आई-वडिलांची हत्या करणाऱ्या तालिबानी दहशतवाद्यांना मुलीने गोळ्या घालून ठार केल्याची घटना अफगाणिस्तानमध्ये घडली आहे. मुलीने केलेल्या गोळीबारात काही दहशतवादी जखमी झाले आहेत. एएफपीने यासंबंधी वृत्त दिलं आहे. मुलीचे वडील सरकारचे समर्थक असल्याने दहशतवाद्यांनी त्यांच्या घरात घुसून आई-वडिलांना फरफटत नेऊन घराबाहेरच गोळ्या घालून हत्या केली होती.

कमर गुल असं या मुलीचं नाव आहे. आई-वडिलांची डोळ्यांसमोर हत्या झाल्यानंतर मुलीने आपल्या घरात असणारी एके-४७ घेतली आणि दोन दहशतवाद्यांना ठार केलं. मुलीचं वय १४ ते १६ दरम्यान असून रिपोर्टनुसार तिला आणि तिच्या लहान भावाला सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे.

स्थानिक पोलीस प्रमुखाने दिलेल्या माहितीनुसार, “मुलीचे वडील सरपंच होते आणि तालिबानी त्यांचा शोध घेत होते. मुलीच्या आईने विरोध केला असता त्यांनी दोघांचीही घराबाहेरच गोळ्या घालून हत्या केली. यावेळी कमर गुल तिथेच घरात होती. तिने घरात असणारी एके-४७ उचलली आणि तालिबानींवर गोळीबार केला. यावेळी तिच्या पालकांची हत्या करणारे दोघं जागीच ठार झाले तर काहीजण जखमी झाले”.

यानंतर काही दहशतवादी कमर गुलच्या घरावर हल्ला करण्यासाठी आले होते पण स्थानिकांनी त्यांना रोखलं. कमर गुलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिचं कौतुक केलं जात आहे. अनेकांनी तिला हिरो म्हणून संबोधलं आहे.