर अमेरिकन देशांसह आता ३० सदस्य राष्ट्रे आहेत.

यामध्ये अमेरिका, बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स, आइसलँड, इटली, लक्झेंबर्ग, नेदरलँड, नॉर्वे, पोर्तुगाल व युनायटेड किंगडम यांचा समावेश होता. १९५२ मध्ये तुर्की हा एकमेव मुस्लीम सदस्य देश नाटोमध्ये सामील झाला. याशिवाय नाटोमध्ये ग्रीस (१९५२), जर्मनी (१९५५ ), स्पेन (१९८२), झेक प्रजासत्ताक, हंगेरी आणि पोलंड (१९९९), बल्गेरिया, एस्टोनिया, लाटविया, लिथुआनिया, रोमानिया, स्लोव्हाकिया आणि स्लोव्हेनिया (२००४), अल्बेनिया आणि क्रोएशिया (२००९), मॉन्टेनेग्रो (२०१७), उत्तर मॅसेडोनिया (२०२०), फिनलंड (२०२३) आणि स्वीडन (२०२४) या राष्ट्रांचा समावेश आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…