scorecardresearch

Premium

एक अर्थपूर्ण तास

केतकीची नेहमीची ट्रेन चुकल्याने नेहमीच्या मैत्रिणींशिवाय तासाभराचा प्रवास कंटाळवाणा होणार

एक अर्थपूर्ण तास

केतकीची नेहमीची ट्रेन चुकल्याने नेहमीच्या मैत्रिणींशिवाय तासाभराचा प्रवास कंटाळवाणा होणार असं तिला वाटू लागलं. प्रत्यक्षात मात्र तिला वेगळेच अनुभव आले. केतकीने गाडीतून उतरेपर्यंत एकाच गोष्टीचा वेगवेगळ्या पद्धतीनं, पठडीबाहेरचा विचार करता येतो का बघायचं ठरवलं. त्यानुसार वागल्यावर तिच्या लक्षात आलं की, हा एक तासाचा नेहमीच्या मैत्रिणीशिवायचा प्रवास निश्चितच वाईट नव्हता उलट अर्थपूर्ण ठरला.

केतकीची आठ वाजून सोळा मिनिटांची नेहमीची लोकल चुकली. नंतरच्या आलेल्या लोकलमध्ये ती चढली. त्यामुळं तिच्या नेहमीच्या ट्रेनच्या मैत्रिणी नव्हत्या. आता प्रवास कंटाळवाणा होणार असं तिच्या मनात आलं.. पण त्या विचाराशी ती थबकलीच. मनात आलं, ‘काय गम्मत आहे, हा तासाभराचाच वेळ, तिच गाडी आणि त्याच मैत्रिणी हे घट्ट समीकरण बनलं आहे माझं. म्हणून लवकरची असली तरी मी ही ट्रेन कधी चुकू देत नाही. जेव्हा कधी मला दुसऱ्या गाडीने जायची वेळ येते तेव्हा मला चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं. काय कारण असेल त्याच्या मागे? सोनाली म्हणते त्याप्रमाणे खरंच हे सर्व आपण आपल्या स्वत:शी बोलण्यातून निर्माण करतो? यामागे मी काय बरं स्वत:शी बोलते आहे? बहुतेक माझं स्वगत असं असावं की आता तासाभराचा प्रवास एकटीनं कसा करायचा? मला एकटीनं प्रवास करायला आवडत नाही. मला त्याच मैत्रिणी प्रवास करताना हव्यात. नाही तर कंटाळा येणारच ना? या स्वत:शी सततच्या बोलण्यानेच मला बहुतेक सकाळी जाताना तिच गाडी, तोच डब्बा, त्याच मैत्रिणी याची सवय लागली आहे. ट्रेन चुकली तर मी आहे तो तासाचा प्रवास आनंददायी कसा करू शकते याचा विचारच करत नाही. खरं तर लागलीच मनात येतं की, तासाभराचा तर प्रवास तो कोण कसा एन्जॉय करू शकेल? त्यात ही मरणाची गर्दी! पण मी तासाभरात आणखी काय करू शकते याचा विचारही येत नाही मनात. ट्रेन चुकलेली बघताच एक तासाचा प्रवास कंटाळवाणा होणार हे आपण ठरवूनच टाकलं की. हा कंटाळा मीच निर्माण केला. म्हणजेच मला, माझ्याशी वेगळ्या पद्धतीने बोलून नवीन दृष्टिकोनातून या परिस्थितीकडे पाहता येऊ शकतं.’

article about benefits of exercise
आरोग्याचे डोही : व्यायाम नव्हे; उत्सव!
Tirgrahi Yog 2023 in Kanya
येत्या दोन दिवसात त्रिग्रही योग बनल्याने ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? सूर्य-बुध-मंगळदेवाच्या कृपने वाढू शकतो बँक बॅलन्स
terrace garden cultivation field beans kitchen garden
गच्चीवरची बाग: पापडीची लागवड
traditional methods prevents specs early age
आयुर्वेदाच्या स्मृतीतून: लहान मुलांचा चष्मा

आजूबाजूच्या आरडाओरडय़ाने ती विचारातून बाहेर आली. गाडी स्टेशनवर थांबली होती. एका बाईला गाडीतल्या बायका चढू देत नव्हत्या. तिला ओरडून सांगत होत्या, ‘‘कळत नाही का, फर्स्ट क्लासचा डबा आहे.’’ दरवाजात उभ्या असलेल्या केतकीने ती बाई पहिली. साधीसुधी दिसत होती. साडी स्वच्छ, व्यवस्थित पण साधी होती. ती कोणालाही न जुमानता गाडीत चढली आणि गाडी सुरू झाली. बायका तिच्यावर ओरडत राहिल्या. मग शांतपणे तिने अस्खलित इंग्रजीत तिच्याकडे फर्स्ट क्लासचं तिकीट असल्याचं सांगितलं. सगळे गप्प बसले. केतकीला क्षणभर गंमत वाटली या वागण्याची. तिच्या मनात आलं, ‘असे हे चुकीचे दृष्टिकोन वैयक्तिकच नाही तर समाजाचेपण असतात. हे किती एखाद्याच्या पेहरावावर, दिसण्यावर अवलंबून असतात. आपण एका चौकटीबाहेर विचारच करत नाही आणि तसेच समाजाचे नियम पण करत नाहीत. त्यामुळेच तर प्रकाश आमटे यांना पहिल्यांदा अमेरिकेचा व्हिसा मिळाला नाही. पण नंतर चौकटी बाहेर पडून त्यांना तो देण्यातही आला.’

दुसऱ्या स्टेशनवर गाडी थांबली. एक चुणचुणीत दिसणारी मुलगी चढली. त्या बाईला बघून तिला आश्चर्य वाटल्याचं जाणवलं. त्यांचा संवाद केतकीच्या कानावर पडत होता. त्या मुलीला या बाई आज स्वत:च्या गाडीने न येता ट्रेनने का आल्या याचं आश्चर्य वाटलं होतं. त्यांच्या संभाषणातून ती बाई एका कंपनीची मालकीण असल्याचं कळलं. म्हणून केतकी त्यांचं बोलणं ऐकू लागली. त्यांच्या बोलण्यातून तिचा तिच्या क्षेत्रातला खूप अनुभव असल्याचं कळत होतं. निर्विवाद ती एक हुशार बाई होती. ती बोलत असताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आलं होतं.

मग केतकीने गाडीतून उतरेपर्यंत एकाच गोष्टीचा वेगवेगळ्या पद्धतीनं, पठडीबाहेरचा विचार करता येतो का बघायचं ठरवलं. तेव्हा तिला मागे एकदा ऑफिसमध्ये मेंदूचं कार्य सक्षम रीतीने होण्यासाठी काय करायला हवं त्याचं एक घेतलेलं सेशन आठवलं. त्यात शरीरासाठी जसा व्यायाम करतो तसा मेंदूसाठीही व्यायाम करायला हवा, असं सांगितलं होतं. यात, अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. त्यात महत्त्वाची एक होती ती म्हणजे गोष्टी वेगळ्या पद्धतीने करणे. उदाहरण म्हणून त्यांनी ‘घरातली अ‍ॅरेंजमेंट बदलत जा’ हेही सांगितलं होतं.

त्यातही महत्त्वाचं म्हणजे माणसं वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करतात त्यातून त्यांचे काही दृष्टिकोन, मतं तयार होतात आणि मुख्य म्हणजे त्या त्या परिस्थितीत एकाच प्रकारे प्रतिसाद देतात किंवा वागतात. मकरंदच्या आईला राग आला की, त्या काही न बोलता खोलीत जाऊन बसतात. सोनालीचा तणाव वाढला की ती खूप खाते. माझा ताण वाढला की मी गाणी ऐकते किंवा दरवाजा बंद करून गाते. प्रत्येकाचा परिस्थितीनुसार वागण्याचा एक पॅटर्न तयार होतो. त्यावरूनच तर घरातील माणसांना एकमेकांचं वागणं बघून काय झालं असेल याचा अंदाज येतो. पण कित्येक वेळा हा स्वत:चा पॅटर्न स्वत:च्याही लक्षात येत नाही. आपल्याला फायद्याचं नसेल तर किंवा वेगळा परिणाम हवा असेल तर ही पद्धत नक्कीच बदलायला हवी. वेगळे मार्ग, विचारपण हाताळता आले पाहिजेत.

इतक्यात केतकीला फोन आला. मकरंदच्या आईचा होता. मकरंदची आई त्यांच्याकडे राहायला आली होती. त्यांना येऊन महिना झाला होता. त्यांचा उपवास होता. साबुदाणा सापडत नसल्यानं त्यांनी फोन केला. डबा कुठे ठेवला आहे हे सांगून केतकीने फोन ठेवला. मागच्या आठवडय़ात खिचडी करून झाल्यावर त्यांना तो डबा परत वर ठेवता येईना. म्हणून त्यांनी त्यांच्या हाताला लागेल असा दुसऱ्या खणात ठेवून दिला. पण केतकीने तो सवयीनुसार नेहमीच्या ठिकाणी ठेवून दिला. केतकीचं परत स्वगत सुरू झालं, ‘माझ्या लक्षात कसं आलं नाही की त्यांचा हात तिथे पोचणार नाही ते? खरं सांगायचं तर मला दुसरं कोणी स्वयंपाकघरात आलं की थोडं कठीणच जातं. त्यांच्या सोयीने त्या स्वयंपाकघरातलं सामान ठेवतात. पण मग ते मला मिळत नाही. तशा त्या मला कुठे काय ठेवलं ते सांगतात पण तरीही माझी थोडी चिडचिड होतेच, कारण मला वेळेत कामं आटपायची असतात. त्या मला मनापासून कामात मदत करतात. मला हे कळतंसुद्धा मग तरीही माझी चिडचिड का होते?.. बहुतेक मला हवं तिथेच ती वस्तू ठेवली गेलीच पाहिजे हा माझा बहुतेक सुप्त आग्रह आहे. आणि त्याची मला सवय झाली आहे. किती क्षुल्लक गोष्टींची आपल्याला सवय लागते आणि त्यातल्या थोडय़ाशाही बदलाला तयारी नसते. पण प्रयत्नपूर्वक मी एक तरी सवयीतून बाहेर पडू शकले. पूर्वी मला घर अगदी व्यवस्थितच लागायचं आणि ते एखादा दिवस जरी आवरलं नसेल तर माझी चिडचिड सुरू व्हायची. याचे परिणाम माझ्यावर व्हायचे तसेच बाकीच्यांवरपण व्हायचे. मग वातावरणात एक प्रकारचा ताण पसरायचा. त्या वेळी सगळे जण एकमेकांशी जपून, तोलून मापून बोलत. पण तेव्हा मी माझ्याशी असलेला संवाद बदलला आणि म्हणू लागले की, एखाद्या दिवशी राहीलं घर अस्ताव्यस्त तर काय होणार आहे? समजा कोणी पाहुणे आले आणि ते ‘काय घर आहे’ म्हणालेच तर काय आकाश कोसळणार आहे? आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कोण पाहुणे असं आपल्याला तोंडावर बोलणार? नावंच ठेवायची झाली तर ती काय कशीपण ठेवता येतील. यामुळे माझ्यावरचा ताण कमी होत गेला. घरातलेही रिलॅक्स राहू लागले. तसंच

आता आठ सोळाची लोकल ट्रेन वेळेत पोहचण्यासाठी ठीक आहे पण उशीर होत नसेल तर नंतरच्या लोकल ट्रेनने जायला काहीच हरकत नाही. नाही एक दिवस मैत्रिणींबरोबर गेलो तर काय बिघडणार आहे? आज दुसरी ट्रेन पकडल्यानं, एका मोठय़ा कंपनीची मालकीण किती साधी असू शकते हे पाहायला मिळालं. एवढय़ा वेळ स्वत:शी अर्थपूर्ण गप्पा मारता आल्या. अर्थात विचार भरकटू दिले नाहीत. विचारात सुसूत्रता असणं म्हणजे काय ते आज कळलं. हा एक तासाचा प्रवास निश्चितच वाईट नव्हता.’ तिचं स्टेशन आल्यावर ती उतरली. घडय़ाळ्यात पाहिलं तर अजूनही तिच्याकडे वेळ होता. म्हणून सवयीनुसार नेहमीच्या वाटेनं न जाता ती दुसऱ्या रस्त्यानं निघाली..

madhavigokhale66@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आपुलाची संवाद आपुल्याशी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Local travel experience without friend

First published on: 10-12-2016 at 00:25 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×