पेमा खांडू यांनी रविवारी अरूणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भारत हा तरूणांचा देश आहे आणि त्याला तरूण, तडफदार नेत्यांची गरज आहे हे वाक्य पेमा यांच्या रुपाने खरे झाले आहे. ३६ वर्षांचे पेमा हे आता युवा मुख्यमंत्र्यांपैकी एक झाले आहेत.

अरूणाचल प्रदेशला युवा नेत्याची गरज आहे असे सांगत शनिवारी १६ जुलै रोजी नाबाम तुकी यांनी आपला राजीनामा दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी पेमा खांडू यांचे नाव पुढे केले होते. विशेष म्हणजे तुकी यांच्या विरोधात असणा-या तीस बंडखोरांमध्ये पेमा खांडू देखील होते.
अरूणाचल प्रदेशला पेमा यांच्या रुपाने  युवा मुख्यमंत्री लाभला आहे. हा तरूण नेता अरूणाचल प्रदेशचे भविष्य बदलेल का याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.