पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची सत्ताधारी पक्ष असलेल्या पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आली आहे. पाकिस्तानातील नवीन प्रस्तावित कायद्यानुसार अयोग्य घोषित करण्यात आलेला लोकप्रतिनिधी कोणत्याही राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान होऊ शकतो. त्यामुळेच शरीफ यांना पुन्हा पक्षाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी मिळाली आहे.

पनामा पेपर्स घोटाळा प्रकरणात शरीफ यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले होते. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अपात्र ठरवले होते. जुलैमध्ये शरीफ यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. तसेच सत्ताधारी पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझचे अध्यक्षपदही सोडावे लागले होते. त्यानंतर शाहीद खाकन अब्बासी हे पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत.

अब्बासी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पक्षाची संसदीय बैठक झाली. त्यात पक्षाध्यक्षपदासाठी अब्बासी यांनी शरीफ यांचे नाव सूचवले. त्यानंतर त्यांची एकमताने निवड झाली. शरीफ पुन्हा पक्षाची धुरा सांभाळणार आहेत, अशी माहिती पक्षाचे नेते आणि मंत्री तलाल चौधरी यांनी दिली. शरीफ यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने बळकटी मिळाली आहे. यातून पक्षाची एकजूट प्रतिबिंबित होते, असे पक्षाचे नेते राना अफजल खान म्हणाले.