पोरबंदर / नवी दिल्ली : इराणच्या बंदरातून गुजरात किनाऱ्यावर नौकेद्वारे आणलेले तब्बल तीन हजार ३०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ भारतीय सुरक्षा यंत्रणांनी बुधवारी जप्त केले. या प्रकरणी पाच विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. हा आतापर्यंत जप्त करण्यात आलेला सर्वात मोठा साठा ठरला आहे.

अरबी समुद्रात भारतीय किनाऱ्यापासून आणि आंतरराष्ट्रीय सागरी सीमेपासून सुमारे ६० सागरी मैलावर नोंदणी नसलेली एक मासेमारी नौका मंगळवारी सकाळी अडवण्यात आली. बोटीची तपासणी केली असता त्यात तीन हजार ११० किलो चरस, १५८.३ किलो ‘क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन’ आणि २४.६ किलो हेरॉइनसदृश पदार्थ जप्त करण्यात आला.  ‘रास अवाद गुड्स कंपनी, पाकिस्तान’ असा शिक्का असलेल्या पाकिटांमध्ये हे अमली पदार्थ ठेवण्यात आल्याची माहिती ‘एनसीबी’ने दिली आहे.

हेही वाचा >>> One Nation One Election: २०२९ मध्ये देशभरात एकाचवेळी निवडणुका

अमली पदार्थाचा हा साठा इराणमधील चाबहार बंदरातून पाठविण्यात आल्याची माहिती आहे. बुधवारी जप्त करण्यात आलेला आजवरचा सर्वात मोठा अमली पदार्थाचा साठा असून आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत ३ हजार ३०० कोटी रुपये असू शकेल, असे ‘एनसीबी’चे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत सांगितले. भारत अस्थिर करण्याच्या व्यापक कटाचाच हा एक भाग आहे. अंमली पदार्थ तस्करांना अरबी समुद्रालगतची किनारपट्टी सोयीची वाटते. सागरी मार्गाने अंमली पदार्थाच्या तस्करीचे प्रमाण वाढल्यानंतर नौदल, तटरक्षक दल, सीमा सुरक्षा दलाचीही मदत घेतली जात असल्याचे ते म्हणाले. ‘एनसीबी’चे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले, की संबंधित मासेमारी नौका पोरबंदरला आणण्यात आली आहे असून पाच विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यांची ओळख अद्याप पटली नसून ते पाकिस्तानी किंवा इराणी नागरिक असण्याची शक्यता आहे. नौदलाने या मोहिमेसाठी युद्धनौका आणि हेलिकॉप्टर, लांब पल्ल्याची टेहळणी विमाने आणि सागरी कमांडो तैनात केले होते.

अमली पदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी), नौदल आणि गुजरात पोलिसांनी राबवलेली ही संयुक्त मोहीम हे एक ऐतिहासिक यश आहे. आपल्या देशाला अमली पदार्थमुक्त करण्यासाठीच्या दृढ कटिबद्धतेचे हे बोलके उदाहरण आहे. – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री