नवी दिल्ली : भाजपला २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील ३०३ जागांच्या यशाची पुनरावृत्ती करून सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता मिळवायची असेल तर दिल्ली, उत्तर प्रदेशसह उत्तरेतील ७९ जागा कळीच्या ठरणार आहेत. या जागा गमावल्या तर भाजपला बहुमत मिळणे कठीण होऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१९ मध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळालेल्या २२४ जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्यामध्ये सर्वाधिक ४० जागा उत्तर प्रदेशातील आहेत. त्याखालोखाल गुजरात (२६), मध्य प्रदेश (२५) आणि राजस्थान (२३) या राज्यांत भाजपला जास्तीत जास्त जागा मिळाल्या होत्या. तर ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवून भाजपेतर पक्षांनी ११९ जागा जिंकल्या होत्या. देशभरातील ५४३ जागांपेकी ३४३ जागांवर ५० टक्के मतदान झाले होते.

दिल्लीत इंडियाची सत्त्वपरीक्षा

दिल्लीतील सातही मतदारसंघांमध्ये भाजपला ५० टक्क्यांपेक्षा जास्त मिळाली आहेत. २०१९ मध्ये दिल्लीत भाजपची मतांची टक्केवारी सरासरी ५६ वर पोहोचली होती. दिल्लीच्या उत्तर-पूर्व मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार यांच्यामुळे भाजपचे मनोज तिवारी यांच्याविरोधात वातावरण निर्मिती केली असली तरी २०१९ मध्ये तिवारींना ५४ टक्के मते मिळाली होती. काँग्रेसला २९ टक्के, तर ‘आप’ला १३ टक्के म्हणजे ‘इंडिया’ आघाडीला ४२ टक्के मते मिळाली होती. भाजप व ‘इंडिया’ यांच्यातील मतांचे अंतर १२ टक्के असून मनोज तिवारींना पराभूत करण्यासाठी कन्हैय्या कुमारांसाठी ‘आप’ला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. हीच स्थिती इतरत्र असल्यामुळे भाजप २२४ जागांबाबत निश्चिंत असल्याचे मानले जाते.

हेही वाचा >>> “पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज पडणार नाही” म्हणणाऱ्या अरविंद केजरीवालांवर अमित शाहांची टीका; म्हणाले…

२०० जागा खुल्या…

पाच वर्षांपूर्वी भाजपने एकूण ३०३ जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी मते मिळवून भाजपने ७९ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे या जागा भाजपसाठी पूर्णपणे सुरक्षित नसल्याचे मानले जाते. या जागांवर भाजप व ‘इंडिया’तील घटक पक्षांमध्ये तगडी लढत होऊ शकते. २०१९ मध्ये ‘एनडीए’ व ‘इंडिया’तील घटक पक्षांनी २०० जागांवर ५० टक्क्यांपेक्षा कमी मते मिळवून विजय मिळवला होता. या जागा यावेळीही दोन्ही आघाड्यांसाठी खुल्या असल्याने त्यातील अधिक जागा जिंकणारी आघाडी बहुमताचा आकडा पार करू शकेल.

(शिवसेना-१०, जनता दल (सं)-११ व अन्य भाजप समर्थक पक्ष- ११. आता शिवसेनेच्या फुटीने समीकरणांमध्ये बदल)

२०१९ मध्ये ५० टक्के मतदान झालेल्या जागा

● भाजपेतर विजयी (११९)

जम्मू-काश्मीर-१, पंजाब-२, राजस्थान-१, उत्तरप्रदेश -१५, बिहार-१७,, अरुणाचल प्रदेश-२, आसाम-१, मेघालय-२, झारखंड-१, ओदिशा-३, तेलंगणा-४, पश्चिम बंगाल-६, आंध्र प्रदेश-१३, पुडुचेरी-१, तमिळनाडू-२७, केरळ-८, कर्नाटक-३, महाराष्ट्र-१२.

● भाजप विजयी (२२४) जम्मू-काश्मीर-२, चंदिगड-१, हरियाणा-९, दिल्ली-७, हिमाचल प्रदेश-४, उत्तराखंड-५, उत्तर प्रदेश-४०, पंजाब-१, राजस्थान-२३, गुजरात-२६, बिहार- १४, अरुणाचल प्रदेश-२, आसाम-७, त्रिपुरा-१, झारखंड-८, मध्य प्रदेश-२५, छत्तीसगढ-६, पश्चिम बंगाल-५, महाराष्ट्र- १५, गोवा-१, कर्नाटक-२२.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp needs 79 seats from delhi uttar pradesh including north for retain power zws
First published on: 16-05-2024 at 05:01 IST