आयफोन बनवणारी तैवानची टेक्नोलॉजी कंपनी विस्ट्रानच्या बंगळुरूमधील कार्यालयात शनिवारी तोडफोड व जाळपोळीची घटना घडली. अनेक महिन्यांपासून थकीत असलेले वेतन न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी ही तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.
विस्ट्रानच्या बंगळुरुमधील कारखान्यात आय़फोन आणि अन्य कंपन्यांसाठी मोबाइलची निर्मिती केली जाते. कर्नाटक सरकारने या हिंसाचाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, कर्मचाऱ्यांना त्यांचे थकीत वेतन मिळवून देण्याचेही आश्वासन दिले आहे.

विस्ट्रानच्या कोलार जिल्ह्यातील नरसापूरच्या कारखान्यात शनिवारी सकाळी काही कर्माचाऱ्यांच्या विरोधाने हिंसक वळण घेतले. नाराज कर्मचाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापकाविरोधात अगोदर घोषणाबाजी केली. त्यांनतर कार्यालयावर दगडफेक करण्यात आली व कंपनीचे काही फलक व वाहनं पेटवून देण्यात आली.

एका युनियन लिडरने सांगितले की, येथील बहुतांश कर्मचारी हे करारावर आहेत. मात्र त्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. शिवाय, कर्मचाऱ्यांच्या वेतनात अनेक प्रकारची कपातही केली जात असल्यामुळे कर्मचारी नाराज होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व सौम्य लाठीमार करत गोंधळ घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना तिथून हटवले.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉ.सी अश्वतनारायण यांनी ट्विट करून म्हटले की, कुणालाही कायदा हातात घेण्याची परवानगी नाही. अशाप्रकारचा कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी योग्य मार्ग आहे. हिंसाचार घडवणाऱ्यांवर पोलीस योग्य ती कारवाई करेल. तसेच, कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची देखील दक्षता घेतली जाईल. त्यांना त्यांचे थकीत वेतन दिले जाईल.

विशेष म्हणजे विस्ट्रान कंपनी नरसापुर कारखान्यातील कर्मचाऱ्यांची संख्या दोनशेवरून आठ हजार करण्याच्या विचारात आहे. कंपनी इथे मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्विस सेंटर निर्माण करू इच्छित आहे. इथे अॅपलचा आय़फोन 7, लिनोवो आणि माइक्रोसॉफ्टचे देखील काही उत्पादनं तयार होतात.