संत तुलसीदासांचे दोहे, त्यांचा ग्रंथ ‘रामचरित मानस’, म्हणजे ‘तुलसी रामायण’, ‘हनुमान चालीसा’, ‘विनयपत्रिका’ हे ग्रंथ अतिशय लोकप्रिय आहेत. एका दोह्य़ात ते म्हणतात-

दया धर्म का मूल है पाप मूल अभिमान, तुलसी दया न छांडीये, जब लग तन मे प्राण

सर्व प्राणिमात्रांवर दया करणे, हे धर्माचे मूळ आहे आणि अभिमान हे सर्व पापांचे मूळ आहे. तुलसीदास म्हणतात, देहात प्राण असेपर्यंत दया सोडू नका. तुलसीदासांचा जन्म उत्तरेकडील राजापूर गावचा. मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या तुलसीदासांच्या आईचा ते तान्हे असताना मृत्यू झाला. रामबोला हे त्यांचे मूळ नाव. दासीने सांभाळले, पण तीदेखील ते ५ वर्षांचे असताना गेली. अनाथ तुलसीदासांनी, नरहरी शास्त्री यांच्या मदतीने काशीच्या पंडितांकडे जाऊन प्रचंड विद्या संपादन केली. राजापूरच्या मंदिरातील त्यांची प्रवचने ऐकून सुंदर तसेच विद्वान रत्नावलीने त्यांच्याशी विवाह केला. विवाहानंतर त्यांचे निरूपणात लक्ष लागेना, हे पाहून रत्ना एक दिवस माहेरी गेली. त्या रात्री यमुनेच्या पुरात पोहत जाऊन ते तिच्या माहेरी गेले. आपल्यामुळे आपला नवरा, त्याचे कार्य, त्याची विद्वत्ता विसरतो आहे हे पाहून कवितेतच तिने त्यांची निर्भर्त्सना केली, ‘लाज न आवत आप को, दौरे आवहू साथ, धिक धिक ऐसे प्रेम को, कहा कहू मै नाथ, अस्थि चर्म मय देह मम, तामे ऐसी प्रीति, जो तुम श्रीराम मह, होती न भव भीती’ माझ्यामागे सारखे येता, तुम्हाला लाज वाटत नाही? या प्रेमाचा मी धिक्कार करते. या हाडामासाच्या देहावर जेवढे प्रेम करता, तेवढे रामावर केले तर तुम्हाला संसाराची भीती वाटणार नाही.

तुलसीदासांनी तिला त्या क्षणी गुरू मानून साष्टांग नमस्कार घातला. मागे वळून न पाहता, ते प्रयागला गेले, तिथून वाराणसीला गेले, तीर्थयात्रा करीत मानस सरोवपर्यंत गेले, मानस सरोवराच्या सौंदर्याने ते भारावून गेले, त्यांनी ग्रंथ लिहिला तोच ‘रामचरित मानस’..

 

माधवी कवीश्वर

madhavi.kavishwar1@gmail.com