जनता दल सेक्युलरने (जेडीएस) खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर अनेक महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप करणारे भाजपा नेते जी देवराजे गौडा यांना शुक्रवारी उशिरा लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले. ते बेंगळुरूहून चित्रदुर्गाकडे जात होते, त्यावेळी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, असं पोलिसांनी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका ३६ वर्षीय महिलेने देवराजेविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. देवराजे यांनी तिची मालमत्ता विकण्यास मदत करण्याचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. देवराजे गौडा यांच्यावर प्रज्वल रेवण्णा यांच्या अनेक महिलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ लीक केल्याचा आरोपही आहे. मात्र त्यांनी हे व्हिडिओ लीक केल्याचा आरोप काँग्रेसवर केला आहे.

हसनची उमेदवारी रेवण्णा यांना मिळू नये म्हणून लिक केले व्हिडिओ

गौडा यांनी प्रज्वल रेवण्णा यांच्या कथित लैंगिक शोषणाबद्दल गेल्या वर्षी भाजप नेतृत्वाला सावध केले होते आणि हसनमधील जेडी(एस) नेत्याला लोकसभेचे तिकीट देऊ नये असे पक्षाला सांगितले होते. गेल्या वर्षी JD(S) सोबत युती करणाऱ्या भाजपाने मात्र हसनमधून प्रज्वल यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा >> सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या नातवासाठी देवेगौडांनी सोडला होता मतदारसंघ; कुटुंबात राजकीय दुफळी

हसन लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान झाल्याच्या एका दिवसानंतर हा लैंगिक घोटाळा समोर आला होता. अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार होत असल्याचे व्हिडिओ फिरू लागले. प्रज्वल रेवण्णा काही व्हिडिओंमध्ये महिलांचे लैंगिक शोषण करताना दिसत आहेत.

प्रज्वल रेवण्ण हे माजी पंतप्रधान आणि जेडी(एस) सुप्रीमो एचडी देवेगौडा यांचे नातू आहेत, हे व्हिडिओ समोर आल्याच्या दिवशीच ते जर्मनीला रवाना झाले आणि नंतर त्यांना जेडी(एस)ने त्यांना निलंबित केले. इंटरपोलच्या सदस्य राष्ट्रांना एखाद्या व्यक्तीचा शोध घेण्यास मदत करण्यास सांगणारी ब्लू कॉर्नर नोटीस त्यांच्याविरुद्ध जारी करण्यात आली आहे.

त्यांच्यावर बलात्कार, विनयभंग, धमकावणे, ब्लॅकमेलिंग आरोपांसह तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्यांचे वडील एचडी रेवन्ना सध्या तीन मुलांची आई असलेल्या महिलेचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत.

प्रज्वल रेवण्णाची राजकीय पार्श्वभूमी

२०१८ मध्ये विधानसभेच्या हंसूर मतदारसंघातून उभे राहण्यासाठी पक्षाने प्रज्वल यांना तिकीट दिले नव्हते, तेव्हा त्यांनी हा निर्णय मान्य केला. मात्र, आपल्याच पक्षाला घरचा आहेर देत ते म्हणाले होते की, “पक्ष ‘सुटकेस कल्चर’ला प्रोत्साहन देतो आहे.”

प्रज्वल रेवण्णा यांनी महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे एक हजारांहून अधिक व्हिडीओ असल्याची माहिती आहे. जेडीएस सध्या आपल्या पक्षाची झालेली नाचक्की झाकोळून टाकण्याच्या प्रयत्नात आहे. विशेष म्हणजे हसन लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आणि त्यांच्यावर आरोप होण्यापूर्वीच प्रज्वल जर्मनीला पळून गेले आहेत.

३३ वर्षीय प्रज्वल यांचा स्वभाव बंडखोर आहे असे म्हटले जाते. तसेच ते स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांच्यामध्ये राजकीय महत्त्वाकांक्षाही दिसून येते. त्यांची आई भवानी रेवण्णा या कृष्णराजनगरमधील राजकीय कुटुंबातील आहेत. राजकीय कारकिर्दीसाठी प्रज्वल रेवण्णा यांना त्यांच्या आईकडूनच मार्गदर्शन मिळत असल्याचे सांगितले जाते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader who flagged prajwal revanna sex abuse case taken into custody sgk