एपी, टोक्यो : ‘‘अमेरिकन अधिकाऱ्यांना तैवान दौऱ्यापासून रोखण्याचा प्रयत्न करून चीन तैवानसारख्या स्वयंशासित बेटास एकाकी पाडू शकत नाही,’’ अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांनी गुरुवारी जपान येथे दिली. पलोसी यांनी चीनचा कडवा विरोध असताना तैवान दौरा पूर्ण केला. गेल्या २५ वर्षांतील तैवान दौरा करणाऱ्या त्या अमेरिकन सभागृहाच्या पहिल्या अध्यक्ष आहेत.

पलोसी यांनी चीनवर आरोप केला, की चीनने तैवानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला. अलीकडे जागतिक आरोग्य संघटनेत सामील होण्यापासून तैवानला चीनने रोखले. चीन तैवानला इतर कुठेही सहभागी होण्यापासून रोखू शकतात परंतु आमचा तैवान दौरा रोखून तैवानला वेगळे पाडू शकत नाही. आपल्या तैवान दौऱ्यामागील उद्देश तैवान बेटाच्या सद्य:स्थितीत कोणताही बदल करण्याचा नव्हता. परंतु तैवानच्या सामुद्रधुनीत शांतता व स्थैर्य राखण्याचा हेतू त्यामागे होता. तैवानमध्ये मोठय़ा अडथळय़ांवर मात करत लोकशाही प्रस्थापित करण्यात आली आहे, याचे कौतुक करून पलोसी यांनी चीनवर व्यापक करारांचे उल्लंघन, शस्त्रास्त्रांचा पुरवठा आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनाबद्दल टीकाही केली.

पलोसी यांनी बुधवारी तैवानमध्ये ताईपे येथे सांगितले होते, की तैवानसारख्या स्वयंशासित बेटासह जगभरात कुठेही लोकशाही राष्ट्राच्या हितरक्षणासाठी अमेरिका कटिबद्ध आहे. पलोसी व त्यांच्यासोबत असलेले अमेरिकन सभागृहाचे पाच सदस्य सिंगापूर, मलेशिया, तैवान आणि दक्षिण कोरियाच्या दौऱ्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा जपानला टोक्योत पोहोचले. त्यांच्या तैवान दौऱ्याला चीनने कडवा विरोध करून, ‘तणावास खतपाणी घालणारा दौरा’ अशी टीका केली होती. त्यानंतर गुरुवारी चीनने तैवानच्या परिसरात सहा ठिकाणी क्षेपणास्त्रे डागून, लष्करी सराव सुरू केला आहे. गरज पडल्यास तैवानवर बळजबरीने ताबा मिळवू, अशी धमकीही चीनने दिली आहे.

चीनमुळे प्रादेशिक शांततेला धोका : जपान

तैवानला धाकात ठेवण्यासाठी चीनने सुरू केलेले लष्करी सराव प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण करणारे आहेत. त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकते, असा इशारा जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी दिला. या सरावात चीनने डागलेली क्षेपणास्त्रे वास्तविक जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्रात कोसळली होती. क्षेपणास्त्र प्रक्षेपण तत्काळ थांबवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जपानचे संरक्षण मंत्री नुबुओ किशी यांनी सांगितले, की गुरुवारी पाच क्षेपणास्त्रे जपानच्या मुख्य बेटाच्या दक्षिणेला असलेल्या हातेरुमा येथे धडकली. अशा क्षेपणास्त्रांमुळे जपानची राष्ट्रीय सुरक्षा आणि जपानी नागरिकांना धोका निर्माण झाला आहे, ज्याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे सांगून जपानने चीनकडे निषेध नोंदवल्याचे त्यांनी सांगितले. नॅन्सी पलोसी आणि त्यांच्या खासदारांच्या शिष्टमंडळासोबत पंतप्रधान किशिदा यांनी नाश्ता व चर्चा केली.