scorecardresearch

Premium

प्रतिक्रियेच्या उंबरठय़ावर

मकरंदच्या ऑफिसमधली परिस्थिती सुधारत होती. त्यांना एक नवीन प्रोजेक्ट मिळाले होते.

प्रतिक्रियेच्या उंबरठय़ावर

सुजय म्हणाला, ‘‘तू संतापी आहेस, लोक तुला जमदग्नी म्हणतात.’’ हे ऐकल्यावर मकरंदला खरं तर राग आला. चिडून काही बोलणार इतक्यात त्याच्या लक्षात आलं की, तो प्रतिक्रियेच्या उंबरठय़ावर आहे. तो पाणी पिण्याच्या निमित्ताने उठला, त्याला स्वत:ला सावरायला थोडा वेळ मिळाला. आल्यावर तो सुजयला म्हणाला, ‘‘मी माझ्या संतापावर काम करायला सुरुवात केली आहे, पण कधी कधी गाडी रुळावरून घसरतेच. ते लक्षात येणं आणि त्यातून सावरणं महत्त्वाचं.’’

मकरंदच्या ऑफिसमधली परिस्थिती सुधारत होती. त्यांना एक नवीन प्रोजेक्ट मिळाले होते. त्या प्रोजेक्टचा लीडर सुजय होता. प्रोजेक्टमुळे मकरंद सध्या खूप बिझी होता. कामावरून यायला त्याला खूप उशीर होई. त्या दिवशीही त्याला घरी यायला उशीर झाला. प्रचंड चिडला होता. सुजयला अक्षरश: शिव्या घालत होता की सुजयने नुसते टार्गेट सेट करून ठेवले आहेत. दुसऱ्यांना खूप कामं देऊन ठेवायची. त्यांची नुसती फरफट होते आहे, हे त्याला कळून न कळल्यासारखे करतो आहे. स्वत: मात्र ऑर्डर देऊन मोकळा होतोय. कामचुकार आहे नुसता. त्यानंतर तो सुजयला हलकट, खडूस असं बरंच काही बोलत राहिला.
मकरंद एवढा चिडलेला असताना बोलण्यात काही अर्थ नाही म्हणून केतकीने थोडा वेळ जाऊ देत मग बोलू असं ठरवलं. सकाळी उठल्यावर चहा पिताना मकरंदने आपणहून विषय काढला. तेव्हा केतकीने त्याला विचारलं, ‘‘तुझे आणि सुजयचे संबंध चांगले होते ना? म्हणजे ऑफिसमधला एक चांगला मित्र आहे असं सांगायचास.’’ त्यावर मकरंद म्हणाला, ‘‘तशी त्याच्याबरोबर काम करायची वेळ कधी आली नव्हती. पण सर्व जण त्याला खडूस म्हणायचे.’’ केतकी त्याला म्हणाली, ‘‘सर्व जण त्याला खडूस म्हणायचे म्हणून तूही त्याला खडूस म्हणतो आहेस का? मध्यंतरी नोकरी राहील का नाही अशी परिस्थिती होती तेव्हा तुझीही केवढी चिडचिड वाढली होती..’’ तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच तो तिच्यावर चिडला आणि म्हणाला, ‘‘आहेच मी तापट.’’ केतकी त्याला समजावत बोलली, ‘‘मी तुला तापट, चिडका असं म्हटलंच नाही. तुझी त्या वेळी चिडचिड होत होती असं म्हटलं. खूप ताण आला की असं होतं की. ठीक आहे! एवढय़ा सगळ्या गोष्टींची मी माहिती करून घेते आहे, वाचते आहे, पण अस्मिताच्या वेळी मीही ‘तिने तोंडाला काळं फासलं, माझी मुलगी आहे ही?’ असं विचारलं तेव्हा तूच समजावलंस मला. अस्मिताची परिस्थितीपण किती छान समजावून सांगितली होतीस..’’ एवढं बोलून ती कामाला उठली.
मकरंदला ती बोलते आहे त्यातलं तथ्य जाणवलं. बऱ्याच वेळा घरात काहीही घडलं तर केतकी छान सांभाळून घेते. समजावून घेते सर्वाना. पण अस्मिताच्या ब्रेकअपच्या वेळी अस्मिताचं वागणं थोडय़ा वेळासाठी ती सहन करू शकली नव्हती. तिच्याही तोंडातून शब्द निघून गेले. रागावल्यावर विवेकावर पडदा पडतोच. पण त्या वेळी मी परिस्थिती सावरून घेऊ शकलो. एक बरं आहे आमच्या दोघांतील एक जण जेव्हा डळमळतो तेव्हा दुसरा त्याला सावरून घेतो. नेहमीच सर्व जण कसे १०० टक्के बरोबर वागू शकतील? डोंबारी वर उंचावर दोरीवरून चालताना तोल सांभाळण्यासाठी काठीचा वापर करतो. तसंच आपलं आयुष्यही कधी कधी तारेवरची कसरतच असते. त्यावर तोल सांभाळण्यासाठी मी आणि केतकी गीता, संतसाहित्य, विवेकनिष्ठ थेरपी, मनाच्या अभ्यासाचा डोंबाऱ्याच्या काठीसारखाच उपयोग करतो. पण यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कसरतीत आम्ही दोघे एकमेकांना आधार द्यायला असतो. अशाच पद्धतीने ऑफिसमधील परिस्थितीही हाताळता येईल? मकरंद बऱ्यापैकी शांत झाला होता. पण या गोष्टींचा अभ्यास करणं आणि आचरणात आणणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ‘यूज इट ऑर लूज इट’सारखेच आहे हे. याचा जाणीवपूर्वक वापर करायला हवा.
मकरंद ऑफिसमध्ये आला त्याच वेळी सुजयही आला. सुजय हसून हाय म्हणाला. मकरंदने त्याला ‘सर्व ठीक ना’ विचारलं. त्या वेळी ‘मुलाला बरं नाही’ असं सुजयनं सांगितलं. मकरंद कामाला लागणार तेवढय़ात ‘सुजय सर म्हणजे एक नंबरचा हिटलर, कामचुकार, हेकट माणूस आहे. आता कामाचा डोंगर आपल्यासमोर ठेवणार. स्वत: निघून जातील कालच्यासारखे’ हे शब्द मकरंदच्या कानावर पडले. मकरंद चमकला, ‘‘अरे काल आपण हेच म्हणत होतो. ‘सुजय आता कामाने झपाटलेला आहे. अति महत्त्वाकांक्षी झाला आहे.’ खरं तर तोही आपल्या बरोबरीने काम करत असतो. काल त्याचा मुलगा आजारी होता, त्यामुळे तासभरच आधी गेला होता. एकदाच काही कारणामुळे लवकर गेला तर त्याला कामचुकार म्हणणं बरोबर नाही. रागावलेले असताना सर्वचजण त्याला नको ती दूषणं लावत आहेत. तो हेकट आहे, सहकाऱ्यांकडून खूप कमी वेळात खूप जास्त कामांची अपेक्षा करतो. त्यामुळे सर्वाची खूप फरफट होते हे मात्र खरं. पण त्याच्याकडे दूरदृष्टी नक्कीच आहे. त्याच्यामुळेच कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं हेही तितकंच सत्य आहे. त्याच्यातला एक हेकटपणा या अवगुणामुळे तो संपूर्णपणे वाईट माणूस कसा होईल? त्याचं नामकरण हिटलर केल्यामुळे त्याच दृष्टिकोनातून सर्व जण त्याच्याकडे बघतात. हा दूषित दृष्टिकोन ठेवल्याने तो इतक्या चांगल्या गोष्टी पोटतिडकीने सांगतो त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. किंबहुना त्या प्रस्तावांकडे गांभीर्याने बघितलं जात नाही किंवा त्याच्याकडे उपहासाने बघितले जाते. हे लक्षात आलं आणि मकरंदने या सर्व गोष्टी सहकाऱ्यांबरोबर शेअर केल्या. त्याचप्रमाणे तो सुजयशी स्पष्ट बोलला. त्याच्या हेकट आणि अति महत्त्वाकांक्षीपणामुळे लोकांची फरफट होते, हेही त्याने त्याला सांगितलं तेव्हा पटकन सुजय त्याला म्हणाला, ‘‘तू किती संतापी आहेस आणि लोक तुला जमदग्नी म्हणतात, हे तुला माहीत आहे का़? ’’ हे ऐकल्यावर मकरंदला खरं तर राग आला. तो चटकन त्याला उत्तर देणार तोच त्याच्या लक्षात आलं, आपण प्रतिक्रियेच्या उंबरठय़ावर आहोत.
सुजय म्हणतो ते खरंच आहे आणि नकळतपणे आपण तापट असल्याचं मान्य करतो आहोत आणि त्याप्रमाणे वागायचं म्हणजे त्याला झणझणीत उत्तर द्यायचं आपल्या मनात येत आहे. मग पाणी पिण्याच्या निमित्ताने तो उठला, त्यात त्याला स्वत:ला सावरायला थोडा वेळ मिळाला. तो सुजयला म्हणाला, ‘‘तू म्हणतो आहेस ते खरं आहे, पण त्यावर मी काम करायला सुरुवात केली आहे. कधी कधी गाडी रुळावरून घसरतेच, जसा आता तू बोलल्यावर मला राग आलाच, पण मी पाणी पिण्याच्या निमित्ताने थोडा वेळ थांबलो, तुझ्याशी काहीच बोललो नाही. त्यामुळे मला विचार करायला किंबहुना रागातून बाहेर पडायला वेळ मिळाला. मी कधी कधी रागवतो हे खरं आहे, पण मी फक्त कोपिष्ट आहे असं मला नाही वाटत. माझ्यात बाकीचेही गुण आहेत. जसं मी माझ्या रागावर काम करतो आहे तसंच मी माझ्यातल्या गुणांचा जास्तीत जास्त वापर कसा करू शकेन हे बघतो. तुला कोणताही निर्णय घेतल्यावर त्याचे चांगले-वाईट काय परिणाम होतील हे चांगल्या पद्धतीने कळतं. त्याप्रमाणे तुझा अ‍ॅक्शन प्लॅन लागलीच तयार होतो. तुझा कामाचा झपाटा चांगला आहे. पण येथील प्रत्येकाचा कामाचा झपाटा एवढा नाही. प्रत्येकाची कुवत वेगवेगळी आहे. परिणामी त्यांची फरफट होते. प्रत्येकाची काम करण्याची त्याचबरोबर समोरची परिस्थिती, माणूस समजावून घेण्याचीही कुवत वेगवेगळी असते. परिणामी त्यांचा कामातला रस कमी होतो किंवा ते तितक्या तन्मयतेने काम करत नाहीत. त्याने कामाचा दर्जाही खालावतो. त्यामुळे प्रत्येकाच्या क्षमता ओळखून कामाची वाटणी केली तर बरं होईल. सहकाऱ्यांनाही त्यांची मते, कल्पना विचारल्या तर त्यांचा कामातील उत्साह वाढेल. काम चांगल्या पद्धतीने होईल. करून बघायला काय हरकत आहे.’’ त्यावर सुजय फक्त बरं म्हणाला. त्यावर बाकी कोणतीही प्रतिक्रिया त्याने दिली नाही. मकरंदही शांत राहिला. त्याने बाकीच्या काही गोष्टी मनाशी ठरवल्या. त्या म्हणजे, प्रत्येकाला जास्तीत जास्त समजावून घेणे. सुजय आणि बाकीच्यांमधला चांगला दुवा होण्याचा प्रयत्न करणे. त्यांच्या क्षमता आणि आवडीप्रमाणे कामाची विभागणी करणे. सुजयला, आपल्याला आणि बाकीच्यांना विचार करायला, कामाला आणि विश्रांतीला योग्य तो वेळ द्यायचा. वेळप्रसंगी सुजय किंवा बाकीच्या टीमबरोबर कणखरपणे वागणं. परिस्थितीची जाणीव आपण स्वत: करून घेणं आणि दुसऱ्यालाही करून देणं. त्याप्रमाणे उपाययोजना करणे.
या सगळ्यामुळे त्या दोघांत आणि टीममध्ये बऱ्यापैकी चांगलं नातं निर्माण झाले. तसे अधेमधे त्यांच्यात मतभेद, वादविवाद, चिडचिड झालीच. पण त्या सर्वाचे निरसन लवकर होत गेले. त्याचे दूरगामी दुष्परिमाण झाले नाहीत. प्रोजेक्ट यशस्वीरीत्या पार पडले.
या सगळ्यामुळे मकरंदला लक्षात आलं की कोणीही सदासर्वदा १०० टक्के बरोबर असणार नाही. पण एखाद्याची गाडी रुळावरून घसरत असेल तर बाकीच्यांच्या मदतीने ती नक्कीच रुळावर आणता येते. अर्थात दुसऱ्याला जेव्हा लागेल तेव्हाच मदत करणं हे जितकं महत्त्वाचं तितकंच ती मदत खुल्या मनानं स्वीकारणं हेही महत्त्वाचं. तरच ‘एकमेकां साह्य़ करू अवघे धरू सुपंथ’ याची प्रचीती येईल.
madhavigokhale66@gmail.com

women, men, house, home loan
गृहकर्ज घेणं पुरुषांपेक्षा महिलांसाठी अधिक सोपं!
RBI MPC Meet keeps repo rate and GDP growth unchanged
सणासुदीच्या आधी आरबीआयचं गिफ्ट; कर्जाचा हप्ता वाढणार नाही, रेपो दर ६.५० टक्क्यांवर स्थिर
World Heart Day 2023 How stress affects heart health and 7 ways to reduce stress
World Heart Day 2023: तणावाचा हृदयाच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? तणाव कमी करण्याचे सोपे मार्ग, जाणून घ्या
jobs in india
गेल्या चार वर्षांत ५.२ कोटी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या, SBIच्या अहवालातून मोठा खुलासा

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आपुलाची संवाद आपुल्याशी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to keep control on anger and giving immediate reaction

First published on: 09-07-2016 at 01:04 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×