डॉ भूषण शुक्ल
आजीआजोबांच्या पिढीत ‘बॉयफ्रेंडगर्लफ्रेंड’ हे शब्द कॉलेजमध्येही उच्चारायला मंडळी चाचरत असत. अगदी शाळेच्या वयापासूनच ‘असली थेरं आम्ही खपवून घेणार नाही,’ ही दटावणी त्यांचे आईवडील अप्रत्यक्षपणे मुलांपर्यंत पोहोचवत. आता मध्यमवयीन असलेल्यांचा काळ थोडा पुढारलेला, पण शाळेच्या वयात त्यांनाही ही मोकळीक नव्हती. आज मात्र प्रत्येक मुलाच्या हातात फोन असताना चॅटिंग, फ्लर्टिंग, त्याही पुढे जाऊन व्यक्त केलं जाणारं आकर्षण कसं हाताळायचं पालकांनी?…

संध्याकाळची रपेट आणि सोसायटीच्या कट्ट्यावरची गप्पाष्टकं संपवून आजी-आजोबा घरी परतले. दारातून आत पाय टाकताच त्यांना जाणवलं की काहीतरी बिनसलं आहे. बाबा बाल्कनीच्या दिशेनं बघत सोफ्यावर बसला होता, आई हातात ग्लोव्हज् घालून कुंड्यांमधली माती उकरत होती. मनू कुठे दिसत नव्हती. बहुतेक आत तिच्या खोलीत असावी. टीव्ही बंद. तोसुद्धा ‘आयपीएल’ चालू असताना!

काहीतरी निश्चितच सीरियस बिघडलं होतं! आता काय नवीन घडलं, याचा ते दोघे विचार करू लागले. आपण काहीतरी बोलायचं आणि ‘फट् म्हणता ब्रह्महत्या’ व्हायची, याची त्या दोघांना कायमच धास्ती असायची! हल्ली सगळेजण एकत्र संध्याकाळी घरी असणं म्हणजे फार स्फोटक परिस्थिती असायची.

तेवढ्यात बाबा उठला ‘‘चहा कोण घेणारे?’’

आजीनं मुंडी हलवली. ‘‘नको बाबा, फार उकडतंय. शिवाय तासाभरात जेवायचं आहेच. तुम्हीसुद्धा सवयीनं हो म्हणू नका… रात्री अॅसिडिटी होईल.’’ आजोबांना दम देत आजीनं विषय संपवला.

तेवढ्यात मनूची आई बागकाम संपवून आत आली. ‘‘मीच पन्हं करते सगळ्यांसाठी. बसा तुम्ही.’’ ती आत गेली आणि भांड्यांचा जोरजोरात आवाज यायला लागला. आजी-आजोबा आणखीनच कानकोंडे झाले.

आपण यांना नको झालो आहोत का? अशी शंका परत एकदा त्यांच्या मनाला कुरतडायला लागली. नोकरीसाठी धाकटा मुलगा चेन्नईला त्याच्या कुटुंबासह गेल्यावर आता घरी फक्त पाचच जण उरले. दोन्ही मुलांना कुटुंबासह एकत्र राहता यावं यासाठी इतकं मोठं हौसेनं घेतलेलं घर आता जरा रिकामं वाटत होतं. पण ‘कालाय तस्मै नम:’ असं म्हणून घराचा कारभार मुलगा आणि सुनेच्या हाती देऊन ते दोघं खऱ्या अर्थानं निवृत्तीचा विचार करत होते. पण दर थोड्या दिवसांनी मनूच्या निमित्तानं काहीतरी बिनसत होतं. घरातला शांतपणा, आनंद, उत्साह, असा काही टिकत नव्हता.

रोज संध्याकाळी आई-बाबा घरी यायच्या वेळेस मनू खेळायला म्हणून बाहेर पडायची, ती थेट रात्री जेवण वाढलं की उगवायची. पटापट जेवून खोलीत दार लावून बसायची. शाळेचा प्रोजेक्ट आहे, असाइन्मेंट आहे, होमवर्क आहे, असं रोजच काहीतरी कारण सांगायची. काहीतरी बिनसतं आहे, ठीक चाललेलं नाहीये, याचं सर्वांनाच टोचण होतं. पण काय करावं, याचं उत्तर काही सापडत नव्हतं.

थोड्या वेळानं मनूची आई पन्ह्याचे ग्लास घेऊन बाहेर आली. तिनं ट्रे समोरच्या टेबलवर ठेवला तेव्हा अचानक आजीच्या लक्षात आलं, की तिथे मनूचा फोन पालथा घालून ठेवलाय. मोरपंखी रंगाचं सुंदर कव्हर आणि त्याच्यावर मनूनं स्वत:च्या हातानं काढलेली रंगीबेरंगी नक्षी, यामुळे तिचा फोन ओळखणं अगदी सोपं होतं. पण मनू खोलीत आणि फोन इथे, हे कसं काय आजीच्या लक्षात येईना.

तेवढ्यात आजोबा म्हणाले, ‘‘अरे, आम्ही बऱ्याच दिवसापासून जरा बाहेर जायचं म्हणतोय. एक पंधरा दिवसांची टूर आहे यात्रा कंपनीची. त्यांच्याबरोबर आम्ही दोघं जरा एक ट्रिप करून यावी म्हणतोय. कसं वाटतं तुला? तुमचं दोघांचं आता काही अडणार नाही ना?’’ मनूची आई एकदम म्हणाली, ‘‘नको नको! आता तुम्ही मुळीच जाऊ नका! तुम्ही आता घरात असणं फार महत्त्वाचं आहे. मला एकटीला हे जमणार नाही!’’

‘‘अगं एवढी मोठी नोकरी करतेस, घर सांभाळतेस. गेले सहा महिने बघतोय आम्ही. तू एकटी आहेस तरी सगळं उत्तम करतेस. मग काय झालं एकदम तुझ्या कॉन्फिडन्सला? तुझ्या तोंडून मी कधी असं बोलणं ऐकलेलं नाहीये!’’ आजीनं थोडी सारवासारव केली. पण मनूची आई जवळजवळ डोळ्यांत पाणी आणून म्हणाली, ‘‘बरं झालं तुम्ही वेळीच वरती आलात… नाही तर आज मनूनं मारच खाल्ला असता तिच्या बाबाच्या हातचा. हा आज इतका रागावला आहे, की मला भीती वाटत होती की काहीतरी वेडंवाकडं होईल. तुम्ही आलात आणि जणू काही बॉम्बची पिन कोणीतरी परत बसवली… स्फोट होता होता वाचला! तुम्ही जर दोन आठवडे घराबाहेर गेलात तर मला माहिती नाही काय होईल!’’

‘‘ अरे बापरे… काय झालं गं? काहीतरी बिनसलं आहे हे तर आम्हालाही दिसतंय, पण एवढं काही टोकाला गेलंय याची कल्पना नाही. काय झालं?’’

मनूच्या बाबानं घसा खाकरला. ‘‘ती काय सांगणार! मीच सांगतो. पोरीला पाठीशी घालणं हे तिचं नेहमीचं आहे. मी सारखा सांगत होतो, की इतकी पाठीशी घालू नको. एक दिवस हे अंगावर येईल शेवटी तेच झालं.’’

‘‘अरे, कोणीतरी तर जरा स्पष्ट सांगा काय झालं ते…’’ आजोबा.

‘‘ सांग रे बाबा, काय झालं जरा व्यवस्थित सांग.’’आजी.

‘‘आई, मनूच्या मागच्या वाढदिवसाला तिला हा नवीन फोन घेऊन दिला. आठवीतून नववीत जातानाच तिनं फोन मागितला होता. तरी थोडे दिवस थांबून, त्या परीक्षेत चांगले मार्क मिळाल्यावर सगळे नियम घालून, मग तिला फोन आणून दिला. काही दिवस तिनं ते सगळे नियम पाळलेसुद्धा होते. सुबोध, त्याची सगळी फॅमिली घरी होती, तेव्हा जरा बरं चाललं होतं. सहा महिन्यांपूर्वी ते चेन्नईला गेले आणि घर रिकामं झालं. तेव्हापासून मनू आणि तिचा फोन हे अगदी म्हणजे एकमेकांपासून वेगळी व्हायला तयार नाहीत! रात्री झोपायला जातानासुद्धा ती फोन घेऊन जाते. मी हिला म्हणत होतो, की हे असं काही चालणार नाही. तिचा फोन काढून घेऊ या. पण ही माझं ऐकत नाही. म्हणते, की आजकाल सगळ्याच मुलांकडे फोन असतात! सगळ्या मुलांना एकमेकांशी बोलायचं असतं शाळेनंतर. आपल्या मुलीकडे जर फोन नसेल, तर ती वेगळी पडेल. तिला तिच्या मैत्रिणींमध्ये कोणी घेणार नाही. त्यांचं काय चाललंय तिला कळणार नाही. तर फोन तिच्याकडे असू दे!’’

‘‘बरं मग? हे तसं ठीक वाटतंय. गडबड काय झाली? आज एकदम एवढं का तापलंय?’’ आता आजीलापण धीर निघेना.

‘‘सांग, तू सांग… तुझ्या कार्टीनं काय दिवे लावलेत ते!’’ बाबांनी बॅटन आईकडे सरकवलं.

‘‘अहो आई, ही रात्री उशिरापर्यंत कोणाशी तरी चॅट करत असते. मला संशय आला होता, म्हणून मी आज तिचा फोन ती आंघोळीला गेल्यावर उघडला… आणि माझ्या लक्षात आलं की ही एका मुलाशी रात्री बोलत असते. तिनं स्वत:चे काही फोटो त्याला पाठवलेत. त्या फोटोंमध्ये अगदी भयंकर काही नसलं तरी मला जरा ठीक वाटत नाहीत अशा प्रकारचे फोटो आहेत… आणि त्या दोघांची एकमेकांशी बोलायची जी भाषा आहे ना… ती इतकी अश्लील आहे, की मला ते शब्द उच्चारायलासुद्धा लाज वाटते! माझ्या लग्नाला वीस वर्षं झाल्यानंतरसुद्धा! ही १४ वर्षांची मुलगी अशा भाषेत कोणाशी तरी बोलतेय आणि तो तिच्या वर्गातला मुलगा तशाच प्रकारे उत्तरं देतोय. ते एकमेकांना स्वत:चे फोटो पाठवतायत, त्यावर कॉमेंट करतायत, हे म्हणजे फारच डोक्यावरून पाणी गेलं! मी जेव्हा तिला फोन हवा असा आग्रह धरला होता, तेव्हा मला वाटलं होतं, की ही क्लासला बाहेर जाते, मैत्रिणी बरोबर असतात… सगळ्यांकडे स्वत:चे फोन असतात. आपली मुलगी एकटी पडायला नको. तिला वेगळं वाटायला नको, कमी वाटायला नको. म्हणून मी म्हटलं फोन देऊ या. हे प्रकरण इतकं हाताबाहेर जाईल याची मला कल्पना नव्हती! आता काय करावं सुचत नाहीये. तिच्याकडचा फोन काढून घेतलाय आणि इथे ठेवलाय. आता काय करायचं?’’

‘‘काय करायचं म्हणजे काय?… चंबूगबाळं उचलायचं आणि हॉस्टेलला पाठवायचं. बास झाली सगळी थेरं! घरी सर्व प्रकारचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, कोणी काही विचारायला नाही… पूर्ण विश्वास टाकून वागतो आहे. त्याचा जर ही कार्टी असा गैरफायदा घेणार असेल आणि हे उद्याोग करणार असेल, तर मला ही घरात नको! मी ताबडतोब पाचगणीची अॅडमिशन निश्चित करतो. तिला तिथे पाठवा. पुढची तीन वर्षं तिला तिथे राहू दे. बारावी झाल्यानंतर घरी परत येईल. घरात राहण्याची किंमत त्याशिवाय कळणार नाही. आज तू थांबवलंस म्हणून तिचा मार वाचलेला आहे, नाही तर मी तिचे आज गाल सुजवले असते!’’ बाबाचा संतापानं कडेलोट झाला. त्याचा आवाज थरथरत होता. डोळ्यांमध्ये पाणी आलं होतं.

‘‘अरे बापरे! एवढं सगळं झालं आणि आम्हाला काही कल्पना नाही. बरं झालं तू सांगितलंस आता. पण मला असं वाटतंय की मुलीला हॉस्टेलला पाठवणं हे काही योग्य नाही. तिथे असं वागली तर?’’ आजोबा म्हणाले.

‘‘हो. करणाऱ्या माणसाला काय, कुठे ठेवलं तरी ते तसेच वागणार! पण निदान तिथे फोन नसेल आणि कडक शिस्त असेल. समोर ताटात जे पडेल ते खावं लागेल. जरा अक्कल येईल. माजली आमच्या लाडांमुळे!’’

‘‘अरे बाबा, तू खूप रागावला आहेस हे मान्य! तिनं चूक केली आहे हेसुद्धा मान्य. पण तिचं वय आहे १४. तिच्या आजूबाजूला काय चाललंय? तिला प्रत्येक स्क्रीनवर काय गोष्टी दिसतात? टीव्हीवर, वर्तमानपत्रांमध्ये, सिनेमात, काय भाषा ऐकायला मिळते? आम्हाला तर बऱ्याचदा तुमच्या शेजारी बसून टीव्ही बघता येत नाही! खूप अवघडल्यासारखं वाटतं. हे जर घरात घडत असेल, तर बाहेर तिच्या कानांवर काय भाषा पडत असेल? बसमध्ये मुलं काय बोलत असतील एकमेकांशी? हे सगळं डोक्यात आलं तरी मला काळजी वाटते. अशा परिस्थितीत पोरांनी काहीतरी उद्याोग करून बघणं हे होणारच. हे जरी चूक असेल तरी हे आवरायचं, थांबवायचं कसं, याचा आपल्याला विचार करावा लागेल. डोक्यात राख घालून काहीतरी टोकाचा विचार करण्यात अर्थ नाही.’’ आजोबांनी आगीवर पाणी ओतलं.

‘‘हो, ते तर खरंच आहे. उगाच डोक्यात राख घालून उपयोग नाही… आणि मनू डोळ्यांसमोर नसेल तर उगाच मनात सतत काही ना काही विचार येत राहतील. मला माझी मुलगी मुळीच घराबाहेर पाठवायची नाहीये.’’ शेवटी तिची आईसुद्धा हिमतीनं म्हणाली.

‘‘हे बघा, जर ती घरामध्ये हवी असेल, तर तिला नियम पाळावे लागतील. पहिली गोष्ट म्हणजे शाळेतून परत आल्यानंतरच फोनला हात लावायचा. फोन हा फक्त इथे लिव्हिंग रूममध्ये बसून वापरायचा. फोन तिच्या रूममध्ये जाणार नाही. जेव्हा रात्री आपली जेवायची वेळ होते, तेव्हा तिनं तो स्विच ऑफ करून, हवा तर लॉक करून माझ्या ताब्यात द्यायचा. तो तिला दुसऱ्या दिवशी शाळेतून परत आल्यावरच मिळेल. तिच्या ‘प्रायव्हसी’साठी ती फोनला लॉक लावू शकते. पण मला कुठल्याही प्रकारे शंका आली, तर मी सांगेन तेव्हा फोन अनलॉक करून द्यायचा. हे शंका आल्याशिवाय होणार नाही, पण पूर्णपणे तिला प्रायव्हसी मी द्यायला आता तयार नाही.’’ बाबानं तहाच्या अटी समोर ठेवल्या.

‘‘हे सगळं ठीक आहे बाबा, पण त्या मुलाचं काय करणार आहेस?’’ आजीची शंका.

‘‘तो तिच्याच वर्गात आहे. मला माहिती आहे तो. त्याची आई माझी चांगली मैत्रीण आहे. मी तिच्याशी बोलते. बहुतेक त्यांनासुद्धा कल्पना नसावी यांचं काय चाललंय त्याची.’’ आईनं घाईघाईनं मदतकार्यात भाग घेतला.

‘‘मला असं वाटतं की आपल्याला शाळेशी बोलायला पाहिजे. सगळ्या मुलांच्या पालकांची सभा घेऊन आपण बोलायला हवं, की हे सर्व मुलांना लागू करायला पाहिजे. कारण ‘बाकी सर्व मुलांना फोन मिळतो, तर मला का नाही?’ या सबबीखाली पोरं आपापल्या आईबापांना शेंड्या लावतात. मला असं वाटतं की मुलं नेहमी एकीनं वागतात. आता जरा पालकांनी एकीनं वागायची वेळ आली आहे.’’ आजीचा निर्धार स्पष्ट दिसत होता.

‘‘अरे बापरे विठ्ठला! असं काही कधी बघायला वाटेल असं वाटलं नव्हतं रे!’’ आजोबांनी कपाळावर हात मारून घेतला.

‘‘अहो बाबा, याच्याशी विठ्ठलाचा काय संबंध आहे! आपल्या पोरांची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. का आता तेही काम विठ्ठलालाच करायला सांगणार आहात?’’

‘‘ तसं नाही रे, हे काहीतरी नवीन सतत बघायला लागतंय. उद्या कट्ट्यावरच्या मित्रांना विचारलं पाहिजे, की ते सगळेजण त्यांच्या घरात काय करतात आणि तिथे काय चाललंय? तू म्हणतोस ते पटलं मला. पालकांची एकी झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. सर्वांनी मिळून निर्धारानं वागावं लागेल. आपल्या मुलांना सुखरूप ठेवायला ही चळवळ चालू करावीच लागणार!’’

हे सगळं समजुतीचं बोलणं ऐकून आईच्या जिवात जरा जीव आला. ‘‘मी हे सगळं मनूकडून कबूल करून घेते आणि मग आपण सगळे जेवायला बसू या.’’

आजोबांनी संधी साधलीच- ‘‘अगदी योग्य बोललीस सूनबाई! आज जेवणानंतर फालुदा आइस्क्रीम माझ्यातर्फे!’’

chaturang@expressindia.com