15 August 2020

News Flash

एकमेका साहय़ करू

भक्ताला स्वर्ग व नरक पाहायची इच्छा होती.

31-lp-prashant-dandekarआपल्या संस्कृतीमध्ये एक सुंदर वचन आहे, ‘एकमेका साहय़ करू अवघे धरू सुपंथ’. पण बरेचदा या मागची भावना जनसामान्यांना कळतच नाही. एकदा एका अडाणी भक्ताच्या भक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात विष्णू भगवान प्रसन्न झाले. त्यांनी भक्ताला वर मागण्यास सांगितले. भक्ताला स्वर्ग व नरक पाहायची इच्छा होती. भगवान म्हणाले, ‘‘तुझी मनीषा मी पूर्ण करेन, पण तुला सांगतो स्वर्ग किंवा नरक निर्माण करणे सर्वस्वी तुझ्या हातामध्ये असते.’’ भक्ताला हे सर्व समजले नाहीच, त्यामुळे मग भगवंतांनी त्याला प्रत्यक्ष अनुभव देण्याचे ठरविले. भगवंत भक्ताला एका ठिकाणी घेऊन गेले. एका खोलीला असलेल्या खिडकीमधून त्याने भक्ताला आत डोकावायला सांगितले. भक्ताने पाहिले की एका गोल टेबलवर खिरीचे पाच बोल ठेवले आहेत व टेबलपाशी पाच लोक बसले आहेत. तरीही ती माणसे उदास दिसत आहेत. कित्येक दिवस उपाशी असल्याने खंगलेली दिसत आहेत. मुख्य म्हणजे त्या सर्वाच्या उजव्या हाताला, कोपऱ्यापासून पंज्यापर्यंत लाकूड बांधलेले आहे व त्या लाकडाच्या टोकाला चमचा बांधला आहे. देवाने त्याला दुसऱ्या खोलीत डोकावायला सांगितले. तिथेही नेमके तेच दृश्य होते, फरक एवढाच की खिरीचे बोल रिकामे होते, पाचही जण आनंदात होते व चेहऱ्यावर तृप्त भाव होते. विष्णू भगवान आपल्या भक्ताला म्हणाले, ‘‘पहिली खोली म्हणजे नरक होता, तर दुसरी खोली म्हणजे स्वर्ग होता. पहिल्या खोलीतील माणसे स्वकेंद्रित, अप्पलपोटी असल्याने समोर ठेवलेली खीर स्वत:च खाण्याचा प्रयत्न करीत होती. पण लांब लाकडाला बांधलेल्या चमच्यामुळे ते शक्य होत नव्हते. समोर सर्व वैभव असतानाही स्वत:च्या कोत्या स्वभावामुळे या माणसांनी नरक निर्माण केला होता. याउलट दुसऱ्या खोलीतील माणसे, स्वत:पेक्षा सर्वाचा एकत्र विचार करीत होती. त्यामुळे स्वत: खीर न खाता ते दुसऱ्याला भरवत होते. या कृतीमुळे ते सर्वजण एकमेकांचे पोट भरू शकत होते. आपल्या कृतीमुळे त्यांनी संकटातही स्वर्ग निर्माण केला होता.’’

दुसरी कथा. एकदा एका जापनीज शाळेमध्ये व्यायामाचा तास चालू होता. मुलांना उंच उडीचे प्रशिक्षण देण्यात येत होते. बऱ्याच मुलांना दिलेला अडथळा पार करता येत होता. फक्त एका मुलाला वारंवार प्रयत्न करून शक्य होत नव्हते. बालसुलभ मनाप्रमाणे इतर मुले त्याची सहज टिंगलटवाळी करू शकली असती, पण त्यांनी तसे केले नाही. सर्व मुलांनी त्या मुलाकडे धाव घेतली, त्याच्याभोवती गराडा घातला व ‘तू नक्की करशील’ असं प्रोत्साहन दिलं.  आणि काय आश्चर्य! पुढच्याच प्रयत्नात त्याने सफाईदारपणे उंच उडी मारली. ‘पिअर्स प्रेशर’ जर अशा प्रकारे सकारात्मक असेल तर आत्मविश्वास गमावलेला एखादा माणूस निराशेच्या गर्तेमध्ये न जाता आपल्या ध्येयाकडे झेपावू शकतो.

कॉर्पोरेट क्षेत्रामध्येदेखील सहकाराच्या व सकारात्मक पिअर्स प्रेशरच्या माध्यमातून अनेक लोकांनी यशाला गवसणी घातली आहे. ‘अमुल’ जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक संघ आहे. त्याचप्रमाणे कृषी उत्पादने विकणारा ‘क्लाउड’ (द इंडियन फार्मर फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह) हा ग्रुपही सहकार क्षेत्रातील दादा नाव आहे. जगातील अनेक देशांनी सहकारातून प्रगती साधली आहे. इटलीमधील ९० टक्के पर्मेसन चीज हे सहकार क्षेत्रामध्ये निर्माण केले जाते, तर फ्रान्समधील १०० टक्के शेम्पेन अशीच निर्माण होते. क्रेनबेरी उत्पादन करणारा ‘ओशन स्प्रे’ हा अमेरिकेतील ग्रुपदेखील सहकार क्षेत्रामधीलच आहे.

लिज्जत पापडची कथा ही मुंबईमधील गिरगावमधून झाली. सात जणींनी ८० रुपये भांडवल एकत्र जमवून चालू केला. आजही कोणत्याही महिलेला ‘सिस्टर मेम्बर’ बनवून तिला एक किलो पापड लाटायला ३० रुपये देण्यात येतात. दोन टक्के नफा, कंपनीच्या कारभारासाठी बाजूला काढून बाकी सर्व नफा गरीब महिलांना (सिस्टर मेम्बर) वर्षांतून तीनदा वाटण्यात येतो.

इस्थमस इंजीनियरिंग नावाची अभियांत्रिकी कंपनी आहे. यात कर्मचाऱ्यांनी दोन वर्षे पूर्ण केल्यावर त्यांना वर्कर-ओनरचा दर्जा दिला जातो. आपल्या कंपनीने कोणती उत्पादने निर्माण करावीत, कोणती करू नयेत याचे निर्णयस्वातंत्र्य त्यांना देण्यात येते. हा प्रयोग म्हणजे ‘सहकारातून प्रगती’च आहे नाही का?

न्यूयॉर्कमध्ये ‘को-ऑप होम केअर असोसिएट’ नावाची कंपनी वृद्ध, अपंग लोकांना सेवा पुरविते. असे सेवा पुरविणारे जॉब्स सहसा पार्ट टाइम, कमी मोबदला देणारे किंवा एन्ट्री लेव्हलचे असतात. पण या कंपनीमध्ये सामील होणारे लोक सहकारामधून प्रगती साधत आहेत. सामील होणाऱ्या लोकांना संघटित शक्तीमुळे सर्वोत्तम प्रशिक्षण मिळाले व त्यांचे जॉब्स पूर्णवेळ, मनाजोगता मोबदला देणारे व स्पेशलाइज्ड बनले. एकत्र आल्यामुळे कर्मचाऱ्यांना व्याजमुक्त कर्ज मिळू लागले, आयकर भरण्यासाठी विनामूल्य मदत मिळू लागली व सर्वात महत्त्वाचे वर्कर ओनरचा स्टेटस मिळण्यासाठी आवश्यक असलेले एक हजार डॉलर जमा करण्यासाठी सेव्हिंग प्लानमध्ये एन्ट्री मिळाली. फिलिपिन्समध्येही सहकारातून स्वर्गनिर्मिती होतेय. ‘तगुम को-ऑप वुमन्स लायवलीहुड्स असो’च्या माध्यमातून गरीब महिलांना मांस व इतर पदार्थ प्रोसेस करण्याचे, मेणबत्त्या बनविण्याचे प्रशिक्षण व काम देण्यात येते.

‘बट्लर टाऊनशिप व ‘Conyngham Borough’ या दोन महानगरपालिका यांनीही आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सहकाराचा मार्ग शोधला. दोन्ही संस्थांकडे स्वत:चे अग्निशमन केंद्र बांधण्यासाठी व ते कार्यरत करण्यासाठीचे भांडवल नव्हते. अशा वेळी या दोन्ही संस्थांनी सहकाराचा मार्ग अनुसरला व व्हेली रिजनल व्होलिंटियर फायर कंपनीची स्थापना केली. यामुळे दोन्ही संस्थांना मिळणाऱ्या एकत्रित मदतीमुळे महागडी अग्निशमन यंत्रणा व उपकरणे घेणे शक्य झाले. तसेच ऑपरेशनल कॉस्ट विभागली गेल्याने दोन्ही संस्थांची बचतही झाली. काही औषध कंपन्या, एकमेकांशी गळेकापू स्पर्धा करण्यापेक्षा एकत्र येऊन मानवजातीला व समग्र आरोग्य विश्वाला भेडसाविणाऱ्या एन्टिबायोटिक रेझिस्टन्स या विषयावर एकत्र काम करण्याची इच्छा प्रदर्शित करू लागल्या आहेत.

स्वाहा करण्यापेक्षा सहकार करण्यातच स्वर्ग सुख आहे हे ज्या दिवशी अखिल मानवजातीला कळेल तेव्हा नरकासाठी जागाच उरणार नाही.
प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2016 1:12 am

Web Title: help each other in corporate world
Next Stories
1 निर्णयस्वातंत्र्य
2 खेकडय़ाची चाल…
3 नियम आणि अपवाद
Just Now!
X