भारतीय वंशाच्या एका अभियंत्याने सौरऊर्जेवर चालणा-या ‘टुकटुक’ रिक्षामधून तब्बल ६,२०० (सुमारे १० हजार किमी) मैलांचा प्रवास करुन सोमवारी ब्रिटनमध्ये दाखल झाला. नवीन राबेली असे या ३५ वर्षीय अभियंत्याचे नाव असून त्याने फेब्रुवारी महिन्यात भारतातून आपली यात्रा सुरू केली होती. जगामध्ये सौर ऊर्जेबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी त्याने हा प्रवास सुरू केला आहे.

नियोजित वेळेपेक्षा इंग्लंडमध्ये येण्यास नवीनला पाच दिवस उशीर झाला. फ्रान्समध्ये असताना त्याचे पैशांचे पाकीट आणि पासपोर्ट चोरीला गेले होते. त्यामुळे उशीर झाल्याचे त्याने सांगितले. परंतु तातडीने नवा पासपोर्ट बनवून पॅरिसला निरोप दिला. पण पॅरिसपर्यंत आपला प्रवास उत्तम झाल्याचे नवीनने सांगितले.
संपूर्ण प्रवासात विविध देशातील लोकांनी मला भरपूर सहकार्य केले. अनेक देशांमध्ये टुकटुक रिक्षाची कल्पना आवडली. खासकरुन इराणमध्ये लोक टुकटुकच्या प्रेमात पडले होते. अनेकजण टुकटुकसमोर उभे राहून सेल्फी काढत. मग मी त्यांना सौर उर्जेबाबत सांगत, असे नवीनने सांगितले.
राबेली हा भारतीय असला तरी, तो ऑस्ट्रेलियात स्थायिक असून ऑटोमोटिव्ह अभियंता आहे. नवीनने स्वत: तयार केलेल्या या टुकटुकमध्ये एक बेड, सहप्रवाशांसाठी एक सीट, कपाट आणि सौर उर्जेवर चालणारे कुकर अशा वस्तू आहेत. वीजेवर, सौरऊर्जेवर चालणा-या वाहनांचा अधिक वापर व्हावा, त्याबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी या प्रवासाचे आयोजन केल्याचे त्याने सांगितले. त्याने या टुकटुक रिक्षातून इराण, तुर्की, बल्गेरिया, सैरेबिया, ऑस्ट्रिया, जर्मनी आणि फ्रान्स देशात प्रवास केला आहे.
त्याने १५०० डॉलरमध्ये एक रिक्षा खरेदी केली होती. या रिक्षावर त्याने ११, ५०० डॉलर खर्च करून शून्य कार्बन उत्सर्जन करणारे वाहन बनवले हेाते. त्याने या आपल्या रिक्षा तेजस हे नाव दिले आहे. आशिया आणि युरोपिय देशांत अक्षय ऊर्जाचा प्रसार व्हावा व जनजागृती निर्माण व्हावा यासाठी हे अभियान राबवल्याचे नवीनने सांगितले.