सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) ईशान्य दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी, सोमवारी हिंसाचाराचा आगडोंब उसळला. त्यात एका पोलिसासह इतर चार नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले. मात्र या प्रकरणामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. दिल्लीमध्ये लष्कराला पाचारण करण्यात आल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले. मात्र त्यावर भारतीय लष्कराने आमचे कोणतेही सैनिक दिल्लीमध्ये सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले नाही असं ट्विटवरुन स्पष्ट केलं. त्यामुळे आता दिल्लीमध्ये सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले लष्करी पोशाखातील व्यक्ती कोण आहेत असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.

दिल्लीत नक्की काय घडलं?

दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर भागात सुधारित नागरिकत्व कायद्याचे विरोधक आणि समर्थक सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी आमने-सामने आले. त्यांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रस्त्यांवरील वाहने, आसपासच्या घरांना तसेच, गोदाम-दुकाने यांनाही आग लावण्यात आली. एका तरुणाने पोलिसांवर पिस्तूल रोखून धरले आणि नंतर हवेत गोळीबार केला. या हिंसाचारात रतन लाल या पोलीस हवालदारासह चार नागरिकांचा मृत्यू झाला. हिंसाचारात पोलीस उपायुक्तासह किमान दहा पोलीस जखमी झाले. हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. ठिकठिकाणी जवान तैनात करण्यात आले. पोलिसांनी अश्रुधुरांच्या कांडय़ा फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. काही भागात जमावबंदी लागू करण्यात आली असून, मेट्रो रेल्वे स्थानकेही बंद करण्यात आली आहेत. भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दिल्लीत पोहोचण्याच्या काही तास आधी हिंसाचार भडकला.

जाफराबाद आणि भाजपाचा वादग्रस्त नेता

शाहीनबागप्रमाणे जाफराबाद परिसरातही सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन केले जात असल्याने आसपासचा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. शनिवारी रात्री तिथल्या महिलांनी ‘शांती मोर्चा’ काढला होता. जाफराबाद मेट्रो स्थानकापासून दोन किलोमीटरवर असलेल्या मौजपूर-बाबरपूर मेट्रो स्थानकाजवळ रविवारी दुपारी भाजपचे वादग्रस्त नेते कपिल मिश्रा यांनी कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. जाफराबादमधील आंदोलकांना तीन दिवसांत हटवण्याचा इशारा त्यांनी दिल्ली पोलिसांना दिला होता. ट्रम्प यांचा दिल्ली दौरा संपण्याची वाट पाहात असल्याचे मिश्रा यांनी समर्थकांना सांगितल्याची चित्रफीतही सर्वत्र पसरली होती. नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कपिल मिश्रा यांनी प्रक्षोभक भाषणे केली होती. त्यामुळे ते वादात सापडले होते. रविवारी घटनास्थळावरून मिश्रा गेल्यानंतर लगेचच सुधारित नागरिकत्व कायद्याचे विरोधक आणि समर्थकांमध्ये हिंसाचार भडकला. त्यानंतर मिश्रा यांनी सोमवारी ट्वीट करून शांततेचे आवाहन केले. कुठल्याही समस्येवर हिंसाचार हे उत्तर नव्हे, असे त्यांनी त्यात म्हटले आहे.

ते जवान कोण?

जाफराबादमध्ये शनिवारी रात्रीपासून सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर रविवारी या भागामध्ये लष्करी गणवेशातील जवान तैनात करण्यात आल्याचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केला. रविवारी सकाळी दहा वाजता एएनआयने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये लष्करी पोशाखातील शेकडो जवान रस्त्यावरुन चालताना दिसत आहेत. “जाफराबाद मेट्रो स्थानक परिसरामध्ये कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे आंदोलक या मेट्रो स्थानकाजवळ आंदोलन करत आहेत,” असं कॅप्शन या व्हिडिओला एएनआयने दिलं होतं.

लष्कराचे स्पष्टीकरण…

एएनआयने ट्विट केलेला हा व्हिडिओ हजारहून अधिक लोकांनी रिट्विट केल्यानंतर भारतीय लष्कराच्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरुन यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं. सोमवारी सकाळी दहा वाजून ५७ मिनिटांनी लष्काराने @adgpi या ट्विटर अकाऊंटवरुन एएनआयचे ट्विट कोट करुन याप्रकरणासंदर्भात आपली बाजू स्पष्ट केली. “अंतर्गत सुरक्षेसाठी भारतीय लष्कराला पाचारण करण्यात आलं नव्हतं हे आम्ही स्पष्ट करु इच्छितो,” असं ट्विट लष्कराने केलं.

लष्कराच्या या स्पष्टीकरणानंतर अनेकांनी जर हे लष्कराचे जवान नसतील तर लष्कराच्या गणवेशात दिल्लीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून फिरणारे हे जवान कोण आहेत असा सवाल उपस्थित केला. आपच्या नेत्या प्रियंका चौहान यांनाही या ट्विटवर असाच सवाल उपस्थित केला.

लष्कराच्या या स्पष्टीकरणामुळे नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असले तरी अद्याप हे जवान कोण होते यासंदर्भातले स्पष्टीकरण कोणीही दिलेलं नाही.

केजरीवाल यांची विनंती

दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल तसेच मनीष सिसोदिया यांनी शांतता राखण्याचे आवाहन दिल्लीकरांना केले आहे. या हिंसाचाराची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. नायब राज्यपाल अनिल बजल यांनी पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्याची सूचना केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले.

गृह मंत्रालय म्हणते…

हिंसाचार जाणीवपूर्वक भडकवल्याचा दावा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी दिली.

राहुल गांधींचे आवाहन…

शांततेचे आवाहन शांततापूर्ण मार्गाने आंदोलन हे निरोगी लोकशाहीचे निदर्शक आहे. मात्र हिंसाचाराचे समर्थन होऊ शकत नाही. दिल्लीतील हिंसाचार अस्वस्थ करणारा आणि निंदनीय असून, जनतेने शांतता राखावी, असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले.

पाच मेट्रो स्थानके बंद

हिंसाचारामुळे दिल्ली मेट्रो रेल्वेची पाच स्थानके सोमवारी बंद ठेवण्यात आली. जाफराबाद, मौजपूर-बाबरपूर, गोकुळपुरी, जोहरी एन्क्लेव्ह आणि शिव विहार ही स्थानके बंद करण्यात आल्याचे दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने जाहीर केले.