दोन अधिकाऱ्यांच्या पत्नींमधील भांडणाने सैन्याची नाचक्की झाली आहे. याप्रकरणी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार दाखल झाली असून आता पीएमओने याप्रकरणी सैन्याकडून अहवाल मागवला आहे.

गेल्या आठवड्यात भटिंडातील लष्करी केंद्रात सैन्यातील अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या संघटनेतर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कमांडिंग ऑफिसरच्या पत्नीने लेफ्टनंट कर्नलच्या पत्नीच्या श्रीमुखात भडकावली. या दोघींमध्ये कार्यक्रमात उशीरा येण्यावरुन वाद झाला होता. या कार्यक्रमात सैन्यातील जवान आणि अधिकारी उपस्थित होते. सर्वांसमक्ष हा प्रकार घडला. या दोघींमधील वाद सोडवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. आता लेफ्टनंट कर्नलने याप्रकरणी पंतप्रधान कार्यालय आणि मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. याशिवाय पंजाबचे पोलीस महासंचालक आणि सीबीआयचे संचालक यांच्याकडेही याप्रकरणात दाखल करण्यात आली. ‘सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीने कनिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीला सर्वांसमक्ष मारहाण केली. तिला धमकावले. या प्रकरणातील पीडितेला न्याय मिळण्याची शक्यता कमीच असून पीडितेचा छळ होऊ शकतो’ असे या अधिकाऱ्याने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पीएमओने सैन्याकडून अहवालदेखील मागवला आहे.

सैन्यातील अधिकाऱ्यांच्या पत्नींना आर्मी अॅक्ट लागू होत नाही. त्यामुळे याप्रकरणात कारवाई करता येणार नाही असे सैन्यातील सूत्रांनी स्पष्ट केले. यापूर्वी सैन्यातील अधिकाऱ्यांच्या पत्नींमध्ये वाद झाल्याचे प्रकार समोर आले होते. दोन वर्षांपूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीने कनिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीला मारहाण केली होती. तर अन्य एका घटनेत कनिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीला मारहाण केली होती.