परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना पाठीशी घालून पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘राज्य धर्म’ पाळण्याऐवजी ‘राजे धर्म’ पाळत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
स्वराज आणि वसुंधराराजे यांच्या हकालपट्टीच्या मागणीचा पुनरुच्चार करताना काँग्रेसचे प्रवक्ते अजय कुमार यांनी, नरेंद्र मोदी यांनी ‘राज्य धर्म’ पाळला पाहिजे, ‘राजे धर्म’ अथवा ‘ललित धर्म’ पाळू नये, असे आवाहन केले.
लोकसभेच्या निवडणुकीत अनेक मोठी आश्वासने देण्यात आली, मात्र भ्रष्टाचार आणि काळा पैसा याबाबत नरेंद्र मोदी यांनी निराशा केली. या प्रश्नांवर कारवाई करण्याऐवजी ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांना मोदी संरक्षण देत असल्याचा आरोप अजय कुमार यांनी केला.
आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या स्थलांतर अर्जाला गुप्तपणे पाठिंबा देऊन वसुंधरा राजे यांनी देशविरोधी कृत्य केले आहे, असेही प्रवक्ता म्हणाला.