टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला आहे. नीरजने सुवर्ण पदक मिळवून स्पर्धेचा शेवट गोड केला. या सुवर्ण कामगिरीनंतर नीरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरजला फोन करून त्याचं अभिनंदन केलं होतं. त्यानंतर आता नीरज चोप्राच्या काही जुन्या ट्विटवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी नीरज चोप्राच्या जुन्या ट्विटचा फोटोही आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. खेळाडूंना अभिनंदनासह त्यांचे हक्क मिळवावेत आणि क्रीडा क्षेत्राच्या अर्थसंकल्पात कपात न करायला हवी असे म्हटले आहे.

“खेळाडूंना अभिनंदनासह त्यांचे हक्क सुद्धा मिळायला हवेत, क्रीडा क्षेत्राच्या बजेटमध्ये कपात नाही. फोन कॉलचे व्हिडिओ खूप झाले, आता बक्षीस रक्कम देखील द्या!” असे राहुल गांधीनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rahul Gandhi (@rahulgandhi) 

राहुल गांधींनी नीरज चोप्राच्या जुन्या ट्विटचा फोटोही आपल्या पोस्टसह शेअर केला आहे. त्यामध्ये नीरजने, तुम्ही जे खेळाडूंना बक्षीस रक्कम देण्याचे वचन दिले होते ते पूर्ण करा जेणेकरून आम्ही आपले लक्ष या गोष्टींकडून हटवू आणि संपूर्ण लक्ष आगामी ऑलिम्पिक खेळांवर केंद्रित करू आणि आपल्या देशाला आणि राज्याला गौरव मिळवून देऊ, असे म्हटले होते.

राहुल गांधी यांनी नीरज चोप्राचे आणखी एक जुने ट्विट शेअर केले आहे. आम्ही पदके जिंकल्यानंतर येतो, तेव्हा संपूर्ण देश आनंदी असतो आणि तुम्हीही अभिमानाने सांगता की आम्ही हरियाणाचे खेळाडू आहोत. हरियाणाच्या खेळाडूंनी क्रीडा विश्वात आपली छाप सोडली आहे, इतर राज्येही हरियाणाचे उदाहरण देतात. कृपया हे उदाहरण प्रचलित होऊ द्या, असे नीरजने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. यावरूनच राहुल गांधी यांनी सरकारला टोमणा मारला आहे. फोन केल्याचे व्हिडिओ पुरे झाले, आता बक्षीसाची रक्कमही द्या. पंतप्रधान मोदींनी फोनवर बोलून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या अनेक खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.