अमेरिकेपाठोपाठ आता स्कॉटलंडमधून भारतीयांसाठी वाईट बातमी आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेत सातत्याने भारतीय विद्यार्थी आणि भारतीय वंशाच्या लोकांच्या हत्या होत असतानाच स्कॉटलंडमधून दोन भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. दोन्ही विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. स्कॉटलंडमधील एका पर्यटनस्थळी दोघांचे मृतदेह सापडले आहेत. बुधवारी रात्री लिन ऑफ टम्मेल (Linn of Tummel Waterfall) या धबधब्याजवळ दोघांचे मृतदेह सापडले. स्कॉटलंडच्या उत्तर-पश्चिम भागात गॅरी आणि टम्मेल नदीच्या संगमाजवळ हा धबधबा आहे. हे दोन्ही विद्यार्थी त्यांच्या चार मित्रांबरोबर फिरण्यासाठी या धबधब्याजवळ गेले होते.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार चार विद्यार्थी ट्रेकिंग करण्यासाठी लिन ऑफ टम्मेल धबधब्यावर गेले होते. त्यांच्यापैकी दोन जण पाण्यात पडले. नदीच्या पाण्यात बुडून या दोघांचा मृत्यू झाला. मृत विद्यार्थ्यांच्या मित्रांनी आपत्कालीन सेवा पुरवणाऱ्या संस्थेला आणि पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यानंतर बचाव मोहीम हाती घेण्यात आली. बचाव पथकांनी बुधवारी रात्री दोघांचे मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढले. या अपघातात मृत्यू झालेले दोन्ही विद्यार्थी स्कॉटलंडच्या डुंडी विद्यापीठात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेत होते.

या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, २६ वर्षीय जितेंद्रनाथ कस्तुरी आणि २२ वर्षीय चाणक्य बोलिसेट्टी हे दोघे त्यांच्या आणखी दोन मित्रांबरोबर लिन ऑफ टम्मेल धबधब्यावर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी जीतेंद्रनाथ आणि चाणक्य हे दोघे पाण्यात पडले आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला. हे अपघाती मृत्यू असून यामागे इतर कुठलंही कारण नाही. दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर डुंडी विद्यापीठाने सर्व प्रकारची मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

हे ही वाचा >> अरविंद केजरीवाल यांची तुरुंगात इन्सुलिन देण्याची मागणी, न्यायालयात याचिका दाखल

लंडनमधील भारतीय उच्चाधिकाऱ्यांनी सांगितलं की, धबधब्याच्या पाण्यातून दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, भारतीय वाणिज्य दूतावासाने दोन्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला आहे. तसेच दूतावासाच्या एका प्रतिनिधीने ब्रिटनमध्ये राहणाऱ्या आणखी एका विद्यार्थ्याची भेट घेतली आहे. शुक्रवारी दोन्ही विद्यार्थ्यांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन केलं जाणार असून त्यानंतर अधिकारी त्यांचा मृतदेह भारतात पाठवण्याची प्रक्रिया चालू करतील.