केंद्राकडे महाराष्ट्राची मागणी
केंद्र सरकारने राखीव कोटय़ातून १० हजार टन तूर डाळ राज्यासाठी खुली करावी असे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे. राज्याचे नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पास्वान यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. राज्यात महिन्याला तूर डाळीची मागणी ७ हजार टनांची आहे व केंद्र सरकारकडे आम्ही राखीव साठय़ातून २८ हजार टन डाळ मागितली होती, पण ७ हजार टन देऊ करण्यात आली होती. डाळीचा प्रश्न गिरीश बापट यांनी पास्वान यांच्याकडे उपस्थित केला. बापट यांनी अन्नमंत्र्यांशी भेटीनंतर सांगितले, की आम्ही तातडीने १० हजार टन व दोन-तीन महिन्यांनी आणखी १० हजार टन डाळ द्यावी अशी मागणी केली आहे. अन्नमंत्री पास्वान यांनी राज्याची मागणी विचारात घेण्याचे आश्वासन दिले. केंद्राने राखीव साठय़ासाठी ६२१७८ टन डाळीची खरेदी केली होती. राज्यांच्या गोदामात सीसीटीव्ही लावण्यासाठी मदत देण्याची मागणीही बापट यांनी केली आहे. डाळीचा पुरवठा वाढवणे व किमती नियंत्रणात ठेवणे यासाठी राज्य प्रयत्नशील असल्याचे सांगून बापट म्हणाले, की डाळींचे कमाल भाव निश्चित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. आयात डाळीपैकी २५ टक्के डाळ व्यापाऱ्यांनी राज्याच्या गोदामात ठेवावी असे आदेशही दिल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात दुष्काळामुळे तूर डाळीचे उत्पादन कमी झाले आहे.