चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करीत लडाखच्या पूर्वेकडील दौलत बेग ओल्डी परिसरात एक चौकी उभारल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या पाश्र्वभूमीवर इंडो-तिबेट सीमा पोलिसांनी चीनला ध्वजबैठकीचे निमंत्रण दिले असले तरी चीनकडून अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही. भारत आणि चीनमध्ये सीमा ओलांडण्यावरून वाद सुरू आहे.
सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या सैन्यातील पीपल्स लिबरेशन आर्मीतील एका गटाने १५ एप्रिलच्या मध्यरात्री भारतीय हद्दीत १० कि.मी. अंतरापर्यंत घुसखोरी करून तेथे चौकी उभारली. सदर ठिकाण समुद्रसपाटीपासून १७ हजार फूट उंचीवर आहे. चीनच्या सैन्याने येथे तंबू ठोकले आहेत. चीनच्या सैन्याच्या एका गटात ५० सैनिकांचा समावेश असतो. भारत-तिबेट सीमेवरही चीनच्या सैन्याने चौक्या उभारल्याचे वृत्त आहे या पाश्र्वभूमीवर भारत-तिबेट सीमा पोलिसांनी चीनला ध्वजबैठकीचे निमंत्रण दिले होते. त्याला चीनकडून प्रतिसाद मिळालेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.