काबूल : अफगाणिस्तानात गझनी प्रांताच्या त्याच नावाच्या राजधानीत सुरक्षा दलांवर करण्यात आलेल्या हल्ल्यात किमान १४ पोलिस ठार झाले आहेत. तालिबानच्या दहशतवाद्यांनी तेथील घरांमध्ये लपून नंतर रात्रीच्यावेळी हा हल्ला केला. या हल्ल्यात वीस जवान जखमी झाले असून गझनी सिटी हॉस्पिटलचे प्रशासक बाझ महंमद  यांनी  सांगितले, की पश्चिम हेरात प्रांतात ओबे जिल्ह्य़ात करण्यात आलेल्या हल्ल्यात सहा पोलिस ठार झाले आहेत.

तालिबानचे वर्चस्व अफगाणिस्तानात वाढत असून त्यांनी सरकारचे शस्त्रसंधीचे प्रस्ताव फेटाळले आहेत. अफगाणी दलांनी गेली सतरा वर्षे दहशतवादाचा मुकाबला केला असून आता त्यांना लढण्यात दमछाक होऊ लागली आहे. गझनी येथे पहाटे दोन वाजता शहराच्या निवासी भागात सुरक्षा दले व दहशतवादी यांच्यात धुमश्चक्री झाली, असे पोलिस प्रमुख फरीद अहमद मशाल यांनी सांगितले. पोलिसांनी नंतर घरोघरी जाऊन तपासणी केली. शहरात दहशतवादी कसे घुसले याचा अंदाज आता आला असून ते काही घरांमध्ये जबरदस्तीने राहात होते. हेरात प्रांताच्या प्रशासकांनी सांगितले, की दोन जखमी नागरिकांना रूग्णालयात आणण्यात आले आहे. शहर  बंद करण्यात आले असून रूग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत.