पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखालीमध्ये परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली आहे. संदेशखाली येथील महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाविरोधात विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष पूर्णपणे रस्त्यावर उतरला आहे. मंगळवारी (२० फेब्रुवारी) भाजपाचे अनेक आमदार संदेशखालीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्यांना आयपीएस अधिकारी जसप्रीत सिंग यांनी रोखले. यावेळी भाजपा आमदार आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आयपीएस अधिकाऱ्यांना खलिस्तानी संबोधले. त्यामुळे येथील परिस्थिती अधिक चिघळली. एबीपीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसने व्हिडिओ शेअर केला आहे     

आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर व्हिडिओ शेअर करताना काँग्रेसने म्हटलं की, “भाजपाच्या लोकांचे निकृष्ट वर्तन पहा. दिवस- रात्री देशाची सेवा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला पगडी घातल्यामुळे त्याला खलिस्तानी संबोधण्यात आले, ही अत्यंत निकृष्ट मानसिकता आहे.

‘मी पगडी घातल्यामुळे ते मला खलिस्तानी म्हणत आहेत’    

या व्हिडिओमध्ये आयपीएस अधिकारी जसप्रीत सिंह दिसत आहेत. ते म्हणतात की, ‘मी पगडी घातल्यामुळे तुम्ही मला खलिस्तानी म्हणत आहात. तुमची हिम्मत आहे का? पोलिसाने पगडी घालून ड्युटी केली तर तो खलिस्तानी होतो का? ही तुमची पातळी आहे का?’

माझ्या धर्मावर बोलू शकत नाही – IPS जसप्रीत सिंग 

व्हायरल व्हिडिओमध्ये आयपीएस अधिकाऱ्याने म्हटले आहे की, “तुम्ही मला खलिस्तानी म्हणत आहात, मी तुमच्यावर गुन्हा दाखल करेन. मी तुमच्या धर्मावर बोललो नाही तर तुम्ही कसे बोलू शकता? पगडी घातलेल्या आणि कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला तुम्ही खलिस्तानी म्हणत आहात”, असंही आयपीएस अधिकारी व्हीडिओमध्ये म्हणताना दिसत आहे.  

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ips officer wearing turban called khalistani by bjp workers congress shared that video sgk