गुजरात येथील २००२ मधील नरोडा पाटिया दंगल प्रकरणातील दोषी बाबू बजरंगीला अखेर जामीन मंजूर झाला आहे. सुप्रीम कोर्टाने वैद्यकीय उपचारासाठी बाबू बजरंगीला जामीन मंजूर केला आहे.

नरोडा पाटिया येथे २८ फेब्रुवारी २००२ रोजी नरसंहार झाला होता. गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसचे डबे जाळल्याने कारसेवकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने २८ फेब्रवुारी रोजी बंदची हाक दिली. याच दिवशी जमावाने नरोडा पाटियातील मुस्लिमांच्या वस्तीवर हल्ला केला. या हल्ल्यात ९७ जणांची हत्या करण्यात आली. या नरसंहारात बाबूभाई पटेल उर्फ बाबू बजरंगी याची मुख्य भूमिका होती.
बजरंगी २०१२ पासून साबरमती कारगृहात आहे. २०१८साली गुजरात उच्च न्यायालयाने त्याला मृत्यूपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जामीनासाठी बाबू बजरंगीने सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता. या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली असून सुप्रीम कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला. वैद्यकीय कारणास्तव त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.