|| डॉ. रोहिणी पटवर्धन

दूरचित्रवाणी अर्थात टीव्ही आणि मोबाइल या दोन गोष्टी ‘कानामागून येऊन तिखट झाली’ या म्हणी सार्थ करणाऱ्या आहेत. ‘ते आले, त्यांनीजिंकलं आणि व्यापलं’ म्हणावे अशा या दोन्ही गोष्टी आपल्या ‘जवळच्या’ झाल्या आहेत, नव्हे आपल्या केवळ बोटांच्या टोकावर अवलंबून असलेल्या आहेत.

Director Bhaurao Karhade announced his new film Fakira
मराठी साहित्यातलं मानाचं पान ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
ice cream rice
सई ताम्हणकरप्रमाणे तुम्ही खाऊ शकता का आईस्क्रिम भात? विचित्र खाद्यपदार्थाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
artificial intelligence generating revolution in film industry
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेने चित्रपटांना संजीवनी

भरपूर वेळ आणि तो वापरण्यासाठी कोणतेच नियोजन नसल्याने आकर्षक मसालेदार २४ तास हाताशी असणाऱ्या दूरचित्रवाणीने ज्येष्ठांना खिळवून ठेवले आहे, यात कोणाचेच दुमत होणार नाही. घरातले अत्यंत महत्त्वाचे स्थान व्यापणाऱ्या या दूरचित्रवाणीच्या तालावर आता ज्येष्ठांचा दिवस नाचतो आहे. जेवण, करमणूक, फिरायला जाण्याच्या वेळा, कार्यक्रम ठरविण्याच्या वेळा (किंवा भर सभेतून उठून जाण्याच्या वेळा) या सर्वावर दूरचित्रवाणीचे अधिराज्य निíववाद आहे.

समाजातल्या काही घटकांसाठी दूरचित्रवाणी खरोखर वरदान आहे. शारीरिक मर्यादा, घरात एकटे असणाऱ्या लोकांसाठी दूरचित्रवाणीसारखा दुसरा मित्र नाही. त्यांनी त्याचा जरूर फायदा घ्यावा. पण बहुसंख्य तंदुरुस्त, हिंडत्या-फिरत्या, सर्व क्षमता चांगल्या असणाऱ्या ज्येष्ठांच्या बाबतीत मात्र तो मित्राचा बुरखा पांघरून आलेला मोठा शत्रू आहे याची जाण ज्येष्ठांना नाही असे नाही, पण ते जाण नसल्याचे भासवत आहेत. कारण ती अत्यंत सोपी कोणतेही श्रम न करता उपलब्ध होणारी करमणूक आहे. त्याचा मोह टाळता येत नाही. (हे ज्येष्ठांना मनातल्या मनात जाणवलेले आहे.)

सगळ्यात मोठा परिणाम जो पुढे गंभीर रूप धारण करतो तो म्हणजे मेंदूच्या कार्यक्षमतेवर होणारा परिणाम. उत्तरायुष्यात सर्वात महत्त्वाचा शरीराचा भाग कोणता तर मेंदू! शारीरिक आजार किंवा परावलंबित्व निभावून नेणे स्वत: ज्येष्ठाला आणि कुटुंबातील इतरांना एक वेळ शक्य होते; पण मेंदू जर का बिघडला तर मात्र ती व्यक्ती कुटुंबाला फार मोठा भार होऊन बसते. कारण त्याची काळजी घरात, बाहेर कुणाला तरी घ्यावी लागते. गंभीर प्रसंग निर्माण होतात. माणसे थकून जातात.

याशिवाय दूरचित्रवाणीमुळे एकमेकांशी संभाषण, परस्परांकडे जाणे-येणे, दुसऱ्यांच्या अडीअडचणींचा विचार करणे, दुसऱ्यांना मदत करणे या गोष्टींकडे आपोआप दुर्लक्ष होते. सामाजिक संबंध हे जवळजवळ नाहीसे होतात आणि जसजसे वय वाढते तसतसे आपल्याला आपल्याशी कोणी बोलावे, आपले कोणी ऐकावे, आपल्याला मन मोकळे करता यावे याची गरज प्रकर्षांने जाणवते, नव्हे त्याविना माणूस एकाकी होतो. यासाठी इतरांशी संबंध ठेवावे लागतात. अचानक कोणी कोणासाठी वेळ देत नाही, पण दूरचित्रवाणीमुळे जेव्हा हे संबंध निर्माण करायची, वाढवायची वेळ असते तेव्हा त्याच्याकडे खूप दुर्लक्ष केले जाते आणि पुढे त्याचा खूप त्रास होतो हे सत्य आहे.

तंत्रज्ञानाने आपल्याला दिलेला दुसरा मित्र म्हणजे मोबाइल. पण हा सच्चा मित्र आहे आणि एखाद्याशी चटकन पटते तसा दूरचित्रवाणी आपल्याला पटला खरा; पण मित्र मोबाइल मात्र आपल्यापासून तसा दूरच असतो. कारण त्यासाठी जरा कष्ट घ्यावे लागतात, शिकावे लागते, चिकाटी लागते. त्याची मात्र आपली तयारी नसते. चांगल्या गोष्टींसाठी चांगले प्रयत्न करावे लागतात हे लक्षातच घेत नाही आपण! आपला ७-८ वर्षांचा नातू मोबाइल कसा छान वापरतो याची तोंडभरून स्तुती करणारा ज्येष्ठ स्वत: मात्र मला नाही बुवा (किंवा बाई) जमत असे म्हणून हात झटकून टाकतो. म्हणजे तो एक प्रकारे कबूल करतो की मी माझ्या ८ वर्षांच्या नातवंडाएवढा शहाणा नाही. हे खरं आहे का? प्रत्येकानेच स्वत:शी खरं बोललं पाहिजे, तर सहज लक्षात येईल की असं नाही आहे. मी त्यावर पुरेसे श्रम घेत नाही. लक्ष घालत नाही. का? याला उत्तर नाही. मोबाइल आपल्याला खरेच खूप उपयोगाचा आहे त्याची सर्वात मस्त गोष्ट म्हणजे तो तुम्ही कितीही चुकीचा वापरलात तरी तो कधीच बिघडत नाही. त्यामुळे बिनधास्त वापरा. (त्याची किंमत जास्त आहे असे उगीचच मनात ठेवून घाबरू नका.) उपयोगाच्या मानाने किंमत काहीच जास्त नाही हे तुम्ही मोबाइल जसजसा जास्त वापराल तसतसे जास्तच पटत जाईल हे नक्की. मोबाइल म्हणजे आपल्या अल्लाउद्दिनच्या गोष्टीतला ‘जादूचा दिवा’ आहे. तुमच्या भाषेत तो बोलतो, त्यामुळे ‘इंग्लिश’ची भीती नाही. सर्व सूचना तो अगदी अनुक्रमे देतो. त्या फक्त आपण पाळायच्या.

काही जण मोबाइल वापरतात, पण तो अगदी साधा! आणि वर म्हणतात की फोन घेता आला आणि करता आला की झालं. कशाला हवा तो ‘स्मार्ट बिट’ फोन. इथेच चुकते. मोबाइल फक्त येणे-जाणे यापुरता नाही. बदलत्या परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्हाला घराबाहेर पडणे जमत नाही तेव्हा तो तुमची कामे घरबसल्या करू शकतो हे लक्षात घ्या. यासाठी प्रथम म्हणजे स्मार्टफोन म्हणजे बटणाऐवजी स्क्रीनवरच करायचा फोन घ्यायला हवा.

फोन मुख्यत: तुमचा परस्पर संवाद वाढवतो. कधीही, कुठेही तुम्ही असाल तेथूनच त्याक्षणी तुम्ही अगदी जगातल्या कोणत्याही व्यक्तीशी संपर्क करू शकता. दुसरे म्हणजे सध्याच्या दिवसात वेळेत बाहेर पडणे, वेगवेगळी बिले भरण्यासाठी रांगेत उभे राहणे सहज टाळू शकता. त्यासाठी अगदी सोपे ‘भीम’सारखे अ‍ॅप डाऊनलोड करून घरच्या घरून कधीही बिले भरू शकता. मोबाइल चार्ज करू शकता. हे मी नव्याने सांगते असे नाही, अनेकांना ते माहीत असते, पण वापरायला घाबरतात. चुकून पैसे जास्त जातील अशी भीती वाटते, ती रास्तही आहे, पण त्यावर उपायही आहे. आपल्या नेहमीच्या बँकेतल्या खात्यापेक्षा वेगळे खाते वेगळ्या बँकेत काढू शकता. त्यात अगदी १०००-२००० रुपयेच भरा आणि त्या खात्यावरूनच बिले फोनवरून भरा. खूपच सोय होते. विसरण्याचे भय तर मुळीच नको. वाढदिवस, कार्यक्रम, बिलांच्या तारखा यांचा तपशील एकदा तुम्ही कॅलेंडर या अ‍ॅपमध्ये भरून ठेवला की तुम्हाला आठवण करून देणारा फोन आहे. औषधांची आठवणसुद्धा अलार्म सेटवरून आपल्याला करून दिली जाते. आता तर फक्त बोलून सूचना देऊ शकता. टाईप करायची गरज नाही. डॉक्टरांचे फोन नंबर, जवळच्या व्यक्तींचे फोन नंबर लगेच सापडतात. अपघातप्रसंगी मोबाइलमुळेच आपल्याला माणसाची माहिती मिळते. बसल्याजागी बातम्या पाहू शकता. करमणुकीची तर अनंत साधने मोबाइल अ‍ॅपमुळे उपलब्ध होतात. टॅक्सी, रिक्षा इत्यादी वाहनांची सोय करता येते. मोबाइल घेतल्यानंतर तो आपण स्वत: चुका आणि शिका या प्रकारे शिकला पाहिजे. त्या त्या खुणेवर टच केले की सर्व माहिती मिळते. स्वत: शिकणे अगदी जमते. मोबाइल वापरताना अनेक गोष्टी कराव्या लागतात, त्यामुळे सर्व प्रकारे मेंदू वापरला जातो. त्यामुळे दुष्परिणाम मर्यादित असतात. (अर्थात मोबाइलचे पण टी.व्ही. प्रमाणे व्यसन लागू शकते. तेही टाळणे आवश्यक आहेच पण त्यातल्या त्यात विविध प्रकारे काम करावे लागते म्हणून दुष्परिणाम टाळता येतात. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे पुढच्या पिढीशी आपण जोडलेले राहतो. आवश्यकतेप्रमाणे घरूनही त्यांना मदत करू शकतो. कागदपत्रांचे फोटो पाठवू शकतो. ते बाहेर आहेत, घरातून चटकन माहिती हवी आहे, स्मार्टफोन वापरत असाल तर क्षणात मदत करू शकता.

अनंत काळापासून मनुष्य आयुष्य अधिकात अधिक सुखी करण्यासाठी झटत आलेला आहे त्यातूनच आजचे जीवन आपण जगत आहोत. तंत्रज्ञानाने तर या सुखी करण्याचा वेग प्रचंड वाढतो आहे. थोडेसे श्रम, बदलांना स्वीकारण्यासाठी स्वत:च्या दृष्टिकोनात केलेला बदल यातून ज्येष्ठ खरोखरच आपलं आयुष्य अधिक सुखकर करू शकतात या खात्रीने हा लेख लिहिण्यासाठी मी प्रवृत्त झाले.

rohinipatwardhan@gmail.com