Premium

Video: “रामचरितमानसमध्ये पोटॅशियम सायनाईडसारखं…”, बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचं विधान चर्चेत!

चंद्र शेखर म्हणतात, “रामचरितमानसमध्ये काही चांगल्या गोष्टीही आहेत. पण जर तुम्हाला ५५ प्रकारचे अन्नपदार्थ जेवणासाठी वाढले आणि त्यात थोडंसं…!”

chandra shekhar ramcharitmanas
बिहारच्या शिक्षण मंत्र्यांचं विधान चर्चेत (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बिहारचे शिक्षण मंत्री चंद्रशेखर हे पुन्हा एकदा आपल्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. याआधी त्यांनी रामचरितमानसविषयी जानेवारी महिन्यात केलेल्या एका विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. “रामचरितमानस, मनुस्मृती व बंच ऑफ थॉट्स या पुस्तकांमध्ये समाजात द्वेषभावना पसरत आहेत”, असं ते म्हणाले होते. आता पुन्हा एकदा त्यांचं विधान चर्चेत आलं असून यावेळी त्यांनी रामचरितमानसची तुलना थेट पोटॅशियम सायनाईडशी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले चंद्र शेखर?

बिहारमध्ये हिंदी दिवसच्या निमित्ताने बिहार ग्रंथ अकादमीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. “रामचरितमानसमध्ये काही चांगल्या गोष्टीही आहेत. पण जर तुम्हाला ५५ प्रकारचे अन्नपदार्थ जेवणासाठी वाढले आणि त्यात थोडंसं पोटॅशियम सायनाईड टाकलं असेल, तर तुम्ही ते खाल का? त्यामुळे माझा त्याच्यावर आक्षेप आहे आणि आयुष्यभर माझा आक्षेप राहीलच”, असं चंद्र शेखर आपल्या भाषणात म्हणाले.

“रामचरितमानसमध्ये आक्षेपार्ह उल्लेख आहेत. अनेक मोठ्या व्यक्तींनी हे मान्य केलं आहे. राममनोहर लोहिया व बाबा नागार्जुन यांनीही हे मान्य केलं होतं”, असंही चंद्र शेखर यांनी आपल्या भाषणात नमूद केलं आहे.

रामचरितमानसची तुलना पोटॅशियम सायनाईडशी!

दरम्यान, यावेळी बोलताना चंद्र शेखर यांनी रामचरितमानस ग्रंथाची तुलना पोटॅशियम सायनाईडशी केली आहे. “पोटॅशियम सायनाईडसारखं काहीतरी आहे या ग्रंथांमध्ये. गेल्या वेळी मी रामचरितमानसच्या सुंदरकांडसंदर्भात केलेल्या विधानावरून वाद झाला, तेव्हा माझी जीभ छाटम्यासाठी छाटण्यासाठी १० कोटी रुपयांचा पुरस्कार ठेवला होता”, असं ते म्हणाले.

“गोदानचे पात्र जर बदलले नाही गेले, जर त्यांच्या जाती बदलल्या गेल्या नाहीत, गटारीत उतरणाऱ्यांच्या जाती बदलल्या नाही, तोपर्यंत या भारतात आरक्षण व जाती आधारीत गणनेची गरज पडत राहील”, असंही चंद्र शेखर यांनी नमूद केलं.

“नितीशकुमार हे ऐकतायत की नाही?”

दरम्यान, चंद्र शेखर यांच्या विधानावरून विरोधकांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांना सवाल केला आहे. “चंद्र शेखर वारंवार रामचरितमानसबाबत आक्षेपार्ह विधानं करत आहेत. नितीशकुमार हे ऐकतायत की नाही? नितीशकुमार हे सातत्याने सनातन धर्माचा अपमान करत आहेत”, अशी टीका बिहार भाजपाचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bihar education minister chandra shekhar controversial statement on ramcharitmanas pmw

First published on: 15-09-2023 at 16:26 IST
Next Story
India-Bharat debate: “एका लहरी माणसामुळे सगळ्यांना त्रास…”, अनुराग कश्यपचे खडे बोल