देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढा देत आहे. जवळपास सर्वच राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात करोनाचा प्रसार झाला आहे. मात्र, सातत्याने कमी होणारी करोना रुग्णांची आकडेवारी ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी गोष्ट आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात ३८ हजार १६४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ४ लाख २१ हजार ६६५ वर पोहोचली आहे.

देशात काल दिवसभरात ३८ हजार ६६० रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे देशातल्या करोनामुक्तांची संख्या आता तीन कोटी तीन लाख ८ हजार ४५६ झाली आहे. तर देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७.३२ टक्क्यांवर स्थिरावला आहे.


देशात काल दिवसभरात ४९९ करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे देशातल्या मृतांचा आकडा आता ४ लाख १४ हजार १०८ वर पोहोचला आहे. तर देशाचा मृत्यूदर मात्र १.३३ टक्क्यांवर स्थिर आहे.

देशात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम जोरात सुरु आहे. काल दिवसभरात देशातल्या १३ लाख ६३ हजार १२३ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. त्यापैकी पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ९ लाख १३ हजार ४५६ आहे तर ४ लाख ४९ हजार ६६७ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यामुळे आता देशातल्या लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या ४० कोटी ६४ लाख ८१ हजार ४९३ वर पोहोचली आहे.