कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी गुरुवारी बी. एस. येडियुरप्पांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिले आहे. गुरुवारी सकाळी येडियुरप्पांचा शपथविधी होणार आहे असे ट्विट भाजपाने केले होते. ते काही वेळात डिलिट करण्यात आले. मात्र त्यानंतर राज्यपालांचे पत्रच ट्विट करण्यात आले आहे. या पत्रामध्ये येडियुरप्पांना उद्या सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी ९ वाजता बी. एस. येडियुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असे ट्विट बसवराज बोम्माई यांनी केले आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाला १५ दिवसांची मुदत देण्यात आल्याचेही बसवराज यांनी स्पष्ट केले आहे. मुरलीधर राव यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना गुरुवारी सकाळी ९ वाजता कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी माहिती दिली आहे.

कर्नाटकात १०४ जागा मिळवून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर काँग्रेस आणि जेडीएसने निवडणूक निकालाच्या दिवशी एकत्र येत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. मात्र राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी सर्वात आधी भाजपाला आमंत्रण दिल्याने काँग्रेस आणि जेडीएसचे स्वप्न कदाचित भंग झाल्यात जमा आहे.

ज्या पक्षाने देशाच्या घटनेचा सर्वात जास्त अपमान केला आहे त्या पक्षाने आम्हाला घटना शिकवू नये अशी टीका केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली आहे. ज्या पक्षाने राष्ट्रपती राजवट आणली होती ते आता आम्हाला शिकवू पाहात आहे असेही प्रसाद यांनी या कर्नाटकच्या नाट्यावर म्हणत काँग्रेसच्या टीकेला उत्तर दिले आहे. तर गोवा आणि मणिपूर या ठिकाणी तुम्ही कोणते नियम पाळून सत्ता स्थापन केलीत? असा प्रश्न काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी विचारला आहे.