विद्यार्थी मित्रांनो, यूपीएससी पूर्व परीक्षेतील अर्थव्यवस्था या घटकातील शेवटचा लेख आज पाहणार आहोत. प्रत्येक देशाच्या प्रगतीपुढे बेरोजगारी हे फार मोठे आव्हान आहे. भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशापुढील सगळ्यात प्रमुख आव्हान म्हणजे बेरोजगारी. काम करण्याची इच्छा आणि क्षमता असलेल्या व्यक्तीला जेव्हा कामाची संधी उपलब्ध नसते त्याला आपण बेरोजगार असे म्हणतो. विद्यार्थी दशेतील व्यक्ती जी नोकरी/ व्यवसाय/ काम करण्यास उत्सुक नसेल तर अशा व्यक्तीला बेरोजगार मानले जात नाही. त्याचबरोबर एखादी व्यक्ती शारीरिक अथवा मानसिक अक्षमतेमुळे काम करण्यास सक्षम नसेल तर अशा व्यक्तींना देखील बेरोजगार मानले जात नाही. विकसित अर्थव्यवस्थेत बेरोजगारी ही चक्रीय पद्धतीची पाहावयास मिळते. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा मंदी असते त्यावेळी बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर डोके वर काढते. तर अविकसित अथवा विकसनशील देशांमध्ये बेरोजगारी रचनात्मक स्वरूपाची पाहावयास मिळते. म्हणजेच बेरोजगारीची समस्या अर्थव्यवस्थेच्या रचनेमधील समस्यांमुळे पाहावयास मिळते व कायमच पाहावयास मिळते. म्हणजेच अर्थव्यवस्था तेजीत असली तरी रचनात्मक समस्यांमुळे बेरोजगारी पाहावयास मिळते.

नुकत्याच आंतरराष्ट्रीय कामगार संघटना व मानव विकास संस्था यांनी जाहीर केलेल्या India Employment Report 2024 नुसार भारतात ३.१७ टक्के बेरोजगारीचा दर आहे. यामध्ये एक चित्तवेधक कल दिसून येतो, तो म्हणजे शहरीकरणाचे प्रमाण जास्त असलेल्या राज्यांमध्ये उदा. गोवा (१० टक्के), केरळ (७ टक्के) इत्यादी बेरोजगारीचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप जास्त पाहावयास मिळतो. त्याउलट उत्तर प्रदेश (२.४ टक्के), मध्य प्रदेश (१.६ टक्के), झारखंड (१.६ टक्के) सारखी राज्ये जिथे शहरीकरणाचे प्रमाण कमी आहे. तिथे बेरोजगारीचा दर कमी पाहावयास मिळतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शहरीकरण न झालेल्या राज्यांमध्ये शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था अनौपचारिक क्षेत्रात रोजगार संधी व त्याचबरोबर स्वयं रोजगार संधी निर्माण करते, ज्यामुळे एकंदर बेरोजगारीचा दर खाली घसरतो.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc preparation economy unemployment in india amy
First published on: 18-04-2024 at 06:57 IST