बेरहामपूर/नबरंगपूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओडिशा विधानसभा निवडणुकीचा निकाल येत्या ४ जूनला जाहीर होईल. यानंतर येथील बिजू जनता दल (बीजेडी) सरकार कालबाह्य होईल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. राज्यातील पहिल्या प्रचार सभेला संबोधित करताना, आपण भगवान जगन्नाथांचे पुत्र असून भाजपला संधी दिल्यास ओडिशाला देशातील आघाडीचे राज्य बनवू, असे आश्वासनही मोदींनी दिले.

बिजू जनता दलाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यावर मोदींनी कठोर शब्दांत टीका केली. ‘ओडिशाला येथील भाषा आणि संस्कृती समजणाऱ्या मुख्यमंत्र्याची गरज आहे. भाजप येथे निवडणुकीनंतर ‘डबल इंजिन’ सरकार स्थापन करेल, असा दावा त्यांनी ब्रह्मपूर येथील प्रचारसभेत केला. तर ‘केंद्र सरकार आदिवासींच्या कल्याणासाठी काम करत आहे. मोदींच्या नेतृत्वातील १० वर्षांचा आढावा घ्या, आम्ही आदिवासींच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पात आधीच्या तरतुदीपेक्षा पाचपट वाढ केली’, असा दावा मोदी यांनी आदिवासीबहुल नबरंगपूर येथील प्रचारसभेत केला.

हेही वाचा >>> भाजप दीडशे जागाही जिंकणार नाही! राहुल गांधी यांचा दावा

ओडिशातील नागरिकांमध्ये क्षमता आहे. परंतु बीजेडी सरकार त्यांना योग्य संधी देत नाही. तुम्ही ५० वर्षे काँग्रेसला दिले, २५ वर्षे बीजेडीला. भाजपला फक्त ५ वर्षेच द्या. आम्ही ओडिशाला देशात क्रमांक एकचे राज्य बनवू, असे आश्वासन मोदींनी दिले. दरम्यान, मोदींच्या दाव्याला प्रत्युत्तर देताना, ज्येष्ठ बीजेडी नेते आणि नवीन पटनायक यांचे निकटवर्तीय व्हीके पांडियन म्हणाले, की पटनाईक येत्या ९ जून रोजी सलग सहाव्यांदा ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

केंद्राच्या योजनांचा लाभ नाही

ओडिशाला ‘आयुष्मान भारत योजने’चा लाभ उठवता आला नाही. कारण बीजेडी सरकारने ही योजनाच राज्यात लागू केली नाही. ‘जलजीवन मिशन’ योजनेअंतर्गत केंद्र सरकारने ओडिशाला १० हजार कोटी रुपये दिले होते. परंतु हा निधीही राज्याला व्यवस्थित खर्च करता आला नाही. छत्तीसगडमधील धान उत्पादकांना प्रतिक्विंटल ३,१०० रुपये किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळते, परंतु ओडिशातील शेतकऱ्यांना केवळ २,१०० रुपये मिळते. अशाप्रकारे येथील पटनाईक सरकार मोदींनी केलेल्या योजना ओडिशात लागू होऊ देत नसल्याचा आरोपही मोदींनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjd government expired after june 4 pm narendra modi s claim at campaign rally in odisha zws